अफूच्या बोंडांच्या तस्करीचा प्रकार समोर पोलिसांनी सापळा रचून एक ट्रक पकडून दोन लाख 23 हजार रुपये किमतीच्या अफूच्या बोंडांसह एकूण 22 लाख 87 हजार 760 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला



पिंपरी -
 अफूच्या बोंडांच्या तस्करीचा प्रकार समोर आला आहे. पोलिसांनी सापळा रचून एक ट्रक पकडून दोन लाख 23 हजार रुपये किमतीच्या अफूच्या बोंडांसह एकूण 22 लाख 87 हजार 760 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. पोलिसांच्या सामाजिक सुरक्षा पथकाने म्हाळुंगे पोलीस चौकीच्या हद्दीत शनिवारी (दि. 30) ही कारवाई केली.

जगदीशप्रसाद पुनमाराम बिष्णोई (वय 32, रा. जोधपूर, राजस्थान), तानाजी बालाजी सातपुते (वय 23), अभिनेश चाईन्सिंघ पौळ (वय 47, दोघेही रा. चिंबळी फाटा, ता. खेड) यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल कुबडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, चाकण येथून अफूची बोंडे (दोडा चुरा भुकटी व कणीदार पावडर) एका ट्रकमध्ये घेऊन जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.त्यानुसार पोलिसांनी पुणे-नाशिक महामार्गावर कुरुळी येथे सापळा लावला. त्या वेळी चाकणकडून भोसरीच्या दिशेने जात असलेल्या ट्रकला थाबवून ट्रकचालक आरोपी बिष्णोई याच्याकडे पोलिसांनी चौकशी करून ट्रकची पाहणी केली. त्या वेळी ट्रकमध्ये अफूची बोंडे मिळून आली.

त्याचबरोबर चिंबळी फाटा येथील हॉटेल आराध्या व्हेज, नॉनव्हेज व हॉटेल पंजाबी ढाबा येथेही पोलिसांनी छापा मारून अफूची बोंडे जप्त केली. या कारवाईत 42 हजार 40 रुपयांची रोकड, पाच हजार 520 रुपयांचा गुटखा, दोन लाख 23 हजार 200 रुपये किमतीची 12 किलो 400 ग्रॅम अफूची बोंडे (दोडा चुरा भुकटी व कणीदार पावडर), 20 लाख रुपये किमतीचा ट्रक तसेच 15 हजारांचे तीन मोबाइल फोन, असा एकूण 22 लाख 87 हजार 760 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.

सामाजिक सुरक्षा पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल कुबडे, सहायक निरीक्षक नीलेश वाघमारे, उपनिरीक्षक धैर्यशील सोळंके, सहायक फौजदार विजय कांबळे, पोलीस कर्मचारी संतोष असवले, अनंत यादव, संदीप गवारी, सुनील शिरसाठ, नितीन लोंढे, महेश बारकुले, दीपक साबळे, भगवंता मुठे, अमोल शिंदे, मारुती करचुंडे, विष्णू भारती, गणेश कारोटे, अनिल महाजन, वैष्णवी गावडे, संगीता जाधव, मारोतराव जाधव, राजेश कोकाटे, योगेश तिडके, योगिनी कचरे, सोनाली माने यांच्या पथकाने ही कामगिरी केली.

Post a Comment

Previous Post Next Post