सकाळी नऊ ते रात्री नऊ पर्यंत

पुणेे: सकाळी नऊ तेे रात्री नऊ पर्यंत दुकान खुली ठेवण्यास परवानगी.

 PRESS MEDIA LIVE : पुणे :

पुणे – पुणे शहरातील प्रतिबंधित क्षेत्राबाहेरील अत्यावश्‍यक सेवा वगळता अन्य दुकाने रात्री 9 वाजेपर्यंत खुली ठेवण्यास परवानगी देण्यात आली. महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी याबाबतचा आदेश काढला असून सकाळी 9 ते रात्री 9 पर्यंत दुकाने सुरू राहतील.

यापूर्वी रात्री 7 वाजेपर्यंतच दुकाने सुरू ठेवण्यास परवानगी होती. शॉपिंग मॉल, मार्केट कॉम्लेक्‍स देखील रात्री 9 वाजेपर्यंत सुरू राहणार असून त्यामधील सिनेमागृह मात्र बंद राहतील, असे सांगण्यात आले.

दरम्यान, मेडिकल्स, अत्यावश्‍यक वस्तूंची दुकाने, दवाखाने यापूर्वी दिलेल्या परवानगीनुसार त्यांच्या वेळेत सुरूच राहतील, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे. या पूर्वी दुकानदारांना रात्री 7 वाजताच शटर डाऊन करावे लागत होते. 50 टक्के देखील धंदा होत नसल्याने वेळ वाढवून द्यावी, अशी मागणी दुकानदारांकडून केली जात होती. त्यानुसार वेळ वाढविण्यात आल्याने दुकानदारांना दिलासा मिळाला आहे.

…अन्‌ पालिका नरमली

पुणे शहरातील हॉटेल, रेस्टॉरंट-बारच्या डाइन इन सेवेस 5 ऑक्‍टोबरपासून परवानगी देण्यात आली. सकाळी 8 ते रात्री 10 वाजेपर्यंत हॉटेल्स खुली ठेवण्यास महापालिकेने परवानगी दिली होती. परंतु, दुकानांना मात्र रात्री 7 वाजताच “पॅकअप’ करण्याचे अजब फर्मान महापालिकेकडून काढण्यात आले होते. परिणामी, दुकानदारांमध्ये संतापाची तीव्र लाट उसळली होती. दुकानांबाबत करण्यात आलेल्या दुजाभावाबाबत व्यापाऱ्यांनी नाराजी व्यक्त करत दुकानांना रात्री 9 पर्यंत तरी परवानगी द्या, अशी मागणी प्रशासनाकडे लावून धरली. अखेर त्यांच्या रेट्यापुढे महापालिका नरमली आणि आयुक्‍तांनी दुकानांबाबत सुधारित आदेश शुक्रवारी काढला.

नियम बंधनकारक…

दुकानदारांना रात्री 9 पर्यंत दुकाने उघडी ठेवण्यास परवानगी दिली असली तरीदेखील सोशल डिस्टन्सिंगच्या नियमासह अन्य नियम पाळणे दुकानदारांवर बंधनकारक असणार आहे. मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तीवर आपत्ती व्यवस्थापन कायदा व भारतीय दंड संहितेच्या कलमानुसार कारवाई करण्यात येईल, अशी माहिती पालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी दिली.

Post a comment

0 Comments