हडपसरमध्ये लुटमार, चोरी करणाऱ्या चारजणांच्या पोलिसांनी दोन दिवसांमध्ये मुस्क्या आवळल्या.



प्रेस मीडिया वृत्तसेवा :

पुणे :  हडपसरमध्ये लुटमार, चोरी करणाऱ्या चारजणांच्या पोलिसांनी दोन दिवसांमध्ये मुस्क्या आवळल्या आहेत. त्यांच्याकडून सात गुन्हे उघडकीस आणून 5 लाख 30 हजारांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. हडपसरमध्ये मागील दोन दिवसांत चोरी, सोनसाखळी हिसकाविण्याच्या घटना घडल्या होत्या.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण कदम यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक हनुमंत गायकवाड आणि पोलीस उपनिरीक्षक सौरभ माने तपास करीत होते. त्यानुसार सेंट्रीग प्लेट चोरी करणाऱ्या दोन वेगवेगळ्या गुन्ह्यातील साहिल कचरावत वय 21 आणि अक्षय बाळू शिंदे वय 21 यांच्यासह एका अल्पवयीनाला ताब्यात घेतले.त्यांच्याकडून 80 हजारांच्या 70 सेट्रींग प्लेट जप्त करण्यात आल्या आहेत. दुसऱ्या गुन्ह्यात जेवणाचे पार्सल आणण्यासाठी चाललेल्या तरूणाला मारहाण करून त्याच्याकडील सोन्याची चेन आणि अंगठ्या चोरणाऱ्या दोघांना अटक करण्यात आली. दशरथ शिवाजी शेलार वय 22 आणि तेजस दत्तात्रय खंडागळे वय 20 दोघेही रा. गंगानगर, हडपसर अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. त्यांच्याकडून एक तोळ्याची सोन्याची चेन आणि दुचाकी असा 1 लाख 20 हजारांचा ऐवज जप्त करण्यात आला.

माळवाडी परिसरातून दुचाकी चोरणाऱ्या पंकज सुरेश शिंदे वय 33 आणि सच्छिदानंद शंकर कुसळ वय 25, रा. चंदननगर यांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून चंदननगर, मुंढवा, हडपसर परिसरातील केलेल्या गुन्ह्यांची उकल करण्यात आली. अशापद्धतीने हडपसर पोलिसांनी मागील दोन दिवसांत दोन जबरी चोरीचे गुन्हे, दोन सेंट्रींग प्लेट चोरीचे गुन्हे, दोन वाहनचोरी, एक घरफोडी मिळून सात गुन्हे उघडकीस आणले आहेत. ही कामगिरी पोलीस उपायुक्त नम्रता पाटील, एसीपी कल्याणराव विधाते, वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण कदम, पोलीस निरीक्षक दिगंबर शिंदे, पोलीस निरीक्षक राजू अडागळे, एपीआय हनुमंत गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक सौरभ माने, प्रदीप सोनवणे, प्रताप गायकवाड, गणेश क्षीरसागर, अविनाश गोसावी, संदीप राठोड, समीर पांडुळे, शाहिद शेख, शशिकांत नाळे, सचिन जाधव, प्रशांत दुधाळ, निखील पवार, प्रशांत टोणपे, सचिन गोरखे यांनी केली.

Post a Comment

Previous Post Next Post