करोनाचा प्रकोप ओसरताच त्या करोनायोद्‌ध्यांवर उपासमारीची वेळ आणण्यात आली



पिंपरी -
 जेव्हा करोना शहरात थैमान घालत होता. करोनाग्रस्ताचे नातेवाइक देखील रुग्णाच्या जवळ जाण्यास घाबरत होते, तेव्हा स्वत:च्या जीवावर उदार ज्यांनी हजारो रुग्णांचे जीव वाचविले अशा वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे सर्वत्र कौतुक होत होते. करोना योद्धा म्हणून त्यांचा गौरव केला जात होता. परंतु करोनाचा प्रकोप ओसरताच त्या करोनायोद्‌ध्यांवर उपासमारीची वेळ आणण्यात आली आहे. स्वत:ची आणि स्वत:च्या कुटुंबीयांची काळजी न करता ज्यांनी रुग्णसेवा केली त्यांच्यावर आज महापालिकेच्या प्रवेशद्वारासमोर बसून बेमुदत उपोषण करण्याची वेळ आम्हाला बेरोजगार करु नकात… किमान मानधनावर तरी महापालिकेच्या रुग्णालयात आम्हाला रुजू करुन घ्या… अशी मागणी हे करोना योद्धे करत आहेत.

करोनाच्या त्या भीषण काळामध्ये डॉक्‍टर, नर्स यांचा मोठा तुटवडा जाणवत होता. रुग्णांना वाचविताना राज्यातील अनेक वैद्यकीय कर्मचाऱ्यांना प्राणांची आहुती द्यावी लागली. त्यावेळी यांच्या कार्याचे गुणगान करत करोनाच्या काळात सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांना कायमस्वरुपी करुन घेण्याचे आश्‍वासन देण्यात आले होते. मात्र अवघ्या सहा महिन्यांनंतरच त्यांना कामावरुन काढून टाकण्यात आले. किमान मानधनावर तरी महापालिकेच्या रुग्णालयात रूजू करून घ्यावे या मागणीसाठी महापालिकेसमोर सोमवारपासून 530 वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी बेमुदत उपोषण सुरू केले आहे.

ज्यावेळी रस्त्यावर कोणीही फिरकत नव्हते, त्यावेळी डॉक्‍टर, वॉर्ड बॉय, स्टाफ नर्स सतत आजार आणि मृत्यूच्या भीतीत वावरत रुग्णांचे जीव वाचवित होते. त्यांना मार्च महिन्यामध्ये कामावर घेताना तुम्हाला महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये कायमस्वरुपी भरती करून घेऊ असे आश्‍वासन दिले होते, असे हे कर्मचारी सांगतात. करोनाच्या काळामध्येही त्यांना दुय्यम वागणूक देण्यात आली. पीपीई किट, ग्लोव्हज, मास्क यांचा पुरवठाही त्यांना वेळेत झाला नाही. वेळेत जेवण देखील या कर्मचाऱ्यांना दिले गेले नाही, अशा वाईट परिस्थितीतही कर्मचाऱ्यांनी काम केले. या कर्मचाऱ्यांशी दैनिक प्रभात ने संवाद साधला असता त्यांनी कथन केलेले अनुभव दगडालाही पाझर फोडतील असे होते.

पाच वर्षाच्या मुलीला घरात ठेवून कामावर हजर

स्टाफ नर्स धनश्री पवार म्हणाल्या, आम्ही कुटुंबाचा विचार न करता नागरिकांच्या आरोग्यासाठी काम करत राहिलो. मला रुग्णांवर उपचार करत असताना करोनाची लागण झाली. त्यानंतर अकरा दिवसांनी माझ्या पतींचाही अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यामुळे त्यांना आयसोलेट व्हावे लागले. त्या परिस्थितीत माझी पाच वर्षांची मुलगी दोन दिवस घरामध्ये एकटी होती. तिला काही माहीत नव्हते. अशा परिस्थितीमध्ये आम्ही काम केले. मात्र या प्रशासनाने आता आमच्यावर उपासमारीची वेळ आणली आहे..

Post a Comment

Previous Post Next Post