व्हॉट्सऍपद्वारे ओळख करून महिलेच्या मदतीने लुटणाऱया महिलेसह तिघांना अटक करण्यात सातारा गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाला यश

 


व्हॉट्सऍपद्वारे ओळख करून महिलेच्या मदतीने लुटणाऱया महिलेसह तिघांना अटक करण्यात सातारा गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाला यश आले आहे.काजल प्रदीप मुळेकर (वय 28, रा. चव्हाण वस्ती, थेऊर, ता. हवेली, जि. पुणे), अजिंक्य रावसाहेब नाळे (वय 23), वैभव प्रकाश नाळे (वय 28, दोघेही रा. करावागज, ता. बारामती, पुणे) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

6 डिसेंबर 2019 रोजी ठोसेघर (ता. सातारा) तसेच इतर ठिकाणी फेसबुक, व्हॉट्सऍपद्वारे ओळख निर्माण करून एका व्यक्तीला भेटण्याच्या बहाण्याने बोलवले होते. तो आल्यानंतर सोने, चारचाकी, पैसे त्याच्याकडून काढून घेऊन त्याला दमदाटी करून मारहाण केली होती.त्यानंतर फोटो, व्हिडीओ काढून व्हायरल करण्याची धमकी दिली होती. या घटनेची नोंद सातारा तालुका पोलीस ठाण्यात झाली होती. अशाप्रकारे कृत्य करणाऱया टोळीचा पोलीस शोध घेत असताना अशाच लुटमारी करणाऱया घटना घडल्या. मात्र, समाजात बदनामी निर्माण होईल या भीतीने अनेकांनी तक्रारी दाखल केल्या नव्हत्या. संबंधित टोळी अत्यंत क्रियाशील असल्याचे निदर्शनास आल्यानंतर जिल्हा पोलीसप्रमुख अजयकुमार बन्सल, अपर पोलीस अधीक्षक धीरज पाटील यांनी या टोळीचा पर्दाफाश करण्याच्या सूचना पोलीस निरीक्षक सजन हंकारे यांना दिल्या होत्या.

त्यांनी मार्गदर्शन करून गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाला संबंधितांच्या मुसक्या आवळण्याच्या सूचना केल्या. पथकाने पुसेगाव, बारामती आणि पुणे जिह्यातील एका संशयिताला ताब्यात घेतले. त्याच्याकडे विचारणा केली असता या टोळीत एक महिलेचा समावेश असल्याचे त्याने सांगितले. संबंधितांना ताब्यात घेऊन त्यांची पोलीस रिमांड घेऊन चौकशी केली असता अशाप्रकारे त्यांनी अनेकांची फसवणूक केली असल्याचे सांगितले.

या गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक सजन हंकारे करीत आहेत. या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक अमित पाटील, दादा परिहार, पोलीस नाईक सुजित भोसले, सागर निकम, सतीश पवार, नितीराज थोरात, राजेंद्र वंजारी, मालोजी चव्हाण, विश्वनाथ आंबळे सहभागी झाले.

Post a comment

0 Comments