प्रेस मीडिया लाईव्ह :
पुणे : बावधन येथे राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याच्या सुनेची आत्महत्या केल्याने खळबळ उडाली असून ही महिला अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते राजेंद्र हागवणे यांची सून होती.महिलेच्या पतीने तिच्या चारित्र्यावर संशय घेतला होता, तसेच तिला आणि तिच्या कुटुंबाला हुंड्यासाठी त्रास दिला जात होता, असा आरोप तिच्या वडिलांनी केला आहे. या आरोपांमुळेच तिने आत्महत्या केल्याचे तिच्या वडिलांनी पिंपरी-चिंचवड पोलिसांकडे दाखल केलेल्या तक्रारीत म्हटले आहे.
या बाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत्यूनंतर महिलेच्या शरीरावर अनेक ठिकाणी जखमांच्या खुणा आढळून आल्या. यापूर्वीही तिने याच कारणांमुळे आत्महत्येचा प्रयत्न केला होता. आनंद कासपटे (वय ५१), रा. वाकड यांनी बावधन पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यांची मुलगी वैष्णवी हिने गळफास घेऊन आत्महत्या केली.
बावधन पोलिसांनी या प्रकरणी तिचा पती शशांक हागवणे, सासरे राजेंद्र हागवणे, दीर सुशील हागवणे, सासू आणि नणंद यांच्याविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. हे सर्वजण भूकुमचे रहिवासी आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शशांक आणि वैष्णवी यांचे एप्रिल २०२३ मध्ये प्रेमविवाह झाले होते. मात्र, हागवणे कुटुंबियांनी लग्नानंतरही हुंड्याची मागणी सुरूच ठेवली होती.
ऑगस्ट २०२३ मध्ये वैष्णवी गर्भवती असताना, तिच्या पतीने हे मूल आपले नसल्याचे सांगत पितृत्व नाकारले होते. तिला शारीरिक त्रासही दिला जात होता. हुंड्यासाठी होणारा सततचा छळ आणि चारित्र्यावर घेतले जाणारे आक्षेप यामुळे ती तिच्या माहेरी निघून गेली होती. मानसिक त्रासाला कंटाळून तिने नोव्हेंबर २०२३ मध्ये विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. उपचारानंतर तिला हागवणे कुटुंबीयांनी पुन्हा घरी आणले. मात्र, हुंड्याच्या नावाखाली आणि कुटुंबाच्या प्रतिष्ठेच्या नावाखाली तिचा छळ सुरूच राहिला. तिला सतत टोमणे मारले जात होते आणि अपमानित केले जात होते. १६ मे रोजी वैष्णवी आणि तिच्या पतीमध्ये भांडण झाल्यानंतर, तिच्या कुटुंबीयांनी तिला वारंवार संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र तिने प्रतिसाद दिला नाही. अखेर कासपटे कुटुंबीयांना त्यांची मुलगी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे सांगण्यात आले. तिच्या शरीरावर जखमांच्या खुणा आढळून आल्या. बावधन पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.