नर्‍हे परिसरात खंडणी घेतल्या प्रकरणी फैजल काझी याला पोलीसांनी अटक केली.पुणे :  
हत्याराचा धाक दाखवून बांधकाम व्यावसायिकाकडे १५ हजारांची खंडणी मागून १० हजार रुपये घेतल्याप्रकरणी सिंहगड पोलिसांनी एकाला अटक केली. न्यायालयाने त्याला २२ मार्चपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे.

याबाबत विक्रम मनेरे (वय ४४) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून फैजल काझी (वय २१) याला अटक करण्यात आली आहे. तर आणखी चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. १५ फेब्रुवारी रोजी नर्‍हे परिसरात ही घटना घडली. फिर्यादी हे त्यांच्या कार्यालयात बसले असताना आरोपी त्या ठिकाणी आले. त्यावेळी आरोपींनी चाकू, कोयते, हॉकी स्ट्रीकची भीती दाखवून फिर्यादींना धमकी देऊन त्यांच्याकडे १५ हजार रुपयांची खंडणी मागितली.फिर्यादींना शिवीगाळ करून त्यांच्याकडून १० हजार रुपये आरोपी घेऊन गेले. त्यानंतर रस्त्यावर जाणा-या लोकांना, दुकानदारांना हत्यारांचा धाक दाखवून सार्वजनिक ठिकाणी दहशत निर्माण केली, असे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

याप्रकरणी काझी याला न्यायालयात हजर केले असता, गुन्ह्यातील इतर आरोपींचा शोध घेण्यासाठी, त्यांनी अशा प्रकारे आणखी कोणाकडून खंडणी वसुल केली आहे का ?, त्यांचा आणखी कोणी साथीदार आहे का?, याचा तपास करण्यासाठी त्याला पोलिस कोठडी देण्याची मागणी सरकारी वकीलांनी केली.

Post a comment

0 Comments