महसूल विभाग शासनाचा कणा -मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाणप्रेस मीडिया लाईव्ह :

  कोल्हापूर :  (जिमाका) : महसूल विभागाचा खुप जूना इतिहास आहे. दिवसेंदिवस महसूल विभागाची रचना बदलत चालली आहे. महसूल विभागाचे महत्व ठिकवून ठेवले पाहिजे. सर्व क्षेत्रात काम करणारा महसूल विभाग हा शासनाचा कणा आहे, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी केले.

    जिल्हाधिकारी कार्यालयातील महाराणी ताराबाई सभागृहात मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली महसूल दिन कार्यक्रम पार पडला, यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमात अपर जिल्हाधिकारी किशोर पवार, निवासी उपजिल्हाधिकारी दत्तात्रय कवीतके, करवीरचे प्रांताधिकारी वैभव नावडकर, रोजगार हमी योजना उपजिल्हाधिकारी प्रशांत खेडेकर, उप जिल्हा निवडणूक अधिकारी भगवान कांबळे, जिल्हा पुनर्वसन अधिकारी अश्विनी जिरंगे, भूसंपादन अधिकारी शक्ती कदम, भूसंपादन अधिकारी विवेक काळे, सनदी लेखापाल भाऊसो नाईक, कलाकार नितीन कुलकर्णी आदी उपस्थित होते. महसूल विभागात उत्कृष्ट काम करणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना यावेळी मान्यवरांच्या हस्ते सन्मानपत्र देवून गौरविण्यात आले.

         मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण म्हणाले, जनसामान्यांचे काम करत असताना महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांनी आपल्या भविष्याची काळजी करण्याबरोबरच आपल्या आरोग्यावर लक्ष देणे आवश्यक आहे. या विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना कामाच्या निकडीनुसार प्रसंगी 15 तासांहून अधिक तास काम करावे लागते. अशावेळी त्यांचे कुटुंबाकडे दुर्लक्ष होते.  महसूल विभागात काम करत असतांना मुलांच्या शिक्षणाकडे, स्वत:च्या आरोग्यकडे तसेच भविष्याकडेही लक्ष देणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.

       वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेले काम प्रामाणिकपणे व चोखपणे करा. लोकाभिमुख होवून लोकांना कामातून चांगली सेवा द्या. नवीन येणाऱ्या कर्मचाऱ्यांना महसूल विभागातील कामाचा अनुभव नसतो, अशावेळी कामाच्या अनुभवातून त्यांनी शिकायला हवे, यासाठी परिपूर्ण ज्ञान असणे आवश्यक आहे. महसूल विभागाशिवाय शासन असा विचार होवू शकत नाही. महसूल विभाग म्हणजे शासन हे ब्रिदवाक्य कायम टिकले पाहिजे, असे श्री. चव्हाण म्हणाले.

        अपर जिल्हाधिकारी किशोर पवार म्हणाले, महसूल दिन साजरा करण्याचा दोन वर्षांनी योग आला आहे. महसूल विभागाच्या कामात बदल होत असून दिवसेंदिवस कामाची व्याप्ती वाढत आहे. महसूल विभागाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी महसूल विभागाची प्रतिमा सांभाळून काम करणे गरजेचे आहे.  काम करताना एखाद्याचे काम झाल्यानंतर त्याचे समाधान मिळते. एखाद्या नागरिकाला भेटल्यानंतर व त्यांच्या शंकेचे उत्तर दिल्यास त्याचे समाधान होते. यामुळे नागरिकांशी संबंधित कोणतेही काम टाळू नये, असे आवाहन श्री.  पवार यांनी केले. याबरोबरच विभागातील कर्मचाऱ्यांनी आपल्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आरोग्य विमा उतरवा. भविष्यासाठी आवश्यक गुंतवणूकीस प्राधान्य द्या, असेही त्यांनी सांगितले.

         उपजिल्हाधिकारी प्रशांत खेडेकर यांनी आपल्या सेवा काळातील अनुभव सांगितले.  सनदी लेखापाल भाऊसो नाईक यांनी सुरक्षित गुंतवणूकीबाबत माहिती दिली. कलाकार नितीन कुलकर्णी यांनी हसत जगण्याबाबत मनोरंजनातून मौलिक सूचना केल्या.

        प्रास्ताविकात दत्तात्रय कवीतके म्हणाले, महसूल विभाग हा शासनाचा कणा आहे. शासनाच्या विविध महत्वाकांक्षी योजना, उपक्रमांची अंमलबजावणी करण्याचे काम महसूल विभाग करतो.

 तहसीलदार सुनीता नेर्लीकर यांनी सूत्रसंचालन केले. आभार तहसीलदार अर्चना कापसे यांनी मानले.

  कार्यक्रमाला तहसीलदार व महसूल विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.


 


Post a Comment

Previous Post Next Post