महापालिकेने शहरांमध्ये १९ क्वारंटाईन सेंटर सुरू करणार आहे. त्यापैकी चार सुरू झाले असून, पुढील पंधरा दिवसात १५ ठिकाणचे सर्व सेंटर कार्यान्वित होतील. .



पुणे : कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असताना त्यांना क्वारंटाईन करण्यासाठी महापालिकेने शहरांमध्ये १९ क्वारंटाईन सेंटर सुरू करणार आहे. त्यापैकी चार सुरू झाले असून, पुढील पंधरा दिवसात १५ ठिकाणचे सर्व सेंटर कार्यान्वित होतील. शहरात एकूण ६ हजार २५ जणांची व्यवस्था केली जाणार आहे, अशी माहिती महापालिका प्रशासनाने दिली आहे.

पुण्यामध्ये एका दिवसात कोरोना रुग्ण आढळण्याचे प्रमाण ६ हजारपेक्षा जास्त झाले आहे. एकाच कुटुंबातील एक पेक्षा जास्त जण कोरोना बाधित असून, त्यात गंभीर रुग्णांची संख्याही दिवसेंदिवस वाढत आहे. अशा परिस्थितीमध्ये सर्वांची व्यवस्था स्वतःच्या घरामध्ये होऊ शकत नाही.त्यामुळे महापालिकेने क्वारंटाईन सेंटर उघडण्यास सुरुवात केली आहे. 

शहरांमध्ये सध्या संत ज्ञानेश्वर वसतिगृह, रक्षक नगर, बनकर शाळा आणि गंगाधाम या चार ठिकाणी क्वारंटाईन सेंटर सुरू केले आहेत. तेथे १ हजार २५० जणांची क्षमता असून सध्या ६२२ रुग्ण उपचार घेत आहेत. महापालिकेने शहरातील व्यवहारावर नियंत्रण आणून गर्दी टाळण्याचा प्रयत्न केला आहे. तर दुसरीकडे रुग्णांसाठी ऑक्सिजन, व्हेंटिलेटर बेड उपलब्ध करणे, तसेच क्वारंटाईन सेंटर सुरू करणे अशी तयारी सुरू केली आहे. गेल्या वर्षी कोरोनाची पहिली लाट आली तेव्हा महापालिकेने शाळा, महाविद्यालये व वसतिगृह ताब्यात घेऊन विलगीकरण याची व्यवस्था केली होती. त्याच पद्धतीने आताही महापालिकेकडून कार्यवाही केली जात आहे.महापालिकेचे उपायुक्त राजेंद्र मुठे म्हणाले," 

शहरात सध्या चार ठिकाणी सेंटर सुरू आहेत आहेत. त्यानंतर आता शेतकी महाविद्यालय वसतिगृह, बालेवाडी स्पोर्ट हाॅस्टेल, एसएनडीटी महाविद्यालय कर्वे रस्ता, आंबेडकर वसतिगृह घोले रस्ता आणि आंबेडकर वसतिगृह येरवडा या पाच ठिकाणी यापूर्वीची व्यवस्था तयार आहे. तेथे १ हजार ९०० जणांची व्यवस्था केली जाईल. त्याच प्रमाणे शहरात इतर १० ठिकाणी क्वारंटाईन सेंटर प्रस्तावित असून ३ हजार १०० जणांची क्षमता तेथे आहे. सध्या १ हजार २५० जणांची व्यवस्था असून, पुढील पंधरा दिवसात पुणे शहरामध्ये ५ हजार बेड क्वारंटाईनसाठी उपलब्ध होतील.

Post a Comment

Previous Post Next Post