राज्यपाल कोश्यारी, त्रिवेदींविरोधात संतापाची लाट,प्रेस मीडिया लाईव्ह :

महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांविषयी भाजपच्या नेत्यांकडून वारंवार अवमानकारक वक्तव्ये करण्यात येत आहेत. आता राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि भाजपचे प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनीही शिवरायांविषयी वादग्रस्त विधाने केली.याचे तीव्र पडसाद पश्चिम महाराष्ट्रात उमटले आहेत. कोल्हापूर, नगर, सातारा, मिरज, आजऱयात राज्यपाल कोश्यारी आणि त्रिवेदी यांच्या प्रतिमेला 'जोडे मारो' आंदोलन करण्यात आले. हातकणंगले तालुक्यातील हुपरीत प्रतीकात्मक पुतळ्यांचे दहन करण्यात आले, तर कोपरगावातील शिवसैनिकांनी राज्यपाल कोश्यारी आणि त्रिवेदी यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याचे निवेदन पोलिसांना दिले आहे. यावेळी संतप्त शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी करून कोश्यारी आणि त्रिवेदी यांचा निषेध व्यक्त केला. सातारा आणि सांगलीत काँग्रेसकडूनही 'जोडे मारो' आंदोलन करण्यात आले.

कोश्यारी, त्रिवेदी कोल्हापुरात आले तर शहर बंद करणार

भाजपचे लोक जाणीवपूर्वक आमच्या महापुरुष आणि दैवताचा अपमान करत आहेत. त्यामुळे भविष्यात त्रिवेदी आणि कोश्यारी येथे आल्यास कोल्हापूर बंद करू, असा इशारा शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार यांनी दिला आहे. कोल्हापुरातील ऐतिहासिक छत्रपती शिवाजी महाराज चौकात शिवसेनेकडून राज्यपाल कोश्यारी आणि त्रिवेदी यांच्या प्रतिमेला 'जोडे मार' आंदोलन करण्यात आले. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार, विजय देवणे, सुनील मोदी, मंजित माने, धनाजी यादव, विशाल देवकुळे, अवधूत साळोखे, दिनेश साळोखे, महिला संघटक स्मिता सावंत, पूनम फडतरे, स्वरूपा खुरंदळे, सुरेखा गाड्डीवडर, सुरेश कदम, दत्ता टिपूगडे, विनोद रोहिडा, सुहास डोंगरे, संतोष कांदेकर, युवराज खंडागळे, वैभव जाधव, संतोष चौगुले, दिलीप देसाई, दीपक पोपटानी, अवदेश करंबे, किरण पडवळ आदी शिवसैनिक उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post