प्रेस मीडिया लाईव्ह :
महाराष्ट्र ऑटो रिक्षा चालक-मालक संघटनेनं 21 मे रोजी एकही रिक्षा किंवा टॅक्सी धावणार नाही राज्यव्यापी बंदची हाक देत तीव्र आंदोलनाचा निर्णय घेतला आहे.राज्य सरकारने ई-बाईक टॅक्सीला परवानगी दिल्याने 15 लाख रिक्षाचालकांचा रोजगार धोक्यात येईल, असा गंभीर आरोप संघटनेनं केला आहे. त्यामुळे या निर्णयाविरोधात सर्व प्रादेशिक परिवहन कार्यालयासमोर आंदोलन छेडण्यात येणार आहे.
या आंदोलनात मुंबईसह संपूर्ण कोकण, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा आणि खानदेशातील रिक्षा संघटनांचा सहभाग राहणार आहे. ई-बाईक टॅक्सी सेवेमुळे पारंपरिक रिक्षा व्यवसायावर परिणाम होणार असून बेरोजगारीचा धोका अधिक वाढणार आहे, असं मत रिक्षाचालकांनी मांडलं आहे.
राज्य शासनाने बेरोजगार युवकांना स्वयंरोजगार देण्याच्या उद्देशाने ई-बाईक टॅक्सीला परवानगी दिली आहे. मात्र, या निर्णयामुळे पारंपरिक रिक्षा व्यवसायाला मोठा धोका निर्माण होतो आहे, असं रिक्षा संघटनांचं म्हणणं आहे. ई-बाईक टॅक्सी सुरू झाल्यास ग्राहक त्याकडे वळतील आणि पारंपरिक रिक्षांना मागणी घटेल, असं स्पष्ट करण्यात आलं आहे. या संदर्भात सरकारने कोणतीही पूर्वचर्चा न करता थेट निर्णय घेतल्याने असंतोष व्यक्त होत आहे.
संघटनेनं सांगितलं की, सरकारकडून नेमलेल्या समितीसमोर त्यांनी आपली भूमिका मांडली होती. मात्र, तरीदेखील सरकारनं एकतर्फी निर्णय घेत ई-बाईक टॅक्सी सेवा मंजूर केली. त्यामुळे 15 लाख रिक्षाचालकांचा भविष्य अंधारात टाकल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
रविवार, 27 एप्रिल रोजी राज्यभरातील प्रमुख रिक्षा संघटनांची बैठक पार पडली. या बैठकीत 21 मे रोजी सर्व आरटीओ कार्यालयासमोर निदर्शने करण्याचा निर्णय घेण्यात आला. यात मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद, कोल्हापूर, नाशिकसह सर्व प्रमुख शहरांचा सहभाग राहील. आंदोलनामुळे त्या दिवशी प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागू शकतो.
दरम्यान, प्रशासनाने या संभाव्य आंदोलनाला कशा पद्धतीने सामोरे जाणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. आंदोलन शांततेत पार पडावा आणि सर्वसामान्य नागरिकांचे हाल टळावेत, यासाठी पोलीस आणि प्रशासन काय उपाययोजना करतात हे महत्त्वाचे ठरणार आहे.