आरोपी महिला करोना बाधित असल्याचे निष्पन्न. न्यायालयात कामासाठी आलेले नागरिक, वकील आणि पोलिसांमध्ये एकच खळबळ उडाली.पिंपरी - चोरीच्या गुन्ह्यातील एका महिला आरोपीला पिंपरी पोलिसांनी न्यायालयात हजर केले. न्यायालयाने तिला न्यायालयीन कोठडी सुनावली. तुरूंगात नेण्यापूर्वी केलेल्या तपासणीत आरोपी महिला करोना बाधित असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे न्यायालयात कामासाठी आलेले नागरिक, वकील आणि पोलिसांमध्ये एकच खळबळ उडाली.

सध्या करोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. त्यामुळे प्रत्येकजण आपली काळजी घेत आहे. पिंपरी न्यायालयातही वावरताना प्रत्येकाने मास्क लावणे बंधनकारक केले आहे. मंगळवारी (दि. 9) नेहमीप्रमाणे न्यायालयाचे काम सुरू होते. त्यावेळी चोरीच्या गुन्ह्यामध्ये पिंपरी पोलिसांनी एका महिलेला अटक केली.नियमाप्रमाणे तिची आरोग्य तपासणीही करण्यात आली. तिला पुढील कार्यवाहीसाठी पिंपरी न्यायालयात आणण्यात आले. न्यायालयाने तिला न्यायालयीन कोठडी सुनावली.सदर महिलेला तुरूंगात पाठविण्यापूर्वी नियमाप्रमाणे तिची करोना तपासणी करण्यात आली. त्यामध्ये ती महिला करोना बाधित असल्याचे निष्पन्न झाले. याबाबतची माहिती मिळताच न्यायालय परिसरात एकच खळबळ उडाली.

आरोपीला अटक केल्यानंतर त्याची आरोग्य तपासणी होते. मात्र तुरूंगात पाठविण्यापूर्वी त्या आरोपीची करोना चाचणी होते. मात्र आरोपीला अटक केल्यावरच त्याची करोना चाचणी करणे गरजचे आहे, असे मत ऍड. अतिश लांडगे यांनी व्यक्‍त केले. ती महिला करोना बाधित असल्याबाबत पोलीस, वकील आणि इतर नागरिक अनभिज्ञ असल्याने तिचा वावर न्यायालय परिसरात होता. भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी आरोपी अटक करतानाच त्याची करोनाची चाचणी करण्यात यावी, अशी मागणी वकिलांकडून होत आहे .

Post a comment

0 Comments