प्रेस मीडिया लाईव्ह :
पुणे : आता बेशिस्त वाहनचालकांवर लगाम कसण्यासाठी पुणे वाहतूक पोलिसांनी एक प्रभावी उपाय शोधला आहे.शहरात आता आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित प्रणालीचा वापर करून बेशिस्त वाहनचालकांवर थेट कारवाई केली जाणार आहे. विशेषतः फर्ग्युसन रस्त्यासारख्या वर्दळीच्या ठिकाणी होणारे डबल पार्किंग आणि पदपथांवर वाहने उभी करणाऱ्यांवर या प्रणालीच्या माध्यमातून कठोर कारवाई करणे शक्य होणार आहे.
वाहतूक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नामदार गोपाळ कृष्ण गोखले (फर्ग्युसन कॉलेज) रस्त्यावर प्रायोगिक तत्त्वावर 'एआय' आधारित वाहतूक नियमभंग शोधणारी प्रणाली दोन ठिकाणी बसवण्यात आली आहे. ही प्रणाली रस्त्यावर होणारे वाहतूक नियमनचे उल्लंघन अचूकपणे ओळखते आणि त्याचे पुरावे त्वरित नोंदवते. या पुराव्यांच्या आधारे नियम मोडणाऱ्या वाहनचालकांना आता थेट दंड ठोठावला जाणार आहे. डबल पार्किंग करणारे, पदपथावर वाहने उभी करून गप्पा मारणारे, ट्रिपल सीट दुचाकी चालवणारे आणि नो-एंट्रीमध्ये प्रवेश करणाऱ्या वाहनचालकांना यापुढे दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागणार आहे.
पुणे महानगरपालिका आणि वाहतूक पोलिसांनी शहरातील रस्त्यांचे सर्वेक्षण करून वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी तातडीच्या आणि कमी खर्चाच्या उपाययोजनांवर काम सुरू केले आहे. फर्ग्युसन कॉलेज रस्त्यावर गोपाळ कृष्ण गोखले चौक ते फर्ग्युसन कॉलेजचे प्रवेशद्वार या दरम्यान वाहतूक कोंडीची मोठी समस्या आहे. या कोंडीचे मुख्य कारण म्हणजे रस्त्यावर होणारे बेकायदेशीर पार्किंग आणि नो-एंट्रीतून येणारी वाहने. वाहतूक पोलिसांना मनुष्यबळाच्या मर्यादेमुळे अशा सर्व वाहनांवर प्रभावी कारवाई करणे शक्य होत नाही. त्यामुळे आता तंत्रज्ञानाचा वापर करून कारवाई करण्यासाठी पाऊल उचलण्यात आले आहे.
हैदराबादमधील एका खासगी कंपनीने प्रायोगिक स्तरावर ही 'एआय' (AI) प्रणाली फर्ग्युसन कॉलेज रस्त्यावर स्थापित केली आहे. जर हा प्रयोग यशस्वी झाला, तर या प्रणालीची अंमलबजावणी संपूर्ण शहरात केली जाईल. या माध्यमातून दररोज हजारो बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई करणे शक्य होणार आहे, असा विश्वास वाहतूक पोलिसांनी व्यक्त केला आहे. वाहतूक पोलिसांनी या प्रणालीसंदर्भात पुणे महानगरपालिकेला एक पत्रही पाठवले आहे, ज्यामध्ये शहरातील वाहतूक व्यवस्थेची सद्यस्थिती स्पष्ट केली आहे.
पत्रात नमूद केल्यानुसार, शहरातील मोठ्या रस्त्यांवर जर एखादे वाहन चुकीच्या पद्धतीने उभे केले, तर वाहतुकीची एक बाजू पूर्णपणे बाधित होते आणि त्यामुळे तासाला किमान ५०० वाहनांना त्याचा फटका बसतो. अनेकदा मालाची वाहतूक करणारी मोठी वाहने गर्दीच्या वेळी रस्त्यावर उभी केली जातात, ज्यामुळे वाहतूक अधिक विस्कळीत होते. पोलिसांना अशा वाहनांवर कारवाई करण्यास अनेक मर्यादा येतात. आता वाहतूक पोलिसांनी विकसित केलेल्या या नवीन प्रणालीमध्ये एखादे वाहन रस्त्यावर किती वेळ उभे आहे याची अचूक माहिती नोंदवली जाईल आणि त्या आधारावर त्वरित दंडात्मक कारवाईची शिफारस केली जाईल. त्यामुळे आता पुणेकरांनी रस्त्यावर वाहने पार्क करताना अधिक काळजी घेणे आवश्यक आहे, अन्यथा 'एआय'च्या मदतीने त्यांच्यावर कारवाई अटळ आहे.