रायडर जिनेंद्र सांगावे याचा श्री दत्त उद्योग समूहाच्या वतीने सत्कार , सर्वतोपरी मदत करण्याचे उद्यानपंडीत गणपतराव पाटील यांची ग्वाही
हातकणंगले तालुका (प्रतिनिधी): आप्पासाहेब भोसले 

              

  सुपरक्रॉस नॅशनल चॅम्पियनशिपसह अनेक राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धेत यश मिळविणाऱ्या आणि भारतातील सर्वात लहान रायडर (खेळाडू) म्हणून ओळख निर्माण केलेल्या अब्दुल लाट (ता.) शिरोळ येथील जिनेंद्र किरण सांगावे या १२ वर्षीय खेळाडूचा सत्कार श्री दत्त उद्योग समूहाच्या वतीने करण्यात आला. श्री दत्त सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन, उद्यानपंडित गणपतराव पाटील यांच्या व विविध मान्यवरांच्या हस्ते जिनेंद्र सांगावे व त्याच्या साथीदारांचा सत्कार करून भरीव आर्थिक मदतही देण्यात आली.

  शिवनाकवाडी येथील इंदिरा महिला सहकारी सूत गिरणीच्या क्रीडांगणावर जिनेंद्र सांगावे आणि त्याच्या साथीदार खेळाडूंनी रायडींगची चित्तथरारक प्रात्यक्षिके सादर करून सर्वांचीच वाहवा मिळवली. यावेळी कोच सागर सांगावे यांनी जिनेंद्रच्या कामगिरीचा आढावा घेतला. २०१६ पासून जिनेंद्र रायडर म्हणून मोटरसायकल रेसिंग स्पर्धेत भाग घेऊ लागला. गोवा, पुणे, कोचिन, नाशिक, बेळगावी, जयपूर, बरोडा, मुंबई, बेंगलोर, कोइंबतूर, श्रीलंका आदी ठिकाणी झालेल्या २० पेक्षा जास्त स्पर्धेत भाग घेऊन पहिल्या तीन क्रमांकामध्ये त्याने यश मिळवले आहे. यावेळी बोलताना श्रमशक्ती परिवाराचे कॉ. आप्पा पाटील यांनी जिनेंद्रने अल्पवयात मिळविलेले यश तालुक्यासाठी अभिमानास्पद असल्याचे सांगून त्याच्या पुढील वाटचालीसाठी आर्थिक मदत करण्याचे आवाहन केले. उद्यानपंडित गणपतराव पाटील म्हणाले, जिद्द, चिकाटी, सातत्यपूर्ण प्रयत्न आणि प्रचंड कष्टातून जिनेंद्र सांगावे या १२ वर्षीय खेळाडूने मोठे यश मिळवले आहे. त्याच्यातील खेळाप्रती असलेली आवड आणि समर्पण वृत्ती उल्लेखनीय आहे. त्याने यापुढेही विविध देश व आंतरराष्ट्रीय पातळीवर यश मिळवावे. श्री दत्त उद्योग समूह नेहमीच त्याच्या पाठीशी खंबीरपणे राहील. त्याला सर्वतोपरी मदत करण्यास अग्रेसर राहील.

   यावेळी श्री दत्त भांडारचे चेअरमन दामोदर सुतार, उद्योगपती अशोकराव कोळेकर यांनीही प्रत्येकी रोख १० हजाराची मदत केली. दादासाहेब पाटील यांनी सूत्रसंचलन केले. यावेळी इंदिरा सूतगिरणी परिवाराच्या वतीनेही मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. यावेळी दत्त कारखान्याचे कार्यकारी संचालक एम. व्ही. पाटील, जयसिंगपूर उदगाव बँकेचे व्हाईस चेअरमन महेंद्र बागी, दत्तचे संचालक रघुनाथ पाटील, पिंटू पाटील, प्रा.मोहन पाटील, मुसा डांगे, मुख्य शेती अधिकारी श्रीशैल हेगान्ना, सेक्रेटरी अशोक शिंदे, दगडू माने, रमेश पाटील, डॉ. अरुण कुलकर्णी, ऍड.रोहित पाटील, शीतल वाटेगावे, कुंतीनाथ  बरगाले, बाबासो डुनुन्ग,श्री टिटवे, संजय सुतार, माहेश्वरी समाज इचलकरंजीचे पदाधिकारी आदी उपस्थित होते..

Post a comment

0 Comments