पुणे शहरात अवकाळी पावसाचा धुमाकुळ. काही ठिकाणी झाडे पडली



प्रेस मीडिया लाईव्ह :

पुणे शहराला काल दुपारनंतर  अवकाळी पावसाने हजेरी लावून धुमाकूळ घातला  यामुळे जनजीवन विस्कळीत झाले होते. जोरदार वाऱ्यांमुळे काही ठिकाणी झाडे पडली तर, सखल भागांत निचरा न झाल्याने पाणी साठून राहिले होते.


पुणे वेधशाळेने हवामानाचा अंदाज वर्तवला आहे. यामध्ये पुढील सहा दिवस आकाश ढगाळ राहून वादळी वाऱ्यासह हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. राज्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. पुण्यात दिवसभराच्या उकाड्यानंतर दुपारनंतर आभाळ ढगाळ होऊन पावसाला सुरुवात झाली. याचबरोबर जोरदार वारेही वाहत होते. पावसामुळे रस्त्यांवर पाण्याचे पाट वाहू लागले. पाण्याचा निचरा न झाल्याने महापालिकेने केलेल्या पावसाळी गटारांच्या सफाईच्या कामाच्या दर्जाविषयी प्रश्न निर्माण झाला आहे.

कर्वेनगर, चांदणी चौक आदी ठिकाणी रस्त्यावर पाण्याचे तळेच साचले होते. पुणे वेधशाळेने वर्तविलेल्या अंदाजानुसार, पुढील सहा दिवस पुणे शहर आणि परिसरात आभाळ ढगाळ राहणार आहे. संध्याकाळी वादळी वाऱ्यासह हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याचा अंदाज वर्तविला आहे. मंगळवारी सांयकाळी सहा वाजेपर्यंत शिवाजीनगर येथे ७ मिमी, पाषाण येथे २६ मिमी, लोहगाव येथे ५.८ मिमी इतक्या पावसाची नोंद झाली.

पुणे विद्युत पोलचा शॉक लागून 10 वर्षाच्या मुलाने गमावला जीव

 पुण्यात विद्युत पोलचा शॉक लागून दहा वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला. मयंक प्रदीप आढागळे असे मृत्युमुखी पडलेल्या बालकाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, वारजे माळवाडी येथे मुसळधार पावसात विद्युत पोल मध्ये करंट उतरला होता. मयंक याला पोलच्या करंटचा धक्का लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.

         दोन ठिकाणी होर्डिंग कोसळले

जोरदार पावसानंतर शहरात दोन ठिकाणी होर्डिंग पडण्याच्या घटना घडल्या. यात एक होर्डिंग धानोरी पोरवाल रस्त्यावर, तर दुसरे होर्डिंग वाघोली परिसरात पडले. सुदैवाने या दोन्ही घटनांमध्ये कोणीही जखमी झाले नाही. होर्डिंगला परवानगी देताना नियमांची होणारी पायमल्ली आणि देखभालीकडे होणारे दुर्लक्ष याबद्दल नागरिकांची चिंता वाढली आहे. शहरात अशा बेकायदेशीर आणि धोकादायक होर्डिंगची संख्या किती आहे आणि त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी पालिकेला कधी जाग येणार, असा प्रश्‍न नागरिक उपस्थित करत आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post