शेळ्यामेंढ्याचा बाजार आटपाडीच्या ओढ्यातच भरवा ..सादिक खाटीक यांची मागणी . .



प्रेस मीडिया लाईव्ह :

आटपाडी :  अनेक राज्यात प्रसिद्ध असणारा आटपाडीचा शनिवारचा शेळ्यामेंढ्याचा बाजार पुर्ववत आटपाडीच्या विस्तीर्ण ओढा पात्रातच भरवावा असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अल्पसंख्याक विभागाचे प्रदेशचे महासचिव सादिक खाटीक यांनी केले आहे .

                कर्नाटक आंध्रप्रदेश तेलगंणा गोवा वगैरे राज्यातल्या अनेक जिल्ह्यातील खाटीक, दलाल, हेडे, व्यापारी, शेळ्यामेंढ्या, पालक, शेकडो शेतकरी आटपाडी च्या शनिवार च्या शेळ्यामेंढ्याच्या बाजारासाठी आटपाडीकडे धाव घेतात . शेकडो वाहने या व्यवसायासाठी धावत असतात सुमारे २५ हजार लहान जनावरांची आवक असलेला आटपाडीचा शेळ्यामेंढ्याचा बाजार आटपाडी ओढ्याच्या विस्तीर्ण पात्रातील प्रचंड मोठ्या मोकळ्या जागेमुळे नावारूपास येण्यास कारणीभूत ठरल्याचे सर्वश्रुत आहे . निरोगी, उत्तम, चपळ उत्कृष्ट चवी आणि दर्जाचे जनावर म्हणून आटपाडी बाजारातील शेळ्या,मेंढ्या, बोकडे पाटी, लाव्हर सर्वमान्य आहेत . ज्या त्या भागात चालणारा, त्या त्या दर्जाचा, वेगवेगळ्या प्रकारातला प्रचंड माल शनिवारी विक्रीस येत असलेने आटपाडी तालुक्या भोवतीच्या पाच सहा तालुक्यातील पशुपालकांचे अर्थकारण या बाजारावर अवलंबून आहे . हे वास्तव आहे . असे सादिक खाटीक यांनी म्हटले आहे .

                सदरचा शेळ्यामेंढ्याचा बाजार मार्केट यार्डातील बंदिस्त, अपुर्‍या जागेत हलविल्याने या ओढ्या पात्रातील इतर बाजारावर प्रतिकुल परिणाम जाणवू लागला आहे . पिंपरी खुर्द आंबेवाडी, बोंबेवाडी, खांजोडवाडी, माडगूळे, शेटफळे, करगणी, तडवळे, बनपूरी वगैरे तसेच सांगोला, मंगळवेढा, जत, कवठेमहंकाळ, तासगांव वगैरे पूर्व दक्षिण भागातून बाजारासाठी येणाऱ्या पशुपालक आणि शेतकऱ्यांची मोठी दैना होवू लागली आहे . या शनिवारच्या आटपाडी ओढ्यातील शेळ्यामेंढ्याच्या बाजाराने लगतच भरणाऱ्या भाजीपाला, धान्य, स्टेशनरी, शेती उपयोगी औजारे , दोरखंड, हॉटेल इतर अनेक व्यावसायींकाना मोठा फायदा होत असे . हा बाजार एक किमी परिघापर्यत विस्तीर्ण झाला आहे . शेळ्यामेंढ्या खरेदी - विक्रीच्या पैशातून थोडी फार रक्कम खर्ची टाकून प्रत्येक जण या बाजारातून काहीतरी खरेदी करीत असे . एकमेकावर अवलंबून असणाऱ्या चक्रातून सर्वजण आनंदी होते तथापि शेळ्यामेंढ्याचा बाजारच बंदिस्त मार्केट यार्डात नेल्याने शनिवार आठवडा बाजाराचे अर्थ चक्राचे चाकच व्यवसाया विना रुतून बसल्याने बाजारात येणाऱ्या छोट्या छोट्या विक्रेत्यांचे पुरते कंबरडे मोडले गेले आहे . सर्वजण हिताय, सर्वजण सुखाय , या न्यायाने आटपाडी ओढ्यातील शेळ्या मेंढ्याच्या बाजाराने शेकडोंचा बाजार साजरा होत असे . तथापि मार्केट यार्डात भरणाऱ्या शेळ्या मेंढ्याच्या या बाजाराने ओढा पात्रातील शेकडो बाजारकऱ्यांचा  *बाजारच* केला जावून बेजार केले गेले आहे . अलुतेदार - बलुतेदार - अल्पसंख्याक - उपेक्षित - वंचित - मागास आणि बहुजनांसाठी हा बाजार म्हणजे मोठी पर्वणीच आहे . या सर्वांच्या छोट्या छोट्या व्यवसायाला हा बाजार मोठा आधार आहे. शेळ्यामेंढ्या वाहतूक करणाऱ्या वाहन धारकांना होणारा हाप्ते वसुलीचा त्रास , विविध प्रकारच्या वर्गण्यांसाठी होणारी दादागिरी आणि जनावरांच्या चोरा चोरीच्या प्रकारास आळा घालून मार्केट कमिटीने सर्वांचे हित बघितले पाहीजे . या शेळ्यामेंढ्याच्या बाजाराच्या माध्यमातून फक्त आपल्याच उत्पन्नाचा विचार न करता मार्केट कमेटीने शेतकरी, व्यापारी यांच्या हिताच्या काही सोयी सुविधा निर्माण करीत आटपाडी तालुक्याच्या अर्थकारणाची जणू लाईफ लाईन बनलेला आटपाडीचा शेळ्यामेंढ्या, बोकड, पाटी, लाव्हरांचा हा बाजार पुन्हा आटपाडीच्या बाजार पटांगणा लगतच्या विस्तीर्ण ओढा पात्रात बसवावा किंवा श्री . अंबामातेच्या मंदिरालगतच्या खादी भांडारा समोरील विस्तीर्ण ओढापात्रात हा शेळ्यामेंढ्याचा बाजार भरवून सर्वांना आनंदाचा सर्वमान्य,सर्वस्पर्शी, सर्वप्रिय आणि सर्वोत्तम प्रत्यय , आटपाडी कृषी उत्पन्न बाजार समितीने आणून द्यावा . खादी भांडाराची विस्तीर्ण जागाही मार्केट कमिटीने भाडेतत्वाने घेऊन *शनिवार बाजार बरोबर दैनंदिन बाजारासाठी* उपयोगात आणल्यास आटपाडी शहर आणि परिसराचा विकास रथ अधिक जोमाने धावणार आहे. या शेळ्या मेंढ्याच्या आटपाडी बाजार पटांगणा लगतच्या विस्तीर्ण ओढा पात्रातील बाजारासाठी आटपाडी नगरपंचायत, आटपाडीतील सर्वपक्षीय नेतेमंडळी, मार्केट कमिटीचे अधिकारी, आटपाडीचे तहसीलदार वगैरे मान्यवर महोदयांनी यावर सकारात्मक भुमिका घ्यावी, असे ही शेवटी सादिक खाटीक यांनी आवाहन केले आहे .

Post a Comment

Previous Post Next Post