न्यायालयाने वाझे यांना 10 दिवसांची एनआयए कोठडी सुनावली,. संपूर्ण पोलीस दलामध्येच खळबळ .




स्कॉर्पियो स्फोटके प्रकरणी सचिन वाझे यांची चौकशी केल्यानंतर राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) आज आपला मोर्चा वाझे यांच्याबरोबर मुंबई गुन्हे शाखेच्या गुन्हेगारी गुप्तवार्ता विभागात (सीआययू) काम करणाऱया अधिकाऱयांकडे वळवला. सीआययूमधील सहाय्यक निरीक्षक रियाझ काझी यांच्यासह दोन अधिकारी आणि दोन पोलीस कॉन्स्टेबलची एनआयएने कसून चौकशी केली. दुपारी बाराच्या ठोक्याला हे अधिकारी एनआयए कार्यालयात पोहोचले. सुमारे दहा तास त्यांची चौकशी सुरू होती. त्यांच्या चौकशीतही ठोस माहिती हाती लागल्याचे एनआयएच्या सूत्रांनी सांगितले.

शनिवारी एनआयएने सहायक पोलीस निरीक्षक सचिन वाझेंना चौकशीसाठी बोलावले होते.एनआयएने वाझे यांची 13 तास चौकशी केल्यानंतर शनिवारी रात्री उशिरा त्यांना अटक केली. आज सकाळी वाझेंना एनआयएच्या सुट्टीकालीन न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयात एनआयएने वाझेंच्या कोठडीची मागणी केली.वाझेंच्या कोठडीवरून अर्धा तास युक्तिवाद झाला. युक्तिवाद ऐपून घेतल्यानंतर न्यायालयाने वाझे यांना 10 दिवसांची एनआयए कोठडी सुनावली आहे. वाझे यांच्यानंतर सीआययूमधील अधिकाऱयांच्याही मागे चौकशीचा ससेमिरा लागल्याने संपूर्ण पोलीस दलामध्येच खळबळ उडाली आहे.

पाच पानांचे रिमांड
एनआयएच्या तपास अधिकाऱयाने न्यायालयात पाच पानांचे रिमांड ऑप्लिकेशन दाखल केले. त्यात वाझेंच्या अटकेबाबत दहा कारणे लिहिली आहेत. त्याआधारे न्यायालयाने वाझेंना 25 मार्चपर्यंत एनआयए कोठडी सुनावली.

ती इनोव्हाही सापडली
मुकेश अंबानी यांच्या घराजवळ स्पह्टके असलेली स्कॉर्पिओ गाडी कोणी पार्प केली याचा तपास एनआयए करत आहे. त्यासाठी एनआयएची काही पथके मुंबईबाहेर गेल्याचे सूत्रांनी सांगितले. त्या स्कॉर्पिओच्या मागे एक इनोव्हा गाडी होती. ती इनोव्हा गाडी आज पहाटे तीनच्या सुमारास जप्त करून तपासणीसाठी एनआयएच्या कार्यालयात आणली गेली. ती इनोव्हा तपासणीसाठी फॉरेन्सिक लॅबला पाठवली जाणार आहे.

एनआयएच्या चौकशीपूर्वी…

मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणी दहशतवादविरोधी पथकाकडून (एटीएस) अटक होऊ शकत असल्याने वाझे यांनी ठाणे येथील सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. या अर्जावर निर्णय होईपर्यंत अटक केली जाऊ नये अशी मागणी त्यात करण्यात आली होती. परंतु हे गंभीर प्रकरण असल्याने वाझे यांना अटक करूनच त्यांची चौकशी करणे महत्त्वाचे आहे असा युक्तिवाद एटीएसकडून न्यायालयात करण्यात आला. एटीएसने वाझे यांच्या अर्जास विरोध केला.

न्यायालयाने दोन्ही बाजूंचे युक्तिवाद ऐकून घेतले. वाझे यांच्याविरोधात प्रथमदर्शनी पुरावे असल्याने त्यांना अटकपूर्व जामीन देता येणार नाही असे स्पष्ट करत न्यायालयाने त्यांची याचिका फेटाळून लावली.

वाझे यांना एटीएसने अटक करण्यापूर्वीच एनआयएने त्यांचा जबाब नोंदवला. सुमारे 13 तास त्यांच्यावर प्रश्नांचा भडिमार केला. चौकशी पूर्ण झाल्यानंतर रात्री उशिरा वाझे यांना एनआयएने अटक केली आणि आज सुट्टीकालीन न्यायालयाकडून त्यांची कोठडीही मिळवली.

Post a Comment

Previous Post Next Post