राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवक प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण यांनी दिली माहिती .
प्रेस मीडिया लाईव्ह :
चंद्रशेखर पात्रे :
पिंपरीतील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे मुळशीतील पदाधिकारी राजेंद्र हगवणे यांची सून वैष्णवी हगवणे यांच्या मृत्यूमुळे संपूर्ण राज्यात खळबळ उडाली आहे. गेल्या सात दिवसांपासून या प्रकरणाची चर्चा राज्यभर सुरु आहे. याप्रकरणी तिचा पती, सासू व नणंद यांना अटक केली असून 26 मे पर्यंत त्यांना पोलिस कोठडी सुनावली आहे. तर पोलिस राजेंद्र हगवणे यांचा शोध घेत आहे. दरम्यान त्यांच्यावरती पक्षानेही कारवाई केली आहे. राजेंद्र हगवणे यांना पक्षातून बडतर्फ केल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवक प्रदेशाध्यक्ष, सुरज चव्हाण यांनी दिली आहे.
अजित पवारांनी दिले निर्देश
अजित पवार यांचं पुणे सीपी यांच्यासोबत बोलणं झालं आहे. अजित पवारांनी दोषींवर कडक कारवाई करण्याचे निर्देश दिलेले आहेत. राजेंद्र हगवणे यांना पक्षातून बडतर्फ करण्यात आलं आहे. अजित पवार पोलिसांना कायम म्हणतात, चुकीचं काम करणाऱ्याला टायरमध्ये घालून मारा. मग तो कोणत्याही पक्षाचा असो. त्यामुळे याही प्रकरणात दोषींवर कडक कारवाई होईल अशी ग्वाहीदेखील त्यांनी यावेळी दिली आहे.
तसेच, राजेंद्र हगवणे यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी कोणताही संबंध नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून त्यांना बडतर्फ करण्यात आलेलं आहे. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अनेक सभांच्या माध्यमातून कार्यकर्त्यांना संदेश दिला होता, माझा कोणताही कार्यकर्ता चुकीचा वागला तर त्याला टायरमध्ये घेऊन मारावा अशा पद्धतीच्या सूचना अजित दादांनी वारंवार सभेमध्ये दिलेले आहेत. आज या हगवणे प्रकरणांमध्ये सुद्धा अजितदादांनी पुणे सीपींशी बोलून तात्काळ त्यांच्यावरती कारवाई करण्यात यावी असे आदेश दिले आहेत, माध्यमांना माझी विनंती आहे, या प्रकरणाला पक्षीय रूप न देता याला न्यायाच्या भूमिकेतून पहावं राष्ट्रवादी काँग्रेसची ही भूमिका आहे, राजेंद्र हगवणे आणि त्यांच्या कुटुंबीयांवरती कडक कारवाई व्हावी.