पुणे जिल्ह्यातील सर्व शाळा येत्या 28 फेब्रुवारीपर्यंत बंदच राहणार , त्यामुळे पुन्हा ऑनलाइन शिक्षणपुणे -करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे पुणे जिल्ह्यातील सर्व शाळा येत्या 28 फेब्रुवारीपर्यंत बंदच राहणार आहेत. त्यामुळे शाळांना ऑनलाइन शिक्षण पुन्हा सुरुच ठेवावे लागणार आहे. पुणे जिल्ह्यात पाचवी ते आठवीच्या 1,830 तर नववी ते बारावीच्या 2,068 शाळा आहेत. या सर्वच बंद ठेवाव्या लागणार आहेत.

पहिल्या टप्प्यात इयत्ता नववी ते बारावीच्या शाळा 23 नोव्हेंबरपासून प्रत्यक्षात सुरू करण्यात आल्या. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात इयत्ता पाचवी ते आठवीच्या शाळा 27 जानेवारीपासून सुरू करण्यात आल्या.
विद्यार्थ्यांच्या उपस्थितीबाबत पालकांचे संमतीपत्रक सादर करण्याचे बंधन घातल्यामुळे आधी बहुसंख्य पालकांनी आपली मुले शाळेत पाठवलीच नव्हती.

त्यानंतर मात्र पालकांची मानसिकता बदल्यामुळे शाळांमधील विद्यार्थ्यांची उपस्थिती वाढली. शाळा सुरू झाल्यानंतर काही शिक्षक, विद्यार्थी करोनाबाधित आढळल्याचे प्रकार घडल्यामुळे संबंधित शाळा बंद ठेवाव्या लागल्या. पहिली ते चौथीच्या शाळा मात्र अद्याप सुरुच करण्यात आलेल्या नव्हत्या. त्यातच रुग्ण संख्या वाढल्याने पालकही चिंतेत आहेत.

जिल्हा प्रशासनाचे लेखी आदेश मिळाल्यानंतर शाळा बंदबाबत योग्य ती कार्यवाही करण्यात येणार आहे. शाळांना सूचना काढून कळवण्यात येणार आहे. शाळा बंद करण्यात आल्या तरी ऑनलाइन शिक्षण सुरूच ठेवण्यात येईल.
– सुनंदा वाखारे,माध्यमिक शिक्षणाधिकारी, जिल्हा परिषद

Post a comment

0 Comments