नगर अर्बन बँकेच्या चिल्लर घोटाळा प्रकरणातील अटक करण्यात आलेल्या आरोपींना दोन दिवसांच्या पोलीस कोठडीत ठेवण्याचे न्यायालयाने दिले आदेश ,. 11 माजी संचालकांना म्हणणे मांडण्यासाठी बोलावण्यात आले होते. मात्र, केवळ एकाच माजी संचालकाने चौकशीला हजेरी लावली बाकीच्यांनी दांडी मारलीनगर अर्बन बँकेच्या चिल्लर घोटाळा प्रकरणातील अटक करण्यात आलेल्या आरोपींना दोन दिवसांच्या पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. दरम्यान, आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाकडून 11 माजी संचालकांना आज म्हणणे मांडण्यासाठी बोलावण्यात आले होते. मात्र, केवळ एकाच माजी संचालकाने चौकशीला हजेरी लावली असून, बाकीच्यांनी दांडी मारली आहे. त्यामुळे या सर्वांना उद्या संधी देण्यात येणार आहे.

नगर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक यामध्ये तीन कोटी रुपयांच्या चिल्लर घोटाळा उघडकीला आल्यानंतर आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाने याचा तपास सुरू केला होता. बँकेने कागदपत्रे न दिल्यामुळे तेथे धाड टाकून कागदपत्रे मिळवली व काल चारजणांना अटक करण्यात आली होती.यामध्ये अर्बन बँकेच्या मुख्य शाखेचे तत्कालीन व्यवस्थापक घनश्याम बल्लाळ यांच्यासह राजेंद्र हुंडेकरी, प्रदीप पाटील, स्वप्नील बोरा यांचा समावेश आहे. या आरोपींना आज न्यायालयात हजर करण्यात आल्यानंतर आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या उपअधिक्षिका प्रांजल सोनवणे यांनी न्यायालयात बाजू मांडली. या घटनेचा सखोल तपास करायचा असून, काही कागदपत्रे हस्तगत केली आहेत. या गुह्याची व्याप्ती मोठी आहे. तसेच, यामध्ये अजून कोण सामील आहेत, याचा तपास करायचा आहे. त्यामुळे आरोपींना पोलीस कोठडी द्यावी, असा युक्तिवाद त्यांनी केला. न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर दोन दिवस पोलीस कोठडी सुनावली आहे.

दरम्यान, नगर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेच्या तीन कोटी रुपयांचा चिल्लर घोटाळाप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाने बँकेच्या माजी संचालकांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या 11 संचालकांना आज चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले होते. यात भाजपचे माजी खासदार तथा बँकेचे माजी अध्यक्ष दिलीप गांधी, अजय बोरा, अनिल कोठारी, दीपक गांधी, शैलेश मुनोत, किशोर बोरा, संजय लुनिया, केदार केसकर, साधना भंडारी, मनीष साठे, नवनीत गांधी यांचा समावेश आहे. मात्र, केवळ केदार केसकर हेच चौकशीसाठी हजर राहिले होते.

नगर अर्बनमधील घोटाळ्याबाबत 11 संचालकांना नोटिसा बजावल्या होत्या. यातील सातजणांनी नोटिसा घेतल्या असून, चारजणांनी नोटिसा घेतलेल्या नाहीत. त्यामुळे त्यांच्या घरांवर नोटिसा चिकटवल्या आहेत. आज कुणी उपस्थित राहिले नसले, तरी त्यांना उद्या आणखी एक संधी देण्यात येणार आहे. या प्रकरणात काही महत्त्वाचे धागेदोरे हाती लागले आहेत.-

- प्रांजल सोनवणे, उपअधीक्षक, आर्थिक गुन्हे शाखा.

Post a comment

0 Comments