मराठी ही जगातील दहावी मोठी भाषा आहे...प्रा.डॉ.अविनाश सप्रे



फोटो : 'मराठी भाषा साहित्य आणि संस्कृती 'या विषयावर बोलताना प्रा.डॉ. अविनाश सप्रे मंचावर वैशाली नायकवडी, प्राचार्या डॉ. त्रिशला कदम ,जिल्हा ग्रंथालय अधिकारी अपर्णा वाईकर आणि प्रसाद कुलकर्णी


प्रेस मीडिया लाईव्ह :

 इचालकरंजी ता.२७, मातृभाषेच्या अभिमानाशिवाय जागतिक स्तरावर पुढे जाता येत नाही. ज्याची मातृभाषा उत्तम तो अन्य कोणतीही भाषा अवगत करू शकतो.प्रत्येक भाषा सामर्थ्यपूर्ण व सौंदर्यपूर्ण असते.मराठी भाषेला शेकडो बोलीभाषा आहेत.मराठी भाषा बोलणाऱ्यांची संख्या भाषिक विचारामध्ये संख्यात्मक दृष्ट्या जगामध्ये दहाव्या क्रमांकावर आहे. जगातील एक महत्त्वाची भाषा म्हणून तिचे स्थान व महत्त्व वेगळे आहे. दोन हजाराहून अधिक वर्षाची परंपरा असलेली मराठी भाषा ही संविधानांने मंजूर केलेल्या बावीस भाषांमधील एक भाषा आहे. अशा आपल्या संपन्न भाषेला अभिजात भाषेचा दर्जा लवकरात लवकर मिळाला पाहिजे अशी मागणी आज कवी कुसुमाग्रज यांच्या जन्मदिनी आणि मराठी भाषा गौरव दिली आपण केली पाहिजे. 

मराठी भाषा, साहित्य आणि संस्कृती यांचे भारतीय व वैश्विक पटलावर महत्त्वपूर्ण स्थान आहे असे मत ख्यातनाम साहित्यिक व समीक्षक प्रा. डॉ.अविनाश सप्रे यांनी व्यक्त केले .ते महाराष्ट्र शासनाचा मराठी भाषा विभाग ,जिल्हा मराठी भाषा समिती आणि जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने आणि श्रीमती आ.रा.पाटील कन्या महाविद्यालयाच्या सहकार्याने आयोजित मराठी भाषा गौरव दिन समारंभात प्रमुख व्याख्याते म्हणून बोलत होते .'मराठी भाषा साहित्य आणि संस्कृती 'हा त्यांच्या व्याख्यानाचा विषय होता.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा ग्रंथालय अधिकारी श्रीमती अपर्णा वाईकर होत्या. तर प्राचार्या डॉ. त्रिशला कदम प्रमुख पाहुण्या होत्या. प्रारंभी कविवर्य कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. महाविद्यालयाचे मराठी विभाग प्रमुख प्रा. डॉ. सुभाष जाधव यांनी स्वागत केले. जिल्हा मराठी भाषा समितीचे सदस्य प्रसाद कुलकर्णी यांनी प्रास्ताविक केले व पाहुण्यांची ओळख करून दिली. यावेळी प्रा.मोहन पुजारी ,वैशाली नायकवडी,पाटलोबा पाटील, रामचंद्र ढेरे ,दादासाहेब जगदाळे आदि साहित्यिकांचा सन्मानचिन्ह व ग्रंथ भेट देऊन सत्कार करण्यात आला.

प्रा.डॉ. अविनाश सप्रे म्हणाले, भाषा भौगोलिक परिसर उलगडून दाखवीत असते. समाजातून साहित्य निर्माण होत असते .साहित्याचे वाचन म्हणजे जगण्याचे वाचन असते. जगण्यात विचार प्रवणता, संवेदनशीलता आणायची असेल तर वाचनाची नितांत गरज आहे. डॉ.अविनाश सप्रे यांनी आपल्या अतिशय अभ्यासपूर्ण व प्रभावी मांडणीमध्ये प्राचीन काळ, मध्ययुगीन काळ, अर्वाचीन काळ,संत साहित्य ते आजचं वर्तमानातील साहित्य याचा पट उलगडून दाखविला.  साहित्य समाज आणि संस्कृती या क्षेत्रातील विविध मान्यवरांच्या योगदानाचा उल्लेख करत त्यांनी त्याचे महत्त्व अधोरेखित केले. चक्रधर ,महानुभाव, भक्ती संप्रदाय ,संत साहित्य, विद्रोही साहित्य या साऱ्याच्या त्यांनी आढावा घेतला. तसेच कुसुमाग्रजांसह महात्मा फुले,नामदार गोपाळ कृष्ण गोखले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर ,न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे,नामदेव ढसाळ,नारायण सुर्वे ,विजय तेंडुलकर, यांच्यासह शरद बाविस्कर यांच्यापर्यंत अनेकांच्या कार्याचे व लेखनाचे महत्त्व अधोरेखित केले.

कार्यक्रमाच्या अध्यक्ष जिल्हा ग्रंथालय अधिकारी अपर्णा वाईकर म्हणाल्या , मराठी भाषेचा गौरव हा दररोज झाला पाहिजे. मराठी भाषा साहित्य समाज व संस्कृती यांच्या जागरातून आपण अधिक विस्तारित व व्यापक होऊ शकतो.महाराष्ट्र शासनाचा मराठी भाषा विभाग, जिल्हा मराठी भाषा समिती आणि जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय त्यासाठी प्रयत्न करत असते .प्रत्येक सजग यी नागरिकाने आपल्या व आपल्या कुटुंबाच्या विकासासाठी आणि संवेदनाजागृतीसाठी सार्वजनिक ग्रंथालयाचे सभासद झाले पाहिजे. मराठी भाषा गौरव दिनाच्या अनेक उपक्रमापैकी हा ही एक महत्त्वाचा उपक्रम ठरू शकतो.

प्रमुख उपस्थित प्राचार्या डॉ.त्रिशला कदम म्हणाल्या,कविवर्य कुसुमाग्रज जयंतीचा व मराठी भाषा गौरव दिनाचा हा शासकीय संस्थांचा कार्यक्रम आमच्या महाविद्यालयात होतो आहे याचा मनस्वी आनंद आहे. मराठी भाषा गौरव दिन साजरा करत असताना विद्यार्थिनींनी अवांतर वाचन मोठ्या प्रमाणात करण्याचा संकल्प केला पाहिजे. या कार्यक्रमास प्रा. डॉ.प्रतिमा सप्रे,सौदामिनी कुलकर्णी यांच्यासह महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक वृंद आणि विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. प्रा.डॉ.प्रियांका कुंभार व प्रा. संगीता पाटील यांनी सूत्रसंचालन केले.



Post a Comment

Previous Post Next Post