महापालिकेस प्रतिसादन देणाऱ्या ठेकेदाराचे डिपॉजिट जप्त .काळ्या यादीत टाकण्याची कारवाई अतिरिक्‍त आयुक्‍त डॉ. कुणाल खेमणार यांनी केली आहे..

 


पुणे : महर्षीनगर  प्रभाग क्र. 28 पूनावाला गार्डन ते सॅलसबरी पार्क परिसरातील सुशोभीकरण करणे, पदपथ विकसित करणे, डांबरीकरण करणे, फ्लोअर बेड, वीज यंत्रणा विकसित करणे, राडारोडा उचलणे, अशी विविध निकृष्ट दर्जाची करणाऱ्या तसेच दुरुस्तीबाबत महापालिकेस प्रतिसाद न देणाऱ्या ठेकेदाराचे डिपॉजिट जप्त करीत त्यास काळ्या यादीत टाकण्याची कारवाई अतिरिक्‍त आयुक्‍त डॉ. कुणाल खेमणार यांनी केली आहे.

महर्षीनगर परिसरात चमकोगिरीवर लाखो रुपये खर्च करण्यात आला असून एलइडीचे कर्बस्टोन बसविण्याबाबत अनेक वाद व विरोध करण्यात आला होता. डिजिटल एलइडीचे पदपथ बंद पडल्याने लाखो रुपये उधळपट्टी केल्याच्या तक्रारीही नागरिकांनी केल्या होत्या.त्यानुसार भारतीय विकास परिषदचे भरत सुराणा यांनी संबंधित विकासकामे अतिशय हीन दर्जाची झाल्याची तक्रार आयुक्‍तांकडे केली होती. यानुसार प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून देण्यात आलेल्या अहवालानुसार संबंधित ठेकेदारावर कारवाई करण्यात आली.

याबाबत पुणे महानगरपालिका अतिरिक्‍त आयुक्‍त डॉ. कुणाल खेमणार यांनी आदेश दिले आहेत की, सदर कामाचा दर्जा अत्यंत निकृष्ट दिसून येत असल्याने अनामत रक्कम जप्त करणे; तसेच मनपाचे झालेल्या नुकसानास ठेकेदाराला जबाबदार निश्‍चित करून ठेकेदाराला काळ्या यादीत टाकून गरज पडल्यास फौजदारी कारवाई करावी. आयुक्‍तांच्या आदेशानुसार कारवाई करण्यात आली आहे.

'मलई' कोणी लाटली?
दोन ते अडीच कोटी रुपये रकमेची कामे हीन दर्जाची करून फक्‍त 20 लाख रुपये डिपॉजिट जप्त केलेल्या ठेकेदाराला काळ्या यादीत टाकण्यात आले असले तरी संबंधित ठेकेदाराच्या नावाखाली इतरांनीच मलई लाटली असून, नागरिकांच्या कररूपी करोडो रुपये वाया गेले आहेत. त्यामुळे या कामांचा श्रीगणेशा करताना कोणी कोणी हात ओले केले, याबाबत परिसरात चर्चा रंगली आहे.

नागरिकांच्या कररूपी पैशातून करोडो रुपयांची उधळपट्टी प्रभाग क्रमांक 28 मध्ये झाली असून, डिजिटल पदपथ व इतर हीन दर्जाच्या कामांबद्दल आम्ही पुराव्यासह तक्रार केली होती, त्याची दखल घेऊन महानगरपालिकेकडून संबंधित ठेकेदारावर कारवाई करण्यात आली आहे.

- भरत सुराणा, सामाजिक कार्यकर्ते


पूनावाला गार्डन ते सॅलिसबरी पार्क परिसरातील विविध कामांतील त्रुटींबाबत ठेकेदारास वेळोवेळी पत्र व्यवहार करून दुरुस्ती करण्यास व कामे पूर्ण करण्यास कळविले होते. मात्र, त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. यामुळे डिपॉजिट जप्त करत त्यांचे नाव काळ्या यादीत टाकण्यात आले.

- आदिल तडवी, उपअभियंता पथ विभाग

Post a Comment

Previous Post Next Post