कृपया संयम सोडू नका. कोणी दुश्‍मन आहे आणि कोणी लाडके आहेत, असे काही नाही. सर्व नागरिकांच्या जीवांची काळजी आहे....मुख्यमंत्री उध्दव ठाकरे



प्रेस मीडिया वृत्तसेवा :

 मुंबई - जिथे जिथे लॉकडाऊनच्या निर्बंधात शिथिलता देऊ शकलो नाही तिथल्या नागरिकांना आणि व्यापाऱ्यांना विनंती करतो की कृपया संयम सोडू नका. कोणी दुश्‍मन आहे आणि कोणी लाडके आहेत, असे काही नाही. सर्व नागरिकांच्या जीवांची काळजी आहे. त्यामुळे या गोष्टी कराव्या लागतात, असे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी म्हटले आहे.

राज्य सरकारने राज्यातील 25 जिल्ह्यांतील निर्बंधांमध्ये मोठ्या प्रमाणावर शिथिलता देण्यात आली आहे. मुंबईची लोकल सुरू करण्याचा विचार सुरू आहे. पण जबाबदारीचे भान ठेवूनच हा निर्णय घेतला जाईल, असेही ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे. ठाकरे यांच्या हस्ते खार एच पश्‍चिम विभागातील पालिका विभागीय कार्यालयाचे उद्‌घाटन करण्यात आले.यावेळी त्यांनी हे विधान केले.

उद्धव ठाकरे म्हणाले, महाराष्ट्रातील परिस्थिती संमिश्र आहे. काही ठिकाणी बऱ्यापैकी सुधारली आहे. काही ठिकाणी चिंता करायला लागू नये अशी आहे. त्यामुळे काही ठिकाणी निर्बंधात शिथिलता देण्यात आली आहे. तर काही ठिकाणी देण्यात आली नाही. याचा अर्थ असा नाही की हे कायमचं बंद राहील. लोकल सुद्धा कधी सुरू होणार? असे विचारले जात आहे. त्याच्यावरही विचार सुरू आहे. काही गोष्टींना निर्बंधात शिथिलता दिली आहे. दुकानांच्या वेळांनाही शिथिलता दिली आहे. इतर गोष्टींनाही शिथिलता मिळेल. पण जबाबदारी घेऊन आणि जबाबदारीचं भान ठेवूनच निर्बंध उठवले जातील, असे मुख्यमंत्री म्हणाले.

सकारात्मक तोडगा काढा - उच्च न्यायालय
मुंबई लोकलमधून सर्वसामान्यांना प्रवास करण्याबाबत राज्य सरकार सकारात्मक तोडगा काढेल आणि येत्या 15 ऑगस्टच्या निमित्ताने लोकांना स्वातंत्र्य मिळेल, अशी अपेक्षा मुंबई उच्च न्यायालयाने गुरूवारी व्यक्त केली. तसेच अद्याप पत्रकारांचा अत्यावश्‍यक सेवेत समावेश करून त्यांना रेल्वेने प्रवासाची मुभा का दिलेली नाही? असा सवालही राज्य सरकारला विचारला. यासंदर्भातील सर्व याचिकांवरील पुढील सुनावणी गुरुवारपर्यंत तहकूब केली.

Post a Comment

Previous Post Next Post