आयुर्वेदिक : तोरण वनस्पती - एक कल्पवृक्ष... रामदास गाडर सर.प्रेस मीडिया लाईव्ह

रायगड जिल्हा प्रमुख प्रतिनिधी  : सुनील पाटील :

जीवनाच्या जगण्याच्या लढाईत कौटुंबिक चरितार्थ चालवण्यासाठी आपले अनेक आदिवासी बांधव कल्याण, टिटवाळा,आंबिवली, आसनगाव या रेल्वे स्टेशन परिसरात कसारा,खर्डी व ग्रामीण परिसरातून ऋतूमानानुसार रानभाज्या,खेकडे,मासे,मुठे आणि रानमेवा घेऊन बसत असतात. खरं तर या आदिवासी बांधवांचा आपल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी नाही तर मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठीचा  संघर्ष सुरु असतो.याच ग्रामीण आदिवासी बांधवांमुळे शहरी बांधवांना या *' ऑरगॅनिक फूड '* ची मजा चाखता येते.


   दि.23/04/2022 रोजी दुपारी ड्युटीवरून येताना जाणीवपूर्वक येण्याचा रस्ता बदलला आणि आंबिवली (ता.कल्याण) येथे एका आदिवासी भगिनीकडून 100/- रु.ची तोरणं खरेदी केली. घरी आल्यावर ती तोरणं कुटुंबियांसोबत आनंदाने खाल्ली.दुसऱ्या दिवशी सुकवलेल्या तोरणांच्या बिया भाजून फोडून खातांना बालपणीच्या *' सोनेरी आठवणी '* ताज्या झाल्या. लहानपणी जिल्हा परिषदेची शाळा भरण्याअगोदर सकाळी रानात चिंच,बोरं,तोरणं आणि आंबे अशी फळे गोळा करणे आणि संध्याकाळी त्यांच्या बिया भाजून संध्याकाळी त्यावर ताव मारणे हा आमच्या नित्यक्रम असायचा.चिंचोके, तोरणं आणि आंब्याच्या कोयी भाजून खायचो तर बोरांच्या बिया दगडावर फोडून खायचो. तोरणं खाण्याची मजा घेतल्यामुळे आज जाणीवपूर्वक माझे आकलन आणि माहितीनुसार तोरण / तोरणी या वनस्पतीबद्दल  लिहण्याचा प्रयत्न केला आहे.

     


  स्थानिक बांधव तोरण किंवा तोरणी असे दोन्ही शब्द या वनस्पतीस वापरतात. या वनस्पतीचे शास्त्रीय नाव - 'Zizuphus rugosa ' असून इंग्रजीत तोरणीस 'Wild Jujube' असे म्हणतात.ही वनस्पती काटेरी झुडपवर्गीय असून तिच्या अनेक उपयोगामुळे जाणकार आणि आदिवासी बांधवांसाठी ती कोणत्याही कल्पवृक्षापेक्षा कमी नाही.  ही वनस्पती महाराष्ट्रातील  पश्चिम घाटामध्ये कोकणातील पालघर,ठाणे,रायगड,रत्नागिरी, नाशिक,नगर,पुणे कोल्हापूर इ.जिल्ह्यात प्रामुख्याने आढळते. साधारणपणे स्थानिक आदिवासी बांधव तोरणीची फळे एप्रिल - मे महिन्यात पाळसाच्या पानांचे द्रोण करून रस्त्याच्या कडेला किंवा शहरांत फूटपाथवर घेऊन बसत असतात.   

          माझ्या वडिलांना मला या बहुगुणी वनस्पतीबद्दल सांगितलेल्या माहितीनुसार या वनस्पतीची साल खोकला व शरीराला लागलेला माराच्या वेदना कमी करण्यासाठी वापरतात तर पाने विंचू दंशावर उपयुक्त आहेत.या वनस्पतीची अंदाजे एक से.मी.ची फळे गोड असून फळे व बियादेखील नैसर्गिक गुणांनी परिपूर्ण असतात. म्हणून आजारपणात तोंडाची चव गेल्यास यांच्या सेवानाने रुग्णास तात्काळ फायदा तर होतोच शिवाय निरोगी हिरड्या आणि मजबूत दाताचे वरदान देखील मिळत असते. तसेच या वनस्पतीच्या काटेरी गुणधर्मामुळे ही शेतीस कुंपणाकरिता उपयुक्त असून शेळ्यांचे आवडते खाद्य आहे. म्हणून या वनस्पतीस कल्पवृक्ष म्हणून संबोधली जाते.

          तोरणीच्या बियांवर अतिशय मजबूत आणि चिवट आवरण असल्यामुळे या बिया भाजून फोडून खातांना बियांचे टरफल बोटांच्या नखांमध्ये घुसून इजा होण्याची शक्यता असते.त्यामुळे या बिया खातांना विशेष लक्ष द्यावे लागते. परिणामी मानसशास्त्रीय दृष्टीने विचार केल्यास या कृतीमुळे अवधान केंद्रित कारण्यास मदत होते. याशिवाय बिया खातांना बोटांची मोठ्याप्रमाणावर आणि योग्य पद्धतीने हालचाल करावी लागत असल्यामुळे लहान मुलांना त्याचा लेखन करण्यासाठी अधिक फायदा होत असतो.

       सध्या बाजारात अनेक किंमती ' इम्युनिटी पॉवर ' वाढवणारी औषधं आहेत. बदलणारी जीवनशैली आणि औषधांच्या आकर्षक जाहिरातीबाजीमुळे ती आपण खरेदी करतो ; मात्र माहिती अभावी आणि जीवनातील व्यस्ततेमुळे या *' नैसर्गिक - अभिजात औषधांकडे '* आपले दुर्लक्ष होऊन या बहूगुणी आणि आयुर्वेदिक औषधांचा विसर पडत चालला आहे.

         सध्या कृत्रिम वणव्यांमुळे  नैसर्गिक  साधनसंपत्ती धोक्यात आली असून उर्वरित नैसर्गिक साधनसंपत्ती व औषधी नष्ट होण्याच्या मार्गावर असून त्यामुळे जागतिक तापमानवाढी सारख्या गंभीर समस्यांचा सामना करावा लागत आहे. आज या नैसर्गिक संपत्तीचा उपयोग केवळ गरजेपुरता केला जात नसून विकासाच्या नावाखाली  तिला निसर्गापासून ओरबाडण्याचे काम सुरु आहे. म्हणून आज संपूर्ण मानवजातीस आवर्षण,महापूर,दरडी कोसळणे यांसारख्या नैसर्गिक आपत्तींचा सामना करावा लागत आहे. खरं या आपत्ती कृत्रिमच म्हणाव्या लागतील. म्हणून निसर्गाचे जतन व संवर्धन करणे काळाची गरज असून आपल्या सर्वांचे आद्य कर्तव्य आहे. हे कर्तव्य जर आपण प्रामाणिकपणे पार पाडले तर तोरणी सारख्या अनेक कल्पवृक्षांचे आपोआप रक्षण होऊन पर्यायाने ही नैसर्गिक गुंतवणूक पुढील पिढ्यांसाठी नक्कीच उपयुक्त होईल यात शंका नाही.


🌳" झाडे जगवा, पृथ्वी वाचवा."🌳🌱🤝🏻

Post a Comment

Previous Post Next Post