*गडचिरोली आणि भीती*




येवला प्रतिनिधी (एकनाथ भालेराव)

तसा एवढाही काही घाबरलो नव्हतो,परंतु गडचिरोली म्हटले की,येतो ना अंगावर काटा.फार तर काटा म्हणा ,शहारे म्हणा.त्याला कारणही तसेच होते.गडचिरोली जिल्ह्यातील ऐकीव परिस्थिती. म्हणे तिथे नक्षलवाद्यांचा वावर असतो.कुणालाही उचलतात.कुणालाही ठोकतात.असं आणि बरंच काही ऐकून होतो.प्रत्यक्ष पाहिलं नव्हतं.

                गडचिरोलीला जाण्यासाठीचा ,जसा काही फतवा निघाला,तसा मस्तकाच्या मधोमध  वीज पडावी आणि पूर्ण शरीर दुभंगावं, असंच वाटत होतं.आता आपला कार्यक्रम संपला.नाहक असा विचार डोक्यातून बाहेर.मग नको ते विचार सुरु झाले, न  जानो त्यांनी आपल्यालाच पकडलं तर? न जानो आपलाच नंबर लागला तर? या प्रश्नांबरोबर अनेक प्रश्न माझ्या भवती रिंगण घालून झिम्मा फुगडी खेळायला लागले.याचा व्हायचा तो परिणाम झाला एक तर झोपेचं खोबरं झालं,दुसरं म्हणजे घरात वातावरण अंडर टेंशन झालं.प्रवासाची तारीख जशी जवळ येत होती.तसं घरातलं वातावरण सुतकीहोत चाललं होतं.या बरोबर डोकेदुखी,अजीर्ण नाहक कसं तरी वाटणं. इत्यादीचा व्याधींचा चोरपावलांनी प्रवेशही झाला होता.

                सगळंच वाईट घडत होतं, असं काही नाही बरे ! या दोन तीन दिवसांत घरी माझा जरा जास्तच लाड झाला, तो भाग वेगळा.मी म्हणेन ती भाजी माझ्या दिमतीला हजर होती.नाही म्हणालं तरी, त्या तीन दिवसांत  मी माझ्या आवडीच्या भाज्या खाल्यान. चार पँटीचा घेरही कमी करण्याबाबत चर्चा झाली.माझ्या वजनाचा काटा डावीकडे  झुकू लागला होता.

            साधारणतः तीन चार आठवडे राहण्याची तयारी सुरु झाली होती.घरा शंकरपाळ्या,भाजके पोहे,भडंग,चिवडा अशा पदार्थांची घरात रेसिपी चालू झाली होती.दिवाळीचे आठ – नऊ महिने आगोदरच झाले की काय ? असा भास होत होता.

                जायचा दिवस निश्चित झाला. कार्यालयातून कोण कोण जाणार, हे ही निश्चित झालं होतं.बाहेर करोनाचा हाहाकार चिंतेत भर पाडत   होता.त्यामुळे आपल्या खाजगी वाहनाने जायचं हे निशित झालं.सोबत कार्यालयातील  येणाऱ्याच्या कपड्यांनी  आणि फराळांच्या पिशव्यांनी अर्धी अधिक गाडी फुल्ल झाली होती. पुण्यातून मी ,संतोष कुलकर्णी ,राजेश शेगोकार,दिनकर थोरात,अनिल गुंजाळ सह गणेश पारखी असे सहाजण जाण्यास तय्यार झाले.सहाजण मिळून दोन खाजगी गाड्या तय्यार झाल्या.पहाटेच्या वेळी आमच्या गाड्यांनी गडचिरोलीच्या दिशेने मार्गक्रमण केले.अहमदनगरच्या पुढे एक चांगलं हॉटेल दिसलं .त्या ठिकाणीची प्रसिद्ध मिसळची लाजवाब चव  घेतली आणि तिथला घंटा वाजून मिसळ छान असल्याचा अभिप्राय दिला .पुढे दिवसभराच्या प्रवासात ताक,लिंबू सरबत,चहा,थंड पेय असे वेळोवेळी मदतीला होतेच . भरीतभर म्हणजे यवतमाळ येथील रेस्ट  हाऊस मधलं रात्रीचं जेवण.

            दुसऱ्या दिवशी ,यवतमाळ सोडून पुढचा प्रवास सुरु झाला होता,या ठिकाणापासून पुढे दोन्ही गाड्या वेगळ्या दिनेशे जाणार होत्या.चंद्रपूरच्या जवळपास नाष्ट्यासाठी आलुबोंडा,मुगवडा,सामोसा,पोहे अशा डिश समोर होत्याच.सांगायचा मुद्दा हा की, जर वजन काट्यावर उभा राहिलो असतो तर,दोघात उभा वाद झाला असता.

        एकदाचे नेमून दिलेल्या एटापल्लीच्या  तालुका आरोग्य कार्यालय आम्ही पोहचलो. तालुका आरोग्य अधिकारी डॉ.अस्मिता देवगडे मॕडम यांची भेट झाली.यथायोग्य पाहुणचार झाला.आशा गटप्रवर्तक यांची सभा झाला.तो पर्यंत डॉ.देवगडे मॕडम  यांनी एटापल्ली येथील रेस्ट हाऊस बुक करून आम्हाला कळविले. डॉ.अस्मिता देवगडे मॕडम यांचेमुळे राहण्याचा आणि मोठा जटील प्रश्न सुटला होता.

                एक प्रश्न मार्गी लागला होता ,परंतु सगळ्यात महत्वाचा प्रश्न होता, जेवणाचा. तो प्रश्न कसा सोडवायचा? हा एक प्रश्न आमची पाठ सोडायला तयार होईना.आम्ही पुण्याचे ..! पुण्याचं जेवण आणि एटापल्लीचं जेवण कसा मेळ लागणार ? तिथलं जेवण कसं असणार ..? पोट तर बिघडणार नाही ना ? असे नाना प्रश्न ,आमच्या पुढ्यात अंथरून टाकून लोडाला टेकून बसलेले.

एटापल्लीचे तालुका आरोग्य पर्यवेक्षक श्री.शिंदे आणि आरोग्य सेवक श्री.कोटगले यांच्या सहकार्याकाने सकाळच्या नाष्ट्यासाठीचे ‘ साऊथ इंडियन नाष्टा सेंटर ’ चा पत्ता मिळाला.या नाष्टा सेंटर चे चालक म्हणजे एक दाक्षिणात्य कुटुंब श्री.श्रीनिवास सत्यनाराय (आण्णा) आणि सौ.करुणा श्रीनिवास (आम्मा).या ठिकाणाची आम्मा म्हणजे जणू पायाला भिंगरी.एका वेळी ही आम्मा डोसाही बनवते, इडलीही वाढते,चहाही चांगला बनवते,म्हणजे एकंदर काय तर, आम्माचा जादा होल्ड. ताजा आणि गरम मसाला डोसा,इडली सांबर,मेदुवडा सांबर,अलुबोंडा असे चवदार पदार्थ.भरपेट नाष्टा तरीही अत्यल्प शुल्क. फक्त २०-२५ रुपयात नाष्टा.चांगला स्पेशल चहा फक्त ५ रुपयात.चव म्हणाल तर क्या बात है !ग्राहक तृपिचा ढेकर देतंच बाहेर पडणार.

नाष्ट्याचा मार्ग मोकळा झाला होता.आता खरा आणि महत्वाचा प्रश्न होता तो जेवणाचा. ‘श्रीकृष्ण महिला बचत गटाची खानावळ’ अर्थात घरघुती मेस.आपण नेहमी सासू सुनांचे खटके उडताना बघतो.पण या ठिकाणची  सासू श्रीमती रीना दिलीप दास आणि सुनबाई श्रीमती अनामिका दिपक दास आणि सोबतीला एक मदतनीस श्रीमती पोनिमा तपन मंडल.या तीन महिलांनी चालवलेल्या मेस मुळे आमचा मुख्य प्रश्न मार्गी लागला होता.तशा ह्या महिला  मुळच्या बंगाली, परंतु  आदिवासी भागात गेली १५-२० वर्षापासून त्याचं वास्तव्य असल्याने गेली अडीच वर्षापासून खानावळीला प्रारंभ केला.तिथलं जेवण,स्वच्छता,पोटभर जेवण,शाकाहारी आणि मांसाहारीसाठी सोय.त्यामुळे पंचक्रोशीत अल्पावधीत ही खानावळ प्रसिद्ध झाली .सरकारी नोकरदारांसाठी तर हे,  उत्तम ठिकाण . मनपसंद जेवणाचे दरही तसे माफक .शाकाहारी जेवण फक्त ७० रुपये,मांसाहरीसाठी फक्त १२०  रुपये मोजावे लागतात.शिवाय कधी कधी आपल्या पसंदीचीही भाजी तयार करून दिली जाते.

कधीकाळी कधी या भागात गेलाच, तर या ठिकाणांच्या या अन्नपूर्णांना   आवश्य भेट द्या.तुमच्या मोठ्या प्रश्नांना उत्तर मिळेल.

  गडचिरोली म्हणालं की नाहक भीती होती.परंतु तिथल्या या माणसांनी आमची ही भीती कुठल्याकुठे पळवून लावली होती.तिथली मानसं आपली वाटू लागली.या सगळ्या माणसांमुळे आम्ही त्या भीतीची होळी केली.

गडचिरोलीचे  कार्यालयीन कामकाज आटोपून गडचिरोलीला बायबाय करत असताना, आरोग्य पर्यवेक्षक श्री.शिंदे आणि पेरमीलीचे आरोग्य सहाय्यक श्री.वैरागडे यांची झालेली घालमेल दिसत होती. त्यांचे डोळेही पानावल्याचे दिसत होते.एखाद्या पाहुण्यांनी यावे आणि आपलंसं करावं.आणि निघून जावं, असं त्यांच्यासाठी झालं होतं.   

          या सगळ्या आठवणी उराशी घट्ट बांधून, आम्ही पुण्याच्या दिशेने निघालो होतो.


दिलीप कचेरे 

प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी

सहाय्यक संचालक,आरोग्य सेवा(हिवताप)पुणे-६

Post a Comment

Previous Post Next Post