स्वातंत्र्य लढ्यातील मुस्लिमांचे योगदान सारख्या अतुल्य पुस्तकांचे प्रकाशक, संदेश लायब्रेरी, पुणेचे संस्थापक आणि सामाजिक कार्यकर्ते सलीम शेख यांचे दुःखद निधन



पुणे :  संत महात्मे विचारवंत, मुस्लिमांचे विज्ञान क्षेत्रातील योगदान, कुरआन आणि आधुनिक विज्ञान आणि स्वातंत्र्य लढ्यातील मुस्लिमांचे योगदान सारख्या अतुल्य पुस्तकांचे प्रकाशक, संदेश लायब्रेरी, पुणेचे संस्थापक आणि सामाजिक कार्यकर्ते सलीम शेख यांचे दुःखद निधन झाले आहे.

निस्वार्थता आणि समर्पणभाव काय असतो, याची सलीम भाईंना भेटलेल्या अनेकांना प्रचिती येत असे. इतरांच्या लेखांना चोरून स्वतःच्या नावावर खपविणाऱ्या लेखकांच्या काळात, स्वतः अनेक लेख आणि पुस्तके लिहून, आपल्या लिहिलेल्या लेखांना अन्य लेखकांच्या नावे समाजासमोर मांडणारा हा व्यक्ती खरेच अवलिया होता.

पुणे शहरातील वाकडेवाडी मस्जिद परिसरातून सुरू झालेले समाजकार्य हळूहळू देशभरात पोहोचवल्यानंतरही हा माणूस नेहमीच पडद्यामागेच राहिला. अनेक वृत्तपत्रांत लेख, मुस्लिम समाज जागृतीसाठी अनेक मोहिमा राबवणारा हा व्यक्ती कधीच पडद्यावर आला नाही. 

या व्यक्तीच्या स्त्रीभ्रूण हत्या संदर्भात छेडलेल्या मोहिमेची दखल अनेकांना घ्यावी लागली. लॉकडाऊन काळात शेकडो जणांना आत्महत्या करण्यापासून परावृत्त करण्यात सलीम भाईचा मोठा वाटा. लॉकडाऊन काळात आत्महत्या करण्याच्या विचार येणाऱ्यांसाठी त्यांनी समुपदेशन सेवा चालवली. अनेकांना भेटून त्यांचे मनःपरिवर्तन केले.

त्यांच्या संत महात्मे आणि विचारवंत या पुस्तकाची दखल घेऊन पुणे महानगर पालिकेने त्यांना 'मौलाना आझाद' पुरस्काराने सन्मानित केले. त्यांच्या मुस्लिमांचे विज्ञान क्षेत्रातील योगदान या पुस्तकाने मुस्लिम युवकांना जागृत केले. स्वातंत्र्य लढ्यातील मुस्लिमांचे योगदान या पुस्तकाने एक मोठा दस्तावेज उपलब्ध करून दिला.

मागील १२ वर्षात हजारो मुस्लिमेत्तर बांधवांना मोफत कुरआन पोहोचवले. कुरआनबद्दल असणाऱ्या शंका कुशंकांचे निरसन करण्यासाठी संबंधित व्यक्तीची भेट घेऊन त्यांना समाधानकारक मार्गदर्शन दिले. त्यांनी अनेक मुस्लिम युवकांना व्यक्त होण्यासाठी आणि मराठीत लेखन करण्यासाठी प्रोत्साहित केले. सलीम भाईने पुण्यात बसून त्यांचे कार्य देशभरात पोहोचवले होते. ते मात्र नेहमीच पडद्यामागे राहिले. आणि आज ते नेहमीसाठी काळाच्या पडद्याआड गेले आहेत.


http://www.sandeshlibrary.com/

Post a Comment

Previous Post Next Post