मदनलाल बोहरा हे सेवाव्रती कर्मयोगी - सुरेश कोळी



प्रेस मीडिया लाईव्ह :

इचलकरंजी शहराच्या औद्योगिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक वाटचालीत स्वतःचा विधायक ठसा उमटवणारे कर्मयोगी म्हणून स्वर्गीय मदनलाल बोहरा यांची महाराष्ट्राला ओळख आहे .स्वदेशी मिल आणि अनेक व्यापारी कंपन्यांच्या माध्यमातून हजारो कुटुंबीयांना रोजगार मिळवून देण्याचे कार्य त्यांनी केले . ना. बा. एज्युकेशन सोसायटी, मेडता संस्कृत महाविद्यालय अशा अनेक संस्थांचे नेतृत्व करून त्यांना उच्च स्थानी पोहोचवण्याचा प्रयत्न केला. वक्तशीरपणा , अखंड कष्ट आणि समाजभान या त्रिसूत्रीनुसार काम करतानाच आध्यात्मिकताही त्यांनी जोपासली " असे मनोगत सुरेश कोळी यांनी व्यक्त केले. 

इचलकरंजी येथील श्रीमंत गंगामाई गर्ल्स हायस्कूलमध्ये आयोजित स्वर्गीय मदनलाल बोहरा यांच्या ९० व्या जयंती निमित्त कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रशालेच्या उपमुख्याध्यापिका सौ. एस. एस. भस्मे  होत्या. 

आपल्या अध्यक्षीय मनोगतात एस.एस.भस्मे म्हणाल्या ,स्वर्गीय मदनलाल बोरा हे द्रष्टे कर्मयोगी होते. आपल्या सर्वांचे मार्गदर्शक होते. त्यांच्या योगदानामुळेच ना. बा. एज्युकेशन संस्थेची राज्यात वेगळीच ओळख निर्माण झाली आहे.

 प्रारंभी संस्थेचे विश्वस्त किशन बोहरा, महेश बांदवलकर आणि मान्यवर पदाधिकार्‍यांच्या हस्ते स्व. मदनलाल बोहरा यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. स्वागत आणि प्रास्ताविक पर्यवेक्षक व्ही. एन. कांबळे यांनी केले. याप्रसंगी घेण्यात आलेल्या पुस्तक अभिप्राय स्पर्धेतील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षिस वितरण करण्यात आले. विश्वस्त किशन  बोहरा, प्रा. शेखर शहा यांनी मनोगत व्यक्त केले.

या कार्यक्रमास विश्वस्त महेश बांदवलकर, सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थिनी उपस्थित होते.  कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. आर. एस. रॉड्रिग्यूस्  यांनी केले. 

आभार प्रदर्शन पर्यवेक्षक एस. व्ही.  पाटील यांनी केले  

संगीत शिक्षिका सौ. ए. ए. रानडे यांच्या पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.

Post a Comment

Previous Post Next Post