माणगाव परिषदेची एकशे एक वर्षे



प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी

 ( ९८ ५०८ ३० २९० )

 

एकशे एक वर्षांपूर्वी  म्हणजे २१ व २२ मार्च  १९२० रोजी कोल्हापूर संस्थानातील माणगाव येथे अखिल महाराष्ट्र अस्पृश्य वर्गाची परिषद झाली. त्या परिषदेचे अध्यक्ष डॉ.बाबासाहेब आंबेडकर होते .तर प्रमुख पाहुणे राजर्षी शाहू महाराज होते .वयाच्या तिशीमध्ये या परिषदेचे अध्यक्ष असलेल्या डॉ.आंबेडकर यांच्या पुढील व्यापक कार्याची ही परिषद अनेक अर्थाने प्रारंभ बिंदू ठरली .१४ एप्रिल १८९१ रोजी जन्मलेल्या बाबासाहेबांनी सातारा ,मुंबई  येथे शिक्षण घेतले .पुढे १९१३ साली ते बडोदा संस्थानाच्या शिष्यवृत्तीवर अमेरिकेला गेले. तेथे कोलंबिया विद्यापीठात त्यांनी अर्थशास्त्र विषयात पीएचडी केले .तेथून परतल्यावर बडोदे संस्थानात ते नोकरीला रुजू झाले .पण या महापंडितिलाही  अस्पृश्य म्हणून अतिशय कटू अनुभव आले. परिणामी त्यांनी बडोदे संस्थानातील नोकरी सोडून सिडनेहॅम कॉलेजमध्ये प्राध्यापकाची नोकरी पत्करली.

आपण एवढे शिकले-सवरलेले असूनही अस्पृश्य म्हणून होणारी मानहानी त्यांना अस्वस्थ करू लागली .तसेच आपल्यासारख्या विलायतेत जाऊन उच्चविद्याविभूषित झालेल्यांना जर अशी वागणूक मिळते तर आपल्या समाजातील सर्वसामान्य माणसांना किती यातना सहन कराव्या लागत असतील ?हा प्रश्न त्यांना भेदसावू लागला. त्यातूनच त्यांनी अस्पृश्यांमध्ये जागृती करण्यासाठी कार्यकर्त्यांची संघटना उभारली. ३१ जानेवारी १९२० रोजी मूकनायक नावाचे पाक्षिक सुरु केले. आणि पाठोपाठ २१ व  २२ मार्च रोजी माणगाव येथे अस्पृश्यांची परिषद घेतली.तर नागपूरला राजर्षी शाहू महाराजांचे अध्यक्षतेखाली अखिल भारतीय परिषद घेतली. 

बाबासाहेबांच्या पुढील जीवनातील दैदीप्यमान सामाजिक ,राजकीय ,वैचारिक, संघटनात्मक वाटचालीत माणगाव परिषदेचे महत्त्व मोठे आहे. त्याच्या शताब्दीचे औचित्य साधून डॉ. आंबेडकर आणि राजर्षी शाहू महाराज यांचे त्या परिषदेतील विचार समजून घेणे महत्त्वाचे आहे.  कारण या विचारांचा समकालीन संदर्भ मोठा आहे .२१ मार्च रोजी बहिष्कृत वर्गाची ही परिषद सुरू झाली .त्यादिवशी ‘पाडवा’ होता. जवळजवळ पाच हजारांवर लोकांचा समुदाय त्या परिषदेला विविध भागातून आला होता. या सभेला अस्पृश्यानी व इतरांनीही जास्त गर्दी करू नये यासाठीचे पद्धतशीर प्रयत्न काहींनी केले होते .संध्याकाळी पाच वाजता ही परिषद सुरू झाली .स्वागताध्यक्ष दादासाहेब ईनामदार यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. त्यांनी परिषदेचा हेतू त्यातून स्पष्ट केला आणि इतरांवर अवलंबून राहण्यापेक्षा आपला उद्धार आपणच केला पाहिजे या मुद्द्यावर भर दिला.

या परिषदेचे अध्यक्ष भाषणात तरुण बाबासाहेबांनी समाजाला एक नवी दिशा देण्याचा प्रयत्न केला .अशा पद्धतीची ही पहिलीच परिषद असल्याचे स्पष्ट करून ते म्हणाले ,आपल्या उन्नती बद्दलची कळकळ आणि बहिष्कृत वर्गात सुरू असलेली विचार क्रांती ही अपूर्व आहे .आपल्यावर ओढवलेली दुरावस्था हा ईश्वरी लिलेचा परिपाक नसून तो इतरांच्या दुष्कृत्यांचा परिणाम आहे .जन्मसिद्ध योग्यायोग्यता आणि जन्मसिद्ध पवित्रपवित्रता या दोन तत्त्वांनुरूप हिंदू लोकांची विभागणी केली तर त्याचे तीन वर्ग होतात .१) जन्माने सर्वात श्रेष्ठ व पवित्र ह्याला आपण ब्राह्मणवर्ग असे म्हणतो .२)ज्यांची जन्मसिद्ध श्रेष्ठता व पवित्रता ब्राम्हण पेक्षा कमी दर्जाची आहे असा जो वर्ग तो ब्राह्मणेतर वर्ग .३) जन्मसिद्ध कनिष्ठ व पवित्र अशांचा जो वर्ग तो बहिष्कृत वर्ग होय.

या भाषणात आंबेडकरांनी स्पष्ट केले की,या त्रिस्तरीय विभागणीने गुणहीन ब्राह्मणांचेही कल्याण झाले .ब्राह्मणेतरांना विद्या व संपत्ती मिळवण्यासाठी मार्ग मोकळे आहेत .पण आपल्या बहिष्कृत वर्गाची स्थिती मात्र जन्मसिद्ध योग्यता व पवित्रतेने फारच शोचनीय झाली आहे .व्यापार ,नोकरी आणि शेती हे धनसंचयाचे  मार्ग त्यांना मोकळे झाले नाहीत .आपल्या वर्गाकडे नैसर्गिक गुणांची अजिबात वाण नाही .पण परिस्थिती अनुकूल नाही, म्हणूनच आपले राजकीय सामर्थ्य वाढविले पाहिजे .’सत्यमेव जयते’ हे तत्त्व पोकळ आहे .सत्याचा जय व्हायचा असेल तर आपण आपली चळवळ बळकट केली पाहिजे.

या परिषदेचे प्रमुख पाहुणे राजर्षी शाहू महाराज यांनी डॉ.आंबेडकरांचा ‘पंडित’ आणि ‘विज्ञानाचे भूषण’ असा गौरवपूर्ण उल्लेख करून अस्पृश्यांना ‘आपल्या जातीचा पुढारी करा ‘असे आवाहनही केले. तसेच त्यांनी आपल्या करवीर संस्थानात अस्पृश्यांवर अन्याय करणारी हजेरीची पद्धत का नष्ट केली हे ही स्पष्ट केले.  वेठबिगारी पद्धतीलाही ही नष्ट करण्याचा मनोदय स्पष्ट केला .अस्पृश्य वर्गाकरता आपण केलेले प्रयत्न बाबुराव यादव यांनी छोट्या पुस्तिकेमध्ये नोंदवून ठेवल्याबद्दल त्यांचे आभारही मानले.

माणगाव परिषदेतील आपल्या भाषणात राजर्षी शाहू महाराज म्हणतात,” आत्तापर्यंत आम्ही निकृष्ट अवस्थेत पोहोचण्याचे कारण आम्ही आमचा योग्य पुढारी निवडत नाही. गोड बोलून नावलौकिक मिळविण्याच्या हेतूने आमच्यापैकी काही अप्पलपोटी मंडळी अयोग्य पुढारी नेमून देऊन अज्ञानी लोकांना फसवतात. आता तुम्ही डॉ. आंबेडकरांनाच आपला पुढारी निवडले .ते तुमचा उद्धार केल्याशिवाय राहणार नाहीत .अस्पृश्याना माणसाप्रमाणे वागवल्या शिवाय राजकारण करता येणार नाही .”या परिषदेच्या अखेरच्या सत्रात महायुद्धविषयक भूमिका, राजर्षींनी अस्पृश्योद्धाराचे मोठे कार्य केल्याबद्दल त्यांचा वाढदिवस सणाप्रमाणे साजरा करणे ,बहिषाकृतांच्या  उन्नती बद्दल कार्यरत असणाऱ्या संस्थानिकांचे आभार, अस्पृश्याना नागरिकत्वाचे व मानवी हक्क समतेच्या तत्त्वावर मिळणे, प्राथमिक शिक्षण मोफत व सक्तीचे करणे ,अस्पृश्यांच्या शाळा एकत्र भरवणे ,मेलेल्या जनावरांचे मास  न खाणे ,ही परिषद भरवण्यात मोठे योगदान दिलेल्या आप्पा दादगोंडा पाटील यांचे आभार अशा स्वरूपाचे पंधरा अठरा मंजूर करण्यात आले.

आज एकशे एक वर्षानंतर सामाजिक परिस्थितीत थोडाफार बदल झाला असला तरी माणगाव परिषदेतील गाभाघटक आपल्याला ध्यानात घ्यावाच लागेल .एकीकडे धर्मावर आधारित राष्ट्र निर्मितीचे पद्धतशीर प्रयत्न सुरूआहेत. दुसरीकडे परधर्माबाबत द्वेष वाढवला जातो आहे. जगण्याच्या मूलभूत प्रश्नांकडे दुर्लक्ष करून संस्कृतिक राष्ट्रवादाचे ढोल बडवले जात  आहेत. नागरिकत्वाबाबतच साशंकता निर्माण केली जात आहे .अस्पृश्य पुढाऱ्यांना धर्मांध पक्ष लालूच दाखवत आहेत .तसेच काही भणंग पुढारीही माझी सोय झाली म्हणजे आम समाजाची सोय झाली असे सोयीचे समिकरण मांडत आहेत .माणगाव परिषदेत या पुढाऱ्यांना राजर्षींनी ‘अप्पलपोटे’ म्हणून संबोधलेआहे .या सर्व पार्श्वभूमीवर माणगाव परिषदेकडे केवळ शताब्दीपुर्तीची  घटना म्हणून नव्हे तर समकालीन संदर्भात आपले अस्तित्व तपासून पाहायला लावणारी घटना म्हणून पाहिले पाहिजे. बाबासाहेबांनी या परिषदेनंतर डीएससी ,बॅरिस्टर या पदव्या प्राप्त केल्या.’बहिष्कृत हितकारणी ‘संस्था काढली .महाडचा सत्याग्रह केला, मनुस्मृती जाळली, काळाराम मंदिर सत्याग्रह केला. व्हाइसरॉयच्या मंत्रिमंडळात ते ‘मजूर मंत्री ‘झाले .स्वतंत्र भारताचे ते पहिले ‘कायदेमंत्री’ झाले .भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार झाले. त्यांनी बौद्ध धर्म स्वीकारला ,हा सारा इतिहास आपण जाणतो .पण या साऱ्याचा प्रारंभबिंदू म्हणून माणगाव परिषदेचे महत्त्व मोठे आहे एकूणच ही परिषद बाबासाहेबांचे नेतृत्व ,कर्तुत्व आणि समाजोद्धाराचे कार्य याचा पाया ठरलेली आहे यात शंका नाही.


(लेखक समाजवादी प्रबोधिनी,इचलकरंजीच्या वतीने गेली एकतीस वर्षे  नियमितपणे प्रकाशित होणाऱ्या ‘प्रबोधन प्रकाशन ज्योती ‘मासिकाचे संपादक आहेत.)

Post a Comment

Previous Post Next Post