प्रेस मीडिया लाईव्ह :
इचलकरंजी : सद्यःस्थितीत निर्माण झालेल्या युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शासन निर्देशानुसार महानगरपालिका आयुक्त पल्लवी पाटील यांनी शहरातील नागरिकांना आपत्कालीन परिस्थितीमध्ये काय करावे अथवा काय करू नये तसेच कोणती खबरदारी घ्यावी याची माहिती मिळणे गरजेचे असल्याने शहरात मॉक ड्रिलचे आयोजन करणेच्या सूचना महानगर पालिका आपत्ती व्यवस्थापन विभागात दिलेल्या होत्या.
या अनुषंगाने आज शनिवार दि. १० मे रोजी इचलकरंजी महानगरपालिकेचे राजर्षी छत्रपती शाहू हायस्कूल व रविंद्रनाथ टागोर विद्यानिकेतन शाळा क्रं २७ याठिकाणी जम्मू काश्मीर, पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर मॉक ड्रिल *(Defence Mokdrill)* घेण्यात आले.
यामध्ये प्रामुख्याने अतिरेकी बॉम्ब हल्ला अथवा फायरिंग झाल्यानंतर आपण आपत्कालीन परिस्थितीत आपत्ती व्यवस्थापन कशा प्रकारे राबविले पाहिजे व त्यामध्ये कोणती खबरदारी घेतली पाहिजे या विषयीची प्रात्यक्षिकासह सविस्तर माहिती इचलकरंजी महानगर पालिका आपत्ती व्यवस्थापन विभाग प्रमुख संजय कांबळे यांनी माहिती शाळेतील मुला- मुलींना दिली.
या मॉक ड्रिल मध्ये राजर्षी शाहू हायस्कूलचे मुख्याध्यापक शंकर पोवार , पी.ए.पाटील , कुंभार सर आदी शिक्षक- शिक्षिकांसह शाळेतील विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला.
यावेळी महापालिका अग्निशमन दलाचे जवान कर्मचारी प्रेम प्र. गागडे, फायर-जवान तुषार यो.हेगडे यांच्यासह वाहन विभागाकडील कंत्राटी कर्मचारी सौरभ राऊत, कार्तिक जगताप,वैभव पाटील,अक्षय धूपदाळे, रोहित जाधव, सतिश जाधव,अक्षय आळंदे सचिन नगरकर,खाजू कलावंत यांच्यासह महापालिकेचे कर्मचारी उपस्थित होते.