निवडणुकीपूर्वी पालकमंत्री सतेज पाटील आणि माजी खासदार धनंजय महाडिक गटामधील राजकारण तापू लागलं.





 कोल्हापूर :   कोल्हापूर मनपा निवडणुक  जवळ येऊन ठेपली आहे. या निवडणुकीपूर्वी पालकमंत्री सतेज पाटील आणि माजी खासदार धनंजय महाडिक गटामधील राजकारण तापू लागलं आहे. मंत्री सतेज पाटील जोपर्यंत घरफाळा भरत नाहीत, तोपर्यंत कुणीही भरु नका, असे आवाहन धनंजय महाडिक यांनी केले आहे. कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील आणि त्यांच्या कुटुंबियांच्या नावे डीवायपी मॉलमध्ये गाळा आहे.या गाळ्यातील घरफळ्यात महापालिकेची 15 ते 16 कोटी रुपयांची फसवणूक केली आहे. या गाळ्यासंदर्भातील माहिती सतेज पाटील यांनी लपवून ठेवली. तसेच महापालिकेची कोट्यावधी रुपयांची लूट केल्याचा गंभीर आरोप माजी खासदार धनंजय महाडिक यांनी केला आहे. या संदर्भात पत्रकार परिषद घेत कागदपत्रे जाहीर केली आहे.


घरफाळा न भरण्याचे महाडिकांचे आवाहन

सतेज पाटील यांनी येत्या दहा दिवसात फसवणूक केलेली ही रक्कम दंडासह वसूल करावी. अन्यथा कोल्हापूर महानगरपालिकेसमोर आंदोलन करु, असा इशारा धनंजय महाडिक यांनी दिला आहे. तसेच जोपर्यंत सतेज पाटील पूर्ण घरफळा भरत नाहीत, तोपर्यंत इतर नागरिकांनी घरफाळा भरून नये, असे आवाहन देखील त्यांनी केलं आहे.

सतेज पाटील सत्तेचा आणि पदाचा वापर करुन हा गैरकारभार केला आहे, असे देखील महाडिक म्हणाले. माझ्या मुलाच्या लग्नावेळी माझ्यावर दाखल झालेला गुन्हा राजकीय द्वेषातील असून यामागेही पालकमंत्री सतेज पाटील यांचा हात आहे, असा आरोप महाडिक यांनी केला आहे.

सतेज पाटील यांचा स्पष्टीकरण देण्यास नकार

दरम्यान या सर्व आरोपासंदर्भात पालकमंत्री सतेज पाटील यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी तुर्तास या विषयावर बोलायला नकार दिला आहे. यावर महापालिकेचे पदाधिकारी बोलतील असं स्पष्टीकरण त्यांनी दिलं आहे.

Post a Comment

Previous Post Next Post