प्रेस मीडिया लाईव्ह :
प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी
(९८५०८ ३०२९० )
prasad.kulkarni65@gmail.co
तोड सको तुम शाख से मुझको ऐसी तो मैं कली नही हूं
रोक सको तुम मेरी राहे इतनी उथली नदी नही हूं !
मेरी बाते सिधी साधी मक्कारी से भर हूए हो तुम
मेरे पास तो सच्चाई है झूट कपट से बंधी नही हूं !
बुने हे मैने अपने सपने खुद ही अपनी राह बनाई
राहसे तुम भटका दो मुझ को नींद मे ऐसी घीरी नही हूं !
किंवा
आंख मे आसू ठहरा है
दिल पर गम का पहरा है !
एक दिन भर ही जायेगा
घाव जो दिल मे गहरा है l
मेरी बात पे क्यूँ चूप है
क्या तू गुंगा बहरा है !
अशा सुंदर गझला लिहीणाऱ्या काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या, माजी केंद्रीय मंत्री गिरीजा व्यास या १ मे २०२५ रोजी कालवश झाल्या. भारतीय राजकारणातील एक अतिशय अभ्यासू व्यक्तिमत्व, विचारवंत, कवयित्री, गझलकारा अशी त्यांची ओळख ओळख होती. अहेसास के पार, सीप समुद्र और मोती, नॉस्टॅल्जिया अशी आठ पुस्तके त्यांनी लिहिली होती. हिंदी, उर्दू आणि इंग्रजी भाषेत त्यांनी अतिशय उत्तम दर्जाची कविता लिहिली. उदयपूर येथे राहत होत्या. आपल्या राहत्या घरी ३१ मार्च २०२५ रोजी आरती करत असताना त्यांच्या ओढणीला ज्योत लागून तीने पेट घेतला. त्या मोठ्या प्रमाणात होरपळल्या गेल्या. जवळजवळ ९० टक्के त्या भाजल्या गेल्या.गेली दोन-तीन वर्षे त्या गुडघेदुखीच्या त्रासाने त्रस्त होत्या. त्याला खुर्चीवरून उठण्या बसण्यासाठी ही मदतनीसाची गरज लागायची.त्यांच्यावर आमदाबाद येथील रुग्णालयात उपचार केले गेले .मात्र अखेर अहमदाबाद येथे १ मे २०२५ रोजी त्या कालवश झाल्या. केंद्रीय पातळीवरील राजकारणात राहूनही आपल्यातील कवी मनाला, लेखणीला, प्रतिभेला कागदावर उतरवून न्याय देणारी एक दुर्मिळ विदुषी अशीही त्यांची ओळख आहे. हा लेखन प्रपंचही त्यांच्या गझलकार कवी या अंगाचीही ओळख व्हावी याच हेतूने.
इक तू ही बरबाद नही
कोई यहा आबाद नही !
मेरा दुख है मैं जानू
तुझसे तो फरीयाद नही !
डर मत ए पंछी मुझसे
साथी हू सय्याद नही !
अशी तरल रचना करणाऱ्या गिरिजा व्यास यांचा ८ जुलै १९४६ रोजी राजस्थानातील उदयपूर येथे जन्म झाला. त्यांचे वडील कृष्ण शर्मा व आई जमुना देवी हे स्वातंत्र्य आंदोलनात सहभागी होते. साहजिकच काँग्रेस पक्षाच्या , गांधीजींच्या विचारांचे बाळकडू त्यांना घरातूनच मिळाले आणि ती विचारधारा त्यांनी कायम आपली मानली. त्याच विचारधारेचे सक्रिय राजकारण ही त्यांनी केले.गिरीजा व्यास लहानपणापासूनच अतिशय अभ्यासू होत्या. उदयपूर विद्यापीठातून त्यांनी तत्त्वज्ञान हा विषय घेऊन एम. ए.केलेले होते. तर दिल्ली विद्यापीठातून पीएचडी मिळवलेली होती. " गीता आणि बायबल यांचा तुलनात्मक अभ्यास "यावर त्यांच्या संशोधन करून त्यांनी प्रबंध लिहिला होता. त्या अविवाहित होत्या.
आखो मे नये रंग सजाने नही उतरे
एक उम्र हुई ख्वाब सुहाने नही उतरे !
आकाश मे उडते रहे पानी के परिंदे
खेतो की मेरे प्यास बुझाने नहीउतरे!
हर मौज था बेचैन बहकने को कभी से
खुदा आप ही दरिया में नहाने नही उतरे !
असे लिहिणाऱ्या गिरिजा व्यास १९८५ मध्ये त्या उदयपूरमधून विधानसभेवर निवडून गेल्या. राजस्थानचे मंत्रिमंडळात त्यांनी काही खाती सांभाळली. १९९१ पासून उदयपूर लोकसभा मतदारसंघातून त्या सलग चार वेळा आणि चितोडगड मतदारसंघातून एकदा अशा पाच वेळा त्या खासदार म्हणून निवडून आल्या होत्या. त्यांनी नरसिंहराव व मनमोहन सिंग पंतप्रधान असताना त्यांच्या मंत्रिमंडळात केंद्रीय माहिती आणि प्रसारण उपमंत्री, गृहनिर्माण आणि शहरी दारिद्र्य निर्मूलन मंत्री अशी काही खाती केंद्रीय मंत्री म्हणून सांभाळली. तसेच त्यांनी राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्ष म्हणूनही काम केले. त्यावेळी त्यांनी बालविवाह झाला असला तर तो सज्ञान झाल्यावर रद्द ठरवता येऊ शकेल असा बालविवाह प्रतिबंधक कायदा असला पाहिजे, प्रत्येक पोलीस ठाण्यात महिलांसाठी स्वतंत्र टेबल असले पाहिजे ,महिलांना चेटकिण ठरवणारी प्रथा कायद्याच्या कक्षेत आणून तो गुन्हा मानला पाहिजे अशी महिलांच्या बाजूने योग्य असणारी भूमिका मांडली होती. मात्र त्यावेळीही त्यांच्यावर कठोर टीका झालेली होती.अखिल भारतीय महिला काँग्रेसचे अध्यक्ष, राजस्थान प्रदेश काँग्रेस अध्यक्ष म्हणूनही त्या कार्यरत होत्या. अखिल भारतीय काँग्रेस समितीच्या त्या सदस्य होत्या.तसेच काँग्रेसच्या मीडिया विभागाच्या अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम केले होते. केंद्रीय मंत्री असताना पेट्रोल पंप वाटप प्रकरणी त्यांच्यावर आरोप करण्यात आले होते. सर्वोच्च न्यायालयाच्या दोन न्यायाधीशांच्या पिठाने त्यांनी दिलेले काही परवाने रद्द केले होते.
आगीत नव्वद टक्के होरपळूनही त्यांनी दोन महिने मृत्यूशी झुंज दिली. एक स्वतंत्र विचाराची महिला असलेल्या गिरिजा व्यास यांनी आपल्या कवितेतून मानवी मूल्ये ,सामाजिकता जपण्याचा प्रयत्न केला. मानवी मनातील भावआंदोलने साध्या सोप्या पण तलम शब्दात त्यांनी मांडली.
खंजर को रग ए जांसे गुजरने नही देखा
वो शक्स मुझे चैन से मरने नही देखा !
फिर कोई नही आस वो दे जायेगा दिलको
टूटे हूए शीशे को बिखरने नही देखा !
हर शक्स को मेहमान बना लेगा वो लेकिन
मुझको कभी घर अपने ठहरने नही देगा!
असे लिहिणाऱ्या गिरिजा व्यास यांना विनम्र अभिवादन...!
(लेखक समाजवादी प्रबोधिनी,इचलकरंजीचे १९८५ पासूनचे कार्यकर्ते आहेत.प्रबोधिनीच्या वतीने गेली पस्तीस वर्षे नियमितपणे प्रकाशित होणाऱ्या ‘प्रबोधन प्रकाशन ज्योती ‘मासिकाचे संपादक आहेत. तसेच लेखक,कवी,गझलकार म्हणून सुपरिचित आहेत.)