भारतीय जनता पक्षाचे सरकार होते, त्यावेळी आपण 11 गावांसाठी किती निधी मागितला होता ?फुरसुंगी - महापालिकेत नव्याने समाविष्ट 23 गावांसाठी आपण तब्बल 9000 कोटी रुपयांची मागणी महाविकास आघाडीच्या राज्य शासनाकडे केली आहे. याचे स्वागत आहे; परंतु, पालिकेत 2017 मध्ये 11 गावे समाविष्ट करण्यात आली. त्यावेळी राज्यात व महापालिकेतही भारतीय जनता पक्षाचे सरकार होते, त्यावेळी आपण 11 गावांसाठी किती निधी मागितला होता? आणि राज्य शासनानेही तो दिला का? असा सवाल करीत आता पालिकेने नव्याने समाविष्ट 11 गावांसाठी 2021-22च्या अर्थसंकल्पात चालू वर्षी किमान 2000 कोटी रुपयांची तरतूद करावी, अशी मागणी नगरसेवक गणेश ढोरे यांनी महापौर मुरलीधर मोहोळ यांच्याकडे केली आहे.याबाबत नगरसेवक गणेश ढोरे म्हणाले की, महापौरांनी 9000 कोटी रुपयांची मागणी 23 गावांसाठी केली आहे, हे स्वागतार्ह आहे. परंतु, 2017 मध्ये समाविष्ट 11 गावांसाठी आपण आपल्या भाजप पक्षाच्या राज्यशासनाकडे पुरेशी तरतूद का मागितली नाही? या 23 गावांच्या तुलनेने 11 गावे लोकसंख्येच्या व क्षेत्रफळाच्या दृष्टीने मोठे असून या गावांच्या विकासासाठी आता, चालु वर्षी 2000 कोटी रुपयांची तरतूद सुद्धा कमी पडणार आहे.

आपल्या मनपा प्रशासन व सत्ताधारी यांनी ग्रामीण पार्श्‍वभूमीच्या 11 गावांसाठी चालू वर्षी किमान 2000 कोटी रुपयांची भरीव अर्थिक तरतूद देणे अपेक्षित आहे. याबाबतचे निवेदन नगरसेवक ढोरे यांनी महापौर, उपमहापौर, स्थायी समिती अध्यक्ष आणि विरोधी पक्षनेते यांच्याकडे दिले आहे.कोविड -19ची पार्श्‍वभूमी लक्षात घेता, 2020-21च्या अर्थसंकल्पात कपात केली गेली आहे. यामुळे 11 गावांतील विकाससकामांच्या बाबतीत नागरिकांचा अपेक्षांचा भंग झालेला आहे. चालू वर्षी किमान 2000 कोटी रुपयांची तरी आर्थिक तरतूद महानगरपालिकेने 11 गावांच्या विकासासाठी करणे आवश्‍यक आहे. तरी, 2021-22 महानगरपालिकेच्या अर्थसंकल्पात भरीव आर्थिक तरतूद स्थायी समितीने करावी.

- गणेश ढोरे, नगरसेवक

Post a comment

0 Comments