जेष्ठ नेते दत्ता बहिरट यांनी अजित पवार यांची भेट घेतल्यामुळे काँग्रेसला पुण्यामध्ये आणखी एक धक्का बसण्याची शक्यता

 

प्रेस मीडिया लाईव्ह :

पुणे  : काँग्रेसचे नेते दत्ता बहिरट यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची पुण्यात भेट घेत चर्चा केली आहे आहे. अजित पवारांच्या भेटीनंतर बहिरट राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याचा चर्चा आता राजकीय वर्तुळात जोरदार सुरु झाल्या आहेत.

दत्ता बहिरट हे पुण्याचे काँग्रेस पक्षाचे माजी नगरसेवक आहेत. बहिरट यांनी २०१९ आणि २०२४ साली काँग्रेसकडून शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघात निवडणूक लढवली होती. पण ते निवडून आले नाहीत. मात्र, दत्ता बहिरट यांचं शिवाजीनगर मतदार संघामध्ये मोठं वर्चस्व आहे. त्यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिल्यास स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर राजकीय तोटा होऊ शकतो.या सर्व घडामोडींवर दत्ता बहिरट म्हणाले की, 'माझ्या नातेवाईकांच्या घरी अजितदादा आले होते. तेव्हा मला जेवण्याचं निमंत्रण होतं, तिथे मी गेलो होतो, तिथेच अजित दादांची भेट झाली. मात्र, पक्ष प्रवेशाबाबत अद्याप तरी काही निर्णय झालेला नाही.'

गेल्या काही दिवसांमध्ये पुण्यात काँग्रेसला मोठी गळती लागली आहे. काही दिवसांपूर्वीच काँग्रेसचे माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केला. रवींद्र धंगेकर यांच्यानंतर काँग्रेसचे बडे आणि जेष्ठ नेते दत्ता बहिरट यांनी अजित पवार यांची भेट घेतल्यामुळे काँग्रेसला पुण्यामध्ये आणखी एक धक्का बसण्याची शक्यता आहे.

Post a Comment

Previous Post Next Post