वर्षभरात या शौचालयांची दुरवस्था , ठेकेदाराला पोसण्याचेच काम प्रशासनाकडून केले जात आहे.सांगली महापालिकेच्या 'स्वच्छ सर्वेक्षण' अभियाना अंतर्गत गतवर्षी शौचालये, स्वच्छतागृहांच्या दुरुस्तीवर कोटय़वधी रुपयांची उधळपट्टी झाली. वर्षभरात या शौचालयांची दुरवस्था झाली आहे. आता पुन्हा त्यावर खर्च केला जाणार आहे.ठेकेदाराला पोसण्याचेच काम प्रशासनाकडून केले जात असल्याचा आरोप सत्ताधारी भाजपसह विरोधी सदस्यांनी महासभेत केला. आयुक्त नितीन कापडणीस यांनी गतवर्षीच्या कामाच्या चौकशीसाठी नगरसेवकांची समिती नियुक्त करण्याची शिफारस केली. त्यावर महापौर गीता सुतार यांनीही त्याला हिरवा कंदील दाखविला.

महापौर गीता सुतार यांच्या कार्यकाळातील ही शेवटची महासभा होती.सभेत भाजपचे विजय घाडगे, उपमहापौर आनंदा देवमाने, काँग्रेसचे मंगेश चव्हाण, जगन्नाथ ठोकळे, राष्ट्रवादीचे विष्णू माने यांनी 'स्वच्छ सर्वेक्षण' अभियानातील कामावर शंका उपस्थित केली.

विजय घाडगे म्हणाले, गतवर्षी अभियानासाठी शौचालये, स्वच्छतागृहांची दुरुस्ती, रंगरंगोटी करण्यात आली. वर्षभरातच त्यांची दुरवस्था झाली आहे. त्याचा खर्च पाण्यात गेला आहे. महापालिकेच्या एखाद्या कामासाठी देखभाल-दुरुस्तीची जबाबदारी ठेकेदारावर असते. मग याच कामासाठी देखभालीची मुदत का निश्चित करण्यात आली नाही? शौचालयाचे काम करणाऱया ठेकेदाराने आता हॉटमिक्सचा प्लाण्ट उभारला आहे. केवळ दिखाव्यासाठी दुरुस्तीची कामे झाल्याचा आरोप केला.

उपमहापौर आनंदा देवमाने म्हणाले, शौचालय, स्वच्छतागृहांच्या दुरुस्तीवर 10 ते 15 कोटी रुपये खर्च करण्यात आले. आता या शौचालयांतील नळ गायब आहेत. भांडे, फरशा फुटल्या आहेत; दरवाजे गायब आहेत. केवळ ठेकेदाराला पोसण्याचाच उद्योग सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला.

मंगेश चव्हाण यांनी प्रभाग 15 मध्ये 'स्वच्छ सर्वेक्षण' अभियान आहे की नाही? असा सवाल केला. यावर आयुक्त नितीन कापडणीस म्हणाले, शौचालय दुरुस्तीच्या कामाबाबत आपणही नाराज आहोत. या कामावर गतवर्षी तीन ते चार कोटी रुपये खर्च केले आहेत. ही शौचालये अनेक वर्षे दुरुस्त करण्यात आली नव्हती. या कामाच्या फायली मंजुरीपासून ते त्याच्या दर्जा, बिल उतरविण्यापर्यंतची तपासणी करण्यासाठी नगरसेवकांची एक समिती नियुक्त करावी. या समितीच्या अहवालात दोषी आढळणाऱयांवर कारवाई केली जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली. महापौर गीता सुतार यांनीही त्याला सहमती दर्शवीत पाच नगरसेवकांची समिती स्थापन करण्याचा ठराव केला

Post a comment

0 Comments