महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आज राज्यपालांच्या भेटीला जाणार



मुंबई | सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयाचा रोष मराठा समाजाने ठाकरे सरकारवर काढला. त्यामुळे आता महाविकास आघाडी सरकारकडून नव्या प्रयत्न केले जात आहे. याच मुद्यावरून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आज (११ मे) सायंकाळी ५ वाजता राज्यपालांच्या भेटीला जाणार आहेत. कोरोना परिस्थिती आणि मध्यतंरी झालेल्या वादानंतर ही पहिल्यांदाच ही भेट होणार आहे.

सर्वोच्च न्यायालयानं मराठा आरक्षणाचा निर्णय घेण्याचा अधिकार राज्याला नसून तो केंद्र सरकार आणि राष्ट्रपतींनाच अधिकार असल्याचं सांगितलं होते. त्याप्रमाणे उद्धव ठाकरे आता थेट राष्ट्रपतींकडे हा मुद्दा मांडत आहेत.राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी आरक्षणाच्या मुद्दयावर पत्र लिहिलं आहे, ते पत्र राज्यपालाकडे सुपूर्द करण्यात येणार आहे.

राज्याच्या विधी मंडळात सर्वच राजकीय पक्षांनी एकमुखाने घेतलेल्या या निर्णयावर सर्वोच्च न्यायालयाने वरवंटा फिरवला असल्याची टीका मुख्यमंत्र्यांनी केली होती. आता पुन्हा मराठा आरक्षणाचा चेंडू केंद्राच्या कोर्टात ढकलण्यात येत आहेत. गेल्या वर्षभरानंतर राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आणि मुख्यमंत्र्यांमध्ये भेट होत आहे.

मध्यंतरी राज्यपाल नियुक्त आमदारांवरून वाद, विमान प्रवासाचा वाद, राज्यपालांनी लिहिलेलं पत्र, कोरोना आणि कंगाना, हिंदुत्व अशा अनेक मुद्यांवरून राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांमध्ये वाद पेटला होता. या वादानंतर मुख्यमंत्री आणि राज्यपाल यांच्यामध्ये संवाद दुरावला होता. आता वर्षभरानंतर पहिल्यांदाच ही भेट होत आहे. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष या भेटीकडे लागले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post