पुणे शहरात रिक्षाचालकांची मनमानी वाढली ,भाडे नाकारण्याचे प्रमाण सुद्धा वाढले आहे.प्रेस मीडिया लाईव्ह :

पुणे शहरात रिक्षाचालकांची  मनमानी वाढली असून भाडे नाकारण्याचे प्रमाण सुद्धा वाढले आहे., तसेच मीटर दरापेक्षा अधिक पैसे घेण्याचे प्रमाणही वाढले आहे. त्यामुळे प्रवाशांची आर्थिक लूट तर होत आहेच; पण गरजेच्या वेळेस भाडे नाकारल्यामुळे प्रवाशांना इच्छित स्थळी जाण्यास अडचणी येत आहे. याकडे वाहतूक शाखा आणि प्रादेशिक परिवहन विभाग दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरिक करत आहेत.

सार्वजनिक वाहतुकीच्या साधनांमध्ये दिवसेंदिवस रिक्षा आणि टॅक्‍सी यांचे महत्व वाढत आहे. घरापासून थेट इच्छित स्थळी पोहचण्यासाठी आणि अगदी गल्लीबोळात रिक्षा जात असल्याने नागरिक बऱ्याच वेळा रिक्षाचा वापर करतात. पण जर हेच रिक्षाचालक जेव्हा प्रवाशांकडून जादाचे भाडे आकारतात किंवा भाडे नाकारतात तेव्हा नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागतो. पण या मुजोर रिक्षाचालकांविरोधात तक्रार करायची कुठे? खरंच या रिक्षाचालकांवर कारवाई होते का? किंवा मोटर परिवहन कायद्यातील दंडात्मक तरतूद काय आहे? यांसारखे अनेक प्रश्‍न नागरिकांना पडतात. पण नागरिकही या फंदात पडत नाहीत. याचाच गैरफायदा रिक्षाचालक घेतात. त्याच्यांवर ना वाहतूक पोलिसांचा धाक ना आरटीओचा. त्यामुळे ते सरळ सरळ प्रवाशांशी गैरवर्तन करतात किंवा भाडे नाकारतात. तसेच रात्रीच्या वेळेस पीएमपी बस सेवा बंद असल्याने नागरिकांकडून मीटर दरापेक्षा अधिकचे पैसे घेऊन त्यांची लूट करतात.प्रवाशांनी रिक्षा दरपत्रकाचा वापर करावा

शहरातील नागरिकांना किंवा इतर जिल्ह्यातून आलेल्या नागरिंकाना जर रिक्षा भाडे जास्त आकारले असल्याची शंका आली असेल तर नागरिकांनी बारकोड असलेला दरपत्रक दाखवण्याची मागणी रिक्षाचालकाकडे करावी आणि नागरिकांनी देखील दरपत्रकाचा जास्तीत जास्त वापर करावा, असे आवाहन आरटीओकडून करण्यात आले आहे.

रिक्षाचालकांने जर जादाचे भाडे आकारले असेल किंवा भाडे नाकारले असेल, तर नागरिकांनी आरटीओला ई-मेलद्वारे किंवा फोन करून किंवा प्रत्यक्षात आरटीओ कार्यालयात येऊन रिक्षा नंबर आणि घटना कुठे घडली, याची सविस्तर माहिती द्यावी. आम्ही त्या रिक्षाचालकांवर दंडात्मक कारवाई करतो.

-संजीव भोर, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी

Post a Comment

Previous Post Next Post