पश्चिम महाराष्ट्रात वीजचोरी विरोधात वेगाने मोहीम सुरु केली



वीजतारांवर आकडे टाकून किंवा मीटरमध्ये फेरफार करून विजेचा वापर करणाऱ्यांना दणका देत महावितरणने वीजचोरी विरोधात वेगाने मोहीम सुरु केली आहे. पुणे, सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यामध्ये गेल्या दीड महिन्यात नियमित व विशेष मोहिमेमध्ये घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक वर्गवारीतील 1876 ठिकाणी 4 कोटी 57 लाख रुपयांच्या वीजचोऱ्या उघडकीस आणल्या आहेत. या वीजचोरांविरुद्ध भारतीय विद्युत कायद्याचे कलम 135 प्रमाणे फौजदारी कारवाई सुरू करण्यात आली आहे.

महावितरणकडून घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिकसह सर्व वर्गवारीमध्ये मागेल त्यांना व पाहिजे तेवढ्या वीजभाराची अधिकृत वीजजोडणी उपलब्ध असताना देखील वीजचोरी करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्याचे निर्देश पुणे प्रादेशिक संचालक (प्र.) श्री.अंकुश नाळे यांनी दिले आहेत.

त्याप्रमाणे प्रादेशिक विभागात धडक मोहीम राबविण्यात येत आहे व आतापर्यंत 1878 ठिकाणी 4 कोटी 57 लाख रुपयांच्या वीजचोऱ्या उघडकीस आणल्या आहेत. तर 566 प्रकरणांमध्ये 99 लाख रुपयांची वसुली देखील करण्यात आली आहे. वीजचोरीविरोधात मोहिमेला आणखी वेग देण्यासाठी प्रादेशिक संचालक (प्र.) श्री. अंकुश नाळे हे स्वतः या मोहिमेत विविध ठिकाणी भेटी देऊन महावितरणच्या पथकांना मार्गदर्शन करीत आहे व वीजचोरीच्या विविध प्रकारांची पाहणी करीत आहेत.

सातारा जिल्ह्यामध्ये कराड, फलटण, सातारा, वडूज व वाई विभागांमध्ये वीजचोरीविरोधात धडक कारवाई करून वीजचोरीचे प्रकार उघड करण्यात येत आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 236 ठिकाणी 26 लाख रुपयांच्या वीजचोऱ्या उघडकीस आल्या आहेत. त्यापैकी 212 प्रकरणांत 23 लाख 72 हजार रुपयांचा दंड व वीजबिलांची वसुली करण्यात आली आहे.

उघडकीस आलेल्या सर्व वीजचोऱ्यांप्रकरणी भारतीय विद्युत कायदा 2003 नुसार कलम 135 प्रमाणे कारवाई सुरु आहे. वीजचोरी प्रकरणात ज्यांनी दंडात्मक रकमेसह चोरीच्या वीजवापराप्रमाणे संपूर्ण बिलाची रक्कम भरली नाही तर त्यांच्याविरुद्ध फौजदारी कारवाई करण्यात येत आहे. विद्युत अपघाताचा धोका असणाऱ्या विजेची चोरी करण्याऐवजी अधिकृत वीजजोडणी घेऊन मोठ्या रकमेची दंडात्मक किंवा फौजदारी कारवाईमधील कारावासाची शिक्षा टाळावी असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे. सोबतच या मोहिमेत विजेचा अनधिकृत वापर देखील आढळून येत असून संबंधितांविरुद्ध कलम 126 नुसार कारवाई करण्यात येत आहे. वीजचोरीविरोधी वेगात असलेली ही मोहीम यापुढेही सुरु राहणार आहे.

पश्चिम महाराष्ट्रात महावितरणने वीजचोरी विरोधात धडक मोहीम सुरू केली आहे. प्रादेशिक संचालक (प्र.) अंकुश नाळे हे मोहिमेत विविध ठिकाणी भेटी देऊन पथकांना मार्गदर्शन करीत आहे व वीजचोरीच्या प्रकारांची पाहणी करीत आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post