सरकारने आता इंधनाचे दर कमी करण्यासाठी त्यावरील करात कपात करण्याच्या हालचाली सुरू केल्या असल्याची बातमी आहे



नवी दिल्ली -
 पेट्रोल आणि डीझेलच्या दरवाढीमुळे सर्वसामान्य ग्राहकांचे कंबरडे मोडले जात असताना स्वयंपाकाच्या गॅसच्या दरातही वाढ केली जात असल्यामुळे नागरिकांमध्ये संतापाची भावना आहे. ही नाराजी कमी करण्यासाठी सरकारने आता इंधनाचे दर कमी करण्यासाठी त्यावरील करात कपात करण्याच्या हालचाली सुरू केल्या असल्याची बातमी आहे.

यासंदर्भातील बैठकीत सहभागी सूत्रांच्या हवाल्याने रॉयटर्सने ही बातमी दिली आहे. जनतेवरचा बोजा कमी करण्यासाठी हे पाउल उचलले जाते आहे. तसेच पाच राज्यांत आता विधानसभा निवडणुकांचा बिगुल वाजला आहे. त्यात दरवाढीचा मुद्दा विरोधकांकडून लावून धरला जाऊ शकतो. त्या पार्श्‍वभूमीवरही सरकार ही वाढ कमी करण्याचा विचार करत असल्याचे सांगण्यात आलेसूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अर्थ मंत्रालयाने पेट्रोलीयम मंत्रालय आणि इंधन पुरवठा करणाऱ्या कंपन्यांशीही बोलणी सुरू केली आहे. महसुलावर जादा बोज न टाकता इंधनाचे दर कमी करण्याच्या दृष्टीने मार्ग काढला जातो आहे. गेल्या दहा महिन्यांत कच्च्या तेलाच्या दरात दुप्पट वाढ झाली आहे. त्याचा थेट प्रभाव पेट्रोल आणि डीझेलच्या किमतीवर पडतो आहे. गेल्या वर्षभरात सरकारने दोन वेळा इंधनावरचा कर वाढवला आहे.

काही शहरांमध्ये पेट्रोलच्या दराने शंभरी ओलांडली आहे. यातील कररूपी आकारला जाणारा पैसा निम्मेपेक्षा जास्त असल्यामुळे ते नाराजीचे मोठे कारण आहे. त्यात जर ग्राहकाला दिलासा मिळाला, अर्थात केंद्राने आणि काही प्रमाणात राज्यांनी त्यांचे कर कमी केले तर ग्राहकाला पेट्रोल व डीझेलही काही प्रमाणात स्वस्तात मिळू शकते.

Post a Comment

Previous Post Next Post