बार मालकाकडे खंडणी मागितल्याप्रकरणी जर्मनी गँग आणि एस. बी. गँगमधील सहा जणांवर गावभाग पोलिसात गुन्हा दाखल

संकेत भातमारे, तोहित सावनूरकर, विकास महादेव शिंदे (जवाहरनगर), समीर अकमर मुल्ला (कारंडे मळा शहापूर), रेहान मुस्ताक अहमद रुईकर (तारदाळ) व प्रशांत विनायक काजवे (जवाहरनगर) यांना अटक 


प्रेस मीडिया लाईव्ह : 

मनु फरास :

इचलकरंजी - गुंड सुदर्शन बाबरच्या नावाने एका बार मालकाकडे खंडणी मागितल्याप्रकरणी जर्मनी गँग आणि एस. बी. गँगमधील सहा जणांवर गावभाग पोलिसात गुन्हा दाखल झाला. त्यांनी बारमध्ये सिगारेट ओढण्यास मनाई केल्याच्या रागातून हॉटेल चालू देणार नाही, असे धमकावत प्रतिमहिना २५ हजारांची खंडणी मागितली.यानंतर सांगली रोडवर तणावाचे वातावरण बनले होते. याप्रकरणी संकेत भातमारे, तोहित सावनूरकर, विकास महादेव शिंदे (जवाहरनगर), समीर अकमर मुल्ला (कारंडे मळा शहापूर), रेहान मुस्ताक अहमद रुईकर (तारदाळ) व प्रशांत विनायक काजवे (जवाहरनगर) यांना अटक केली. याबाबतची फिर्याद सुहास बाळकृष्ण लाटणे (आमराई रोड) यांनी दिली. तसेच हॉटेल मालकासह मॅनेजर व कर्मचाऱ्यांना मारहाण केल्याप्रकरणी परस्परविरोधी फिर्याद दाखल केली. संकेत भातमारे याने फिर्याद दिली आहे.


पोलिसांनी दिलेली माहिती अशी, गुरुवारी रात्री संशयित सहाजण सांगली रोडवरील द ट्रॅव्हलर्स इन या बारमध्ये मद्यपान करण्यास गेले होते. मद्यपान करताना त्यांच्यात आपापसांत वाद सुरू झाला. हॉटेल चालक सुहास लाटणे यांनी त्यांना एसी रुममधून बाहेर जाण्यास सांगितले. संकेत भातमारे याने दुसरा टेबल लावून द्या, सिगारेट ओढणार असल्याचे सांगितले; मात्र लाटणे यांनी सिगारेट ओढण्यास सक्त मनाई केल्याने त्यांच्यात वाद झाला. संशयितांनी लाटणे यांना गुंड सुदर्शन बाबरची भीती दाखवत प्रतिमहिना २५ हजार हप्ता देण्याची मागणी केली. अन्यथा हॉटेल चालू देणार नसल्याची धमकी देत खंडणी मागितली. हॉटेलचालकाच्या फिर्यादीनुसार सहा जणांवर गुन्हा दाखल झाला. लाटणे यांच्यासह मॅनेजर व तेथील कर्मचाऱ्यांनी भातमारे व सावनूरकर यांना पट्ट्याने व लाथाबुक्क्यांनी मारहाण करत शिवीगाळ केल्याच्या भातमारेच्या फिर्यादीनुसार बार मालकासह चौघांवर गुन्हा दाखल केला.

Post a Comment

Previous Post Next Post