अद्यापही नुकसानीचे पंचनामे सुरु असून नुकसानीचा आकडा वाढण्याची शक्‍यता आहे.



प्रेस मीडिया वृत्तसेवा : 

सातारा - अतिवृष्टी, भूस्खलन, पूरपरिस्थितीमुळे जिल्ह्यात 649 कोटी 81 लाख 64 हजार रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. रस्ते, पुलांना सर्वाधिक फटका बसला असून सर्वाधिक नुकसान जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे 271 कोटी रुपयांचे झाले आहे.अद्यापही नुकसानीचे पंचनामे सुरु असून नुकसानीचा आकडा वाढण्याची शक्‍यता आहे.

जिल्ह्यात जुलै महिन्यात अतिवृष्टी, भुस्खलन, पूरपरिस्थितीचा मोठा फटका बसला. पाटण, वाई, जावळी, महाबळेश्‍वर, सातारा या तालुक्‍यांत जीवित आणि वित्तहानी मोठ्या प्रमाणात झाली. अनेक ठिकाणी गावांचा संपर्क तुटला. रस्ते, पूल वाहून गेल्याने दळणवळण ठप्प झाले.

या आस्मानी संकटाने विशेषत: पाटण, जावळी, महाबळेश्‍वर, वाई या तालुक्‍यांत मोठे नुकसान झाले.नुकसानीचे तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी दिले होते. उपमुख्यमंत्री अजित पवारांसह अनेक मंत्र्यांनी जिल्ह्यात भेटी देऊन मदतकार्य गतीने सुरु होण्यासाठी पुढाकार घेतला होता. जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी सर्व विभागांकडून नुकसानीची माहिती घेण्याचे आदेश दिले होते.

त्यानुसार सर्व विभागांकडून जिल्हा प्रशासनाकडे नुकसानीची माहिती उपलब्ध झाली आहे. पुरवठा विभाग 133 कोटी 22 लाख, जिल्हा परिषद आरोग्य विभाग 12 कोटी, जिल्हा परिषद ग्रामीण पाणी पुरवठा विभाग 23 कोटी 19 लाख 28 हजार, जिल्हा परिषद जलसंधारण विभाग 4 कोटी 63 लाख 3 हजार, जिल्हा परिषद बांधकाम विभाग 271 कोटी 49 लाख 5 हजार, जिल्हा परिषदेच्या अखत्यारितील प्रधानमंत्री ग्रामीण सडक योजना 15 कोटी 92 लाख 9 हजार, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व अंगणवाडीचे 2 कोटी 45 लाख 26 हजार, प्रशासकीय इमारतींचे (ग्रामपंचायत कार्यालये) 7 कोटी 77 लाख, महावितरणचे 12 कोटी, कृषी विभागाचे 43 कोटी 38 लाख 89 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.

जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभागाचे 10 लाख, पशुसंवर्धन विभाग सातारा जिल्हा स्तर (माय पशुधन तहसील स्तरावरील माहितीप्रमाणे) 65 लाख, सार्वजनिक बांधकाम विभाग (रस्ते, पूल) 164 कोटी 2 लाख 63 हजार, मत्स्य विभागाचे 30 लाख 23 हजार, टेंभू उपसा जलसिंचन प्रकल्पाचे 1 कोटी 90 लाख, जलसंपदा विभाग (सातारा सिंचन मंडळ) 33 कोटी 70 लाख 34, जलसंपदा विभाग (कृष्णा खोरे विकास महामंडळ) 20 कोटी 10 लाख 1 हजार, वनविभाग (सह्याद्री व्याघ्र) 1 कोटी 25 लाख, नगरपालिका विभागाचे 26 कोटी 39 लाख, राष्ट्रीय महामार्ग (कराड - चिपळूण) 7 कोटी 90 लाख, सानुग्रह अनुदान 2 कोटी 61 लाख 94 हजार, घर पडझड, गोठे अनुदान 2 कोटी 62 लाख 38 हजार, व्यावसायिक गाळ्यांचे (दुकाने, टपरी) 93 लाख 16 हजार, मधुमक्षिका पालन संस्थांचे 5 कोटी रुपये असे जिल्ह्यात 649 कोटी 81 लाख 64 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.

शेतजमीन, पिकांचे पंचनामे अद्याप सुरू
जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्या आदेशान्वये सर्व विभागांकडून नुकसानीचे पंचनामे करण्यात आले आहेत. महाबळेश्‍वर तालुक्‍यातील 36 गावांमधील नुकसानीच्या पंचनाम्यांची अद्याप माहिती उपलब्ध झालेली नाही. जिल्ह्यातील खासगी विहिरींच्या झालेल्या नुकसानीचाही यामध्ये अद्याप समावेश नाही. शेती पिके व शेत जमिनीचे अद्याप पंचनामे सुरु असल्याने नुकसानीचा आकडा आणखी वाढण्याची शक्‍यता आहे.

Post a Comment

Previous Post Next Post