राडारोडा टाकणाऱ्या महा मेट्रो वर कारवाईची मागणी



 पुणे : नदीपात्रात भराव, राडारोडा टाकणाऱ्या आणि पूरपरिस्थितीस कारणीभूत ठरणारे काम केल्याबद्दल  महा मेट्रो वर कारवाई करावी, कामास स्थगिती द्यावी, अशी मागणी ऑल इंडिया अँटी करप्शन बोर्ड चे प्रदेशाध्यक्ष सनी निम्हण यांनी निवेदन द्वारे केली आहे.

प्रदेशाध्यक्ष  सनी लक्ष्मण निम्हण, तसेच  प्रदेश उपाध्यक्ष आदित्य दळवी  यांनी पुणे मनपा आयुक्त कार्यालयात या मागणीचे निवेदन दिले.

जलसंपदा विभागाने वारंवार सूचना देऊनही नदीपात्रात टाकलेला भराव काढून टाकण्यात 'महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशन'कडून (महामेट्रो) टाळाटाळ केली जात असल्याने त्यांना काम थांबविण्याचे आदेश देण्यात यावेत, अशी  मागणी या निवेदनात त्यांनी केली आहे.

मेट्रो'ने टाकलेल्या भरावामुळे नदीपात्रालगत मोठ्या प्रमाणात पूर येण्याची भीती निर्माण झाली आहे.

पुणे मेट्रोच्या कामासाठी डेक्कन जिमखाना ते संभाजी उद्यानापर्यंत मोठ्या प्रमाणात राडारोडा आणि भराव टाकण्यात आला आहे. पावसाळ्यात खडकवासल्यातून विसर्गाचे प्रमाण वाढविल्यास मध्यवर्ती पेठांमधील भागाला त्याचा मोठा फटका बसण्याची भीती आहे. त्यामुळे 'मेट्रो'च्या कामासाठी टाकलेला भराव काढून टाकण्याच्या सूचना जलसंपदा विभागाने 'महामेट्रो'ला यापूर्वी अनेकदा दिल्या आहेत; पण त्याकडे दुर्लक्ष करून भराव टाकण्याचे काम सुरूच आहे. 'राष्ट्रीय हरित न्यायाधिकरण' (एनजीटी) आणि इतर यंत्रणांनी दिलेल्या आदेशांचे उल्लंघन करून मनमानी पद्धतीने काम करणाऱ्या 'मेट्रो'च्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी आणि भराव काढून टाकेपर्यंत त्यांच्या कामाला स्थगिती द्यावी, असे त्यांनी निवेदनात म्हटले आहे.



Post a Comment

Previous Post Next Post