पुण्यातील तीन प्रमुख ठिकाणी बॉम्बस्फोट करण्याची धमकी , फोन करणाऱ्याचा शोध सुरू

प्रेस मीडिया लाईव्ह :

 महाराष्ट्र पोलिसांना  बॉम्बस्फोटाची धमकी देणारा एक फोन आला, ज्यामुळे शहरात घबराट पसरली. फोन करणाऱ्याने पुण्यातील पुणे रेल्वे स्टेशन, भोसरी आणि येरवडा येथील चैतन्य महिला मंडळ परिसरात बॉम्बस्फोट करण्याची धमकी दिली होती. बॉम्बस्फोट घडवण्याची धमकी देणारा निनावी फोन कॉल बुधवारी (दि. २०) रात्री पुणे पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला आल्याने खळबळ उडाली.या धमकीनंतर पोलिस यंत्रणा तात्काळ सतर्क झाली असून, संबंधित ठिकाणी बॉम्ब शोध पथक (बीडीडीएस) आणि श्वान पथकाने तपासणी करत परिसर पिंजून काढला. प्राथमिक तपासात हा कॉल खोडसाळपणाचा असल्याचा संशय असून, पोलिस कॉलरचा शोध घेत आहेत.

नियंत्रण कक्षाला रात्री आलेल्या निनावी कॉलमध्ये, पुणे रेल्वे स्टेशन, भोसरी आणि येरवड्यातील चैतन्य महिला मंडळ येथे स्फोट घडवण्याची धमकी देण्यात आली. कॉलरने ही माहिती सांगून फोन कट केला. नियंत्रण कक्षाने तात्काळ बंडगार्डन, भोसरी आणि येरवडा पोलीस ठाण्यांना सूचित केले.

यानंतर पोलिस, बीडीडीएस आणि श्वान पथकाने संबंधित ठिकाणी तपासणी केली. बंडगार्डन पोलिसांनी रेल्वे स्टेशन परिसराची कसून झाडाझडती घेतली. दरम्यान, कॉल करणाऱ्या व्यक्तीचा मोबाइल क्रमांक त्वरित ट्रेस करण्यात आला. हा क्रमांक एका महिलेच्या नावावर असून, तो मोबाइल उल्हासनगर-कुर्ला प्रवासात हरवल्याचे समोर आले आहे. पोलिसांना संशय आहे की, या मोबाइलचा वापर करून दुसऱ्या व्यक्तीने हा खोडसाळपणा केला असावा. बंडगार्डन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविंद्र गायकवाड यांनी सांगितले की, कॉलरचा शोध घेण्यासाठी तपास सुरू आहे.

Post a Comment

Previous Post Next Post