यही है अच्छे दीन ..?
मुंबई : देशभरात पेट्रोल आणि डिझेलच्या दराने सर्वसामान्यांचे हाल होताना पाहायला मिळत आहे. पेट्रोल डिझेलच्या दरवाढीवरूनच देशभरात दरवाढीविरोधात आंदोलने केली जात आहेत. दरम्यान, मुंबईत वाढत्या महागाईविरोधात युवासेनेकडून भाजप आमदार आशिष शेलार यांचा मतदारसंघ असलेल्या वांद्रे पश्चिम पोस्टरबाजी होत असल्याचे दिसत आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीविरोधात वांद्रे पश्चिम विधानसभा मतदारसंघातील पेट्रोल पंपांवर युवासेनाच्या कार्यकर्त्यांकडून पोस्टरबाजी करण्यात आली आहे. वांद्रे पश्चिम, खार आणि सांताक्रूझमधल्या सर्व पेट्रोल पंम्पांवर हे पोस्टर मध्यरात्रीच्या सुमारास लावण्याचे काम सुरु असल्याचे सांगण्यात येत आहे.

या पोस्टरमध्ये ‘यही है अच्छे दिन?’ असा प्रश्न उपस्थित करत मागील मोदी सरकार पहिल्या टर्मची आणि मोदी सरकारच्या दुसऱ्या टर्मच्या दरवाढीची तुलना करण्यात आली आहे. यात 2015 साल आणि 2021 मधल्या गॅस, पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतींच्या दरवाढीची तुलना केली गेली आहे. ज्यात मोठ्या प्रमाणात 2015 साल आणि 2021 सालच्या पेट्रोल, डिझेल आणि गॅसच्या दरांमध्ये फरक असल्याचे म्हणत युवासेना कार्यकर्तांनी केंद्र सरकारवर हल्लाबोल केला आहे. वाढत्या महागाईविरोधात निषेध नोंदवण्यासाठी ही पोस्टरबाजी केली जात असल्याचे वांद्र्यातील युवासेना कार्यकर्ते अक्षय पानवलकर यांनी स्पष्ट केले आहे. आताच्या महागाईच्या अच्छे दिन पेक्षा आधीचे वाईट दिवसही चालतील म्हणत युवासेना कार्यकर्ते श्याम जैस्वाल यांनी केंद्राला टोला लगावला आहे.

मागील अनेक दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात मोठी वाढ होत आहे. त्यात मागील 10 महिन्यात पेट्रोलच्या दरात 20 रुपये तर डिझेल 21 रुपयांनी महागले आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीतील दरवाढीचा फटका सामान्यांना बसत असल्याने केंद्र सरकारविरोधात संतापाचं वातावरण बघायला मिळत आहे.

Post a comment

0 Comments