श्रीमंत गोविंदराव घोरपडे.

 श्रीमंत गोविंदराव घोरपडे यांच्या द्वितीय स्मृतीदिनानिमित्ताने

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी 

( ९८५०८३०२९० / ८४ २११ ३०२९० )

PRESS MEDIA :


शुक्रवार ता.१६ ऑक्टोबर २०१९ रोजी इचलकरंजी संस्थानचे जहागीरदार श्रीमंत आबासाहेब उर्फ गोविंदराव घोरपडे यांचा दुसरा स्मृतिदिन आहे. इचलकरंजीच्या या अधीपतींनी लोकसेवेचे प्रसिद्धीपासून दूर राहून वर्षानुवर्षे जे काम केले ते अतुलनीय स्वरूपाचे आहे.आज लोकसेवेचाे तोच वसा वारसा श्रीमंत आबासाहेब यांचे चिरंजीव श्रीमंत यशवंतराव घोरपडे पुढे अधिक ताकदीने नेत आहेत ही फार महत्वाची बाब आहे.श्रीमंत आबासाहेब उर्फ गोविंदराव यांच्या द्वितीय स्मृतिदिनी त्यांच्या स्मृतीला विनम्र अभिवादन.

 वयाच्या ८६ व्या वर्षी वृद्धापकाळाने १६ ऑक्टोबर २०१८ रोजी  आबासाहेब कालवश झाले.श्रीमंत आबासाहेब एक कमालीचे दानशूर,कर्तव्यनिष्ठ,निर्मोही आणि राजस व्यक्तिमत्त्व होते.शैक्षणिक संस्थांपासून ते दवाखान्यांपर्यंत सर्व प्रकारच्या सामाजिक उपक्रमांना त्यांनी सातत्यपूर्ण सहकार्य केले.आबासाहेबांना समाजवादी प्रबोधिनीच्या सातत्यपूर्ण व उपक्रमशील लोकप्रबोधन कार्याबद्दल मोठी आस्था होती.व्यक्तिशः माझे त्यांच्याशी गेल्या दोन दशकांपासून ऋणानुबंध होते.समाजवादी प्रबोधिनीचे सकस वैचारिक शिदोरी देणारे ‘प्रबोधन प्रकाशन ज्योती ‘ हे मासिक सर्वदूर पोहोचविण्यासाठी त्यांनी केलेले योगदान फार मोठे आहे.अनेक ग्रंथालये,महाविद्यालये,कार्यकर्ते यांच्यापर्यंत हे मासिक श्रीमंत बाबासाहेबांच्या उदार सहकार्यानेच शक्य झाले.याबद्दल मी कायमचा कृतज्ञ आहे.


इचलकरंजी संस्थांनाच्या जहागिरीला १६९७ पासूनचा म्हणजे सव्वातीनशे वर्षांचा इतिहास आहे.आजऱ्यापासून मिरजेपर्यंतच्या प्रदेशात तब्बल २४१ चौरस मैल एवढ्या विस्तीर्ण आकाराची ही जहागिरी होती.सावंतवाडीकरांच्या अखत्यारीत असलेले ‘म्हापण ‘हे गाव नारो महादेव जोशी यांनी जिंकून घेतले.आणि तेथूनच इचलकरंजी संस्थानाचा पाया रचला गेला.गेल्या तीनशे बावीस वर्षात या संस्थानाला नारो महादेव (१),व्यंकटराव (४),नारायणराव (३),केशवराव (१),गोविंदराव (१) असे दहा अधिपती लाभले.


स्वराज्याचे सरसेनापती संताजी घोरपडे यांना शिवपुत्र संभाजी महाराजांनी दिलेली जहागीर म्हणजे हा प्रांत.संताजींच्या पदरी नारो महादेव जोशी नावाचा कोकणस्थ ब्राम्हण मुलगा आश्रित म्हणून राहिला होता.हा मुलगा अतिशय शूर होता.संताजींचे त्यांच्यावर पुत्रवत प्रेम होते.शूर व युद्धकोशल्यात पटाईत असलेल्या नारो महादेव यांनी आपल्या जोशी आडनावाऐवजी ‘घोरपडे ‘ हे आडनाव धारण केले.नारो महादेव यांच्यानंतर श्रीमंत नारायणराव घोरपडे यांच्यापर्यंतच्या काळाचा इतिहास इतिहासाची अस्सल व अव्वल साधने वापरून लिहिण्याची गरज आहे.कारण या कालखंडाचा विस्तृत इतिहास उपलब्ध नाहीय.तो कोणीतरी अभ्यासकाने विस्तृतपणे लिहिणे गरजेचे आहे याची गरज प्रकर्षाने जाणवते आहे.


श्रीमंत नारायणराव घोरपडे हे संस्थानचे दहावे व अखेरचे अधिपती होते.कारण स्वातंत्र्यानंतर १ मार्च १९४९ रोजी संस्थाने व जहागिरी यांचे अधिकार रद्द झाले.श्रीमंत नारायणराव १८७० साली जन्मले आणि २१ ऑक्टोबर १९४३ रोजी कालवश झाले.सध्या त्यांचे एकशे पन्नासावे जन्मवर्षं सुरू आहे.श्रीमंत गोविंदराव यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी श्रीमंत पद्मावती यांनी  १० ऑगस्ट १८७६ रोजी सहा वर्षाच्या नारायणराव यांना दत्तक घेतले.नारायणरावांचे मूळ नाव गोपाळ जोशी (करकम्बकर ) असे होते.श्रीमंत नारायणराव कोल्हापुरातील राजाराम महाविद्यालयात  व मुंबईतील एल्फिन्स्टन कॉलेजात शिकले.इंग्रजी,इतिहास,अर्थशास्त्र या विषयांचे ते पदवीधर होते.न्यायमूर्ती रानडे व लोकमान्य टिळक यांच्या विचारांचा त्यांच्यावर प्रभाव होता.१८ जून १९९२ रोजी संस्थानिक पदाची सूत्रे त्यांनी स्वीकारली आणि त्यानंतर ही जहागिरी विश्वस्तपणे सांभाळली.


श्रीमंत नारायणरावांनी सहकार ,शिक्षण,कला,उद्योग,नागरी सुविधा या सर्व क्षेत्रात आपले संस्थान अग्रभागी राहील याकडे कटाक्षाने लक्ष दिले.इचलकरंजी येथे १८९७ साली त्यांनी ‘गोविंदराव हायस्कूल ‘ची स्थापना केली.एका अर्थाने वस्त्रनगरीचे खरेखुरे शिल्पकार,शिक्षणमहर्षी,सहकाराचे दिपस्तंभ,कलाकारांचा पोशिंदा,मर्मज्ञ रसिक म्हणून त्यांच्याकडे पाहावे लागेल.फार मोठे सामाजिक भान त्यांच्याकडे होते.लोकप्रबोधनाच्या कामात ते अग्रेसर होते.’कन्यादान ‘या शब्दावर त्यांनी एकदा जाणीवपूर्वक चर्चा घडवून आणली होती.आणि मुद्देसूद बोलणाऱ्यास त्याकाळी पन्नास रुपये बक्षीस दिले होते.तसेच आपल्याला अपत्यप्राप्ती होणार नाही हे समजूनही त्यांनी दुसरे लग्न केले नाही.महात्मा फुले व सावित्रीबाई यांचा आदर्श  एका अर्थाने त्यांनी पुढे नेला.


श्रीमंत नारायणराव यांच्या कारकिर्दीत संस्थानच्या खर्चाने चालणाऱ्या शाळांची संख्या १७ वरून ४७ वर गेली.त्यातील पाच शाळा केवळ मुलींसाठी होत्या.अनेकांना शिष्यवृत्ती देऊन त्यांनी पुण्या – मुंबईला शिकायला पाठविले.भरतभरसह परदेशातही येथील मुलांना शिकायला जाता यावे यासाठी त्यांनी ‘इचलकरंजी एज्युकेशन एडोमेन्ट  फंड ‘ आणि ‘इचलकरंजी एज्युकेशनल चॅरिटेबल ट्रस्ट ‘ स्थापन केला.तसेच वाचनालये,दवाखाने उभारले.संगीत,नाट्य यासह सर्व कलांना प्रोत्साहन दिले.१९२४ साली सांगली येथे झालेल्या विसाव्या मराठी नाट्यसंमेलनाचे ते अध्यक्ष होते.त्यांनी किर्लोस्कर,सह्याद्री आदी नियतकालिकांतून लेखन केले होते.तसेच काही इंग्रजी पुस्तकांचे मराठी भाषांतरही केले होते.


श्रीमंत नारायणराव यांच्या पत्नी श्रीमंत गंगामाईसाहेब या मूळच्या अहमदनगरच्या.तेथील मोहिनीराज मोरेश्वर परांजपे यांच्या त्या कन्या.६ जानेवारी १८७५  रोजी जन्मलेल्या गंगामाईसाहेब २४ डिसेंबर १९५७ रोजी कालवश झाल्या.वयाच्या अकराव्या वर्षी २८ मार्च १८८६ रोजी त्यांचा श्रीमंत नारायणरावांशी विवाह झाला.या जहागिरीचे सम्राज्ञीपद त्यांनी श्रीमंतांसह ५७ वर्षे भूषविले. स्वातंत्र्यानंतर श्रीमंत नारायणराव बाबासाहेब घोरपडे एज्युकेशन सोसायटीची स्थापना करण्यात आली.या संस्थेला श्रीमंत गंगामाई राणीसरकारांनी राजवाड्याजवळील पागा इमारत देणगी दिली.तेथे गेली पन्नास वर्षे सुसज्ज अशी मुलींची शाळा व ज्युनियर कॉलेज उत्तमपणे कार्यरत आहे. श्रीमंत नारायणराव कालवश झाल्यावरही चौदा वर्षे त्या कार्यरत होत्या.त्यांनी जसे उपभोगले तसे भोगलेही बरेच. कारण१८९२ साली या दाम्पत्याला अपत्य झाले पण ते गेले.श्रीमंत गंगामाईसरकार पुन्हा मातृत्व मिळवू शकणार नाहीत हेही डॉक्टरी निदान झाले.पोटचा मुलगा गेला,नंतरचे दोन दत्ताकपुत्रही गेले हे सारे दुःख त्यांनी पचविले.


श्रीमंत नारायणराव यांच्या निधनानंतर तीन वर्षांनी १९४६ साली श्रीमंत गोविंदराव उर्फ आबासाहेब यांना दत्तक घेतले.तेंव्हा ते चौदा वर्षाचे होते.ब्रिटिशांसह अनेकांचा विरोध पत्करून त्यांनी हे दत्तकविधान केले.श्रीमंत गंगामाई हे एक लढवय्ये व्यक्तिमत्त्व होते.अर्थात घोरपडे घराण्याला कर्तबगार स्त्रियांचा वारसाच होता. इचलकरंजी जहागिरीचे पहिले व्यंकटराव यांच्या पत्नी श्रीमंत अनुबाई या बाळाजी पेशव्यांच्या कन्या होत्या.१७१३ साली विवाह होऊन त्या संस्थानात आल्या.पहिले व्यंकटराव वयाच्या पंचवीसाव्या वर्षी कालवश झाल्यावर श्रीमंत अनुबाईंनी अनेक वर्षे कारभार केला.तर संस्थानाचे अधिपती श्रीमंत केशवराव तात्यासाहेब यांच्या पत्नी यशोदाबाईंनीही  १८५२ ते १८६४ या बारा वर्षात मोठे काम केले.तोच वारसा श्रीमंत गंगामाई यांनी पुढे नेला.


श्रीमंत गंगामाईनी संस्थानात अनेक सुधारणा केल्या.पंचगंगा घाटाचा विस्तार केला.महिलांसाठी महिलालय उभारले.प्रसूतिगृह उभारले.संस्थानातील मोठा ग्रंथसंग्रह पुणे अभ्यासूना  उपयोगी व्हावीत म्हणून विद्यापीठाला दिला.विद्यार्थी,कलाकार यांना शिष्यवृत्या दिल्या.लेखन – प्रकाशनाला मदत केली.स्त्री मासिकाच्या डिसेंम्बर १९५४ च्या अंकात त्यांच्यावरचा लेख आहे.तर श्रीमंत नारायनरावांच्या आठवणी सांगणाऱ्या ‘स्मृतीसुमने ‘या पुस्तकात त्यांच्या सहजीनावर लेख आहे.


असे मौलिक स्वरूपाचे कार्य करणाऱ्या श्रीमंत नारायणराव आणि श्रीमंत गंगामाईसाहेब यांचे दत्तकपुत्र असलेल्या श्रीमंत गोविंदराव उर्फ आबासाहेब यांनीही ती वसा व वारसा अखेरपर्यंत जपला.संस्थाने खालसा झाल्यावरही एखाद्या संस्थानचे अधिपती कशा पद्धतीने व्रतस्थ भावनेने लोकसेवा करू शकतात हे गेल्या अर्धशतकात त्यांनी दाखवून दिले.महाराष्ट्राच्या स्थापनेनंतर इचलकरंजी आणि परिसराच्या सर्वांगीण विकासात त्यांनी फार मोठे योगदान दिले.समाजाच्या उपयोगासाठी आपल्या राजवाड्यासह सर्व खजिना रिता करणारे महाराष्ट्रातीलच नव्हे तर संपूर्ण भारतातील दुर्मिळ अशा जहागीरदार अधिपतींमध्ये ते अग्रस्थानी होते.


आपल्या संपत्तीचे आपण ‘विश्वस्त ‘आहोत आणि त्याचा उपयोग समाजासाठी केला पाहिजे या भावनेतून त्यांनी विविध ट्रस्ट निमार्ण केले.त्या माध्यमातून त्यांनी अनेक सामाजिक संस्था,दवाखाने,शिक्षणसंस्था,ग्रंथालये,नियतकालिके यांना  मोठी मदत केली.राष्ट्रीय सार्वजनिक अपत्तीपासून लोकांच्या व्यक्तिगत अडीअडचणीत फार मोठी मदत सातत्याने केली. आपला अब्जावधी रुपयांचा अनमोल राजवाडा त्यांनी दत्ताजीराव कदम टेक्निकल इन्स्टिट्यूट अर्थात ‘डी.के.टी.इ.’ या शिक्षण संस्थेला त्यांनी दिला.माजी खासदार ज्येष्ठ नेते कल्लापाण्णा आवादे यांच्या नेतृत्वाखालील या संस्थेला  आज आंतरराष्ट्रीय लौकिक प्राप्त झाला आहे.कारगिल युद्धानंतर सियाचीन येथे सैनिकांसाठी बांधलेल्या हॉस्पिटलला त्यांनी वीस वर्षांपूर्वी बारा लाख रुपयांचे सहाय्य केले होते.कोल्हापूरच्या शाहू स्मारक भवन पासून इचलकरंजीच्या लक्ष्मी व्यंकटेश एज्युकेशन सोसायटी पर्यंत अनेक सामाजिक,शैक्षणिक इमारतींच्या उभारणीला त्यांनी मोठी मदत केली.मंगलधाम सारख्या इमारती नागरपालिकेला देऊन मंगलकार्यालयाची  नागरिकांची मोठी सोय केली.गेल्या  अर्धशतकात त्यांनी अनेक कोटी रुपये समाजाच्या मदतीसाठी दिले पण त्याची कधी वाच्यता केली नाही.त्यांच्या या देणगीच्या माध्यमातून  सामाजिक,शैक्षणिक,सांस्कृतिक,आरोग्य जपण्यासाठी व त्याचा सर्वांगीण विकास करण्यासाठी जे काम झाले त्याचे मोजमाप करता येणे शक्य नाही एवढे ते विविधांगी व अनमोल स्वरूपाचे आहे.


लोकसेवेचे कार्य दशकानुदशके सातत्यपूर्ण पद्धतीने करत असूनही श्रीमंत गोविंदराव उर्फ आबासाहेब नेहमी प्रसिद्धीपासून दूर राहिले.स्वतःचे नाव,फोटो,बातमी ते कोठेही येऊ देत नसत.आजच्या संसदीय लोकशाही व्यवस्थेतही आपल्या पारंपरिक राजघराण्याच्या वारसत्वाचा आणि राजवस्त्रांचा वेगळ्या पद्धतीने दाखला देत जनतेला गृहीत धरण्याचे ,त्याचा राजकीय लाभ मिळवण्याचे  काही प्रकार देशभर दिसत असतांना श्रीमंत आबासाहेब यांनी  प्रसिद्धिविना वर्षानुवर्षे सातत्यपूर्ण केलेली लोकसेवा अधिक ठळकपणे उठून दिसते.आणि त्यांच्या व्यक्तित्वाची महानता अधोरेखित करते.श्रीमंत गोविंदराव उर्फ आबासाहेबांनी साध्या राहणीतून आणि उच्चतम कृतीकार्यातून स्वतःच्या व्यक्तिमत्वाची मुद्रा गेल्या सहा -सात दशकांवर उमटवलेली होती.बदलत्या काळात आणि बदलत्या परिस्थितीत त्या मुद्रेचे ठळकपणे अधिक विशेषत्वाने उमटत राहणार आहे यात शंका नाही.अशा श्रीमंत गोविंदराव उर्फ आबासाहेब यांच्या दुसऱ्या स्मृतिदिनी त्यांना विनम्र अदारांजली…!


(लेखक समाजवादी प्रबोधिनी,इचलकरंजी च्या वतीने गेली एकतीस वर्षे प्रकाशित होणाऱ्या ‘प्रबोधन प्रकाशन ज्योती’ मासिकाचे संपादक आहेत.)

Post a Comment

Previous Post Next Post