AdSense code कोडोली येथील कोव्हि ड रुग्णालयासाठी व्हेंटिलेटर उपलब्ध करून देणार

कोडोली येथील कोव्हि ड रुग्णालयासाठी व्हेंटिलेटर उपलब्ध करून देणार

 


    कोडोली येथील कोव्हिड      रुग्णालयासाठी व्हेंटिलेटर     उपलब्ध करुन देणार.
   

     आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-         यड्रावकर .

P RESS MEDIA LIVE : कोल्हापूर :

कोल्हापूर दि. 13 : यशवंत चॅरिटेबल हॉस्पिटलमार्फत कोरोनाच्या लढाईत सामाजिक उत्तरदायित्व जपत  ग्रामीण भागातील जनतेसाठी कोडोली येथे सुरु केलेले कोवीड हॉस्पिटल पन्हाळा तालुक्यासाठी वरदान ठरणार आहे. रुग्णसेवा, समाजहित व सामान्य रुग्णाला डोळ्यासमोर ठेवून कोडोली येथे यशवंत चॅरिटेबल हॉस्पिटलमार्फत सुरु करण्यात आलेल्या कोव्हिड हॉस्पिटलमधून सामान्य रुग्णांना चांगली आरोग्य सेवा मिळणार आहे. या कोव्हिड हॉस्पिटलसाठी शासनामार्फत व्हेंटिलेटर उपलब्ध करुन दिले जाईल, अशी ग्वाही सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी आज दिली.

            यशवंत चॅरिटेबल हॉस्पिटलमार्फत कोडोली (ता. पन्हाळा) येथे परिसरातील कोरोना रुग्णांसाठी सुरु केलेल्या  शंभर बेडच्या कोव्हिड रुग्णालयाचे उदघाटन श्री. यड्रावकर यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होत कार्यक्रमास प्रांताधिकारी अमित माळी, तहसीलदार रमेश शेंडगे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ योगेश साळे, संस्थेचे सचिव डॉ. जयंत पाटील, प्राचार्य डॉ. मिलिंद गोडबोले उपस्थित होते. पालकमंत्री सतेज पाटील व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे या कार्यक्रमास उपस्थित होते.

            राज्यमंत्री श्री. यड्रावकर म्हणाले, कोरोना विषाणूचा संसर्ग सर्वत्र वाढत आहे. जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रतिबंध करण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्यात प्रशासनामार्फत प्राधान्य देण्यात येत आहे. यामध्ये कोरोना चाचणी, रुग्णवाहिका, हॉस्पीटल बेड व्यवस्थापन, डॉक्टर नियोजन या बाबींना प्राधान्य दिले आहे. या हॉस्पिटलसाठी शासनामार्फत सर्व सहकार्य केले जाईल. कोरोना चाचण्या वाढवून  पन्हाळा तालुका कोरोना मुक्त करण्याबरोबरच पन्हाळा तालुक्यात आरोग्याच्या सर्व सुविधा युद्ध पातळीवर राबिवण्यात येतील असेही राज्यमंत्री श्री. यड्रावकर  म्हणाले.

            सामान्य माणसाला आरोग्य सेवा मिळावी या दृष्टिने  कोडोली येथे उभारण्यात आलेल्या हॉस्पिटला शुभेच्छा देऊन राज्यमंत्री श्री. यड्रावकर म्हणाले, यशवंत चॅरिटेबल हॉस्पिटलचा आदर्श घेऊन  जिल्ह्यातील  वैद्यकीय महाविद्यालये व वैद्यकीय क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थांनी  आपापल्या भागात अशी  हॉस्पिटल उभे केल्यास शासनामार्फत त्यांना सर्व सहकार्य केले जाईल.

*कोडोली येथील कोव्हिड रुग्णालय कोरोना रुग्णांसाठी वरदायी- पालकमंत्री सतेज पाटील*

            पालकमंत्री श्री. पाटील यांनी या कार्यक्रमास व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे शुभेच्छा दिल्या. यावेळी ते म्हणाले, ग्रामीण भागातील रुग्णांना  त्वरीत सेवा मिळावी यासाठी यशवंत चॅरिटेबल हॉस्पिटलमार्फत सुरु केलेले कोव्हिड हॉस्पिटल हे जिल्ह्याच्या आरोग्य सेवेसाठी एक आदर्शच आहे.  ग्रामीण भागातील विशेषत: पन्हाळा तालुक्यातील कोरोना रुग्णांवरील उपचारासाठी हे कोव्हिड हॉस्पिटल वरदायी ठरेल. शंभर खाटांच्या या हॉस्पिटलमध्ये  शासनामार्फत व्हेंटिलेटर उपलब्ध करुन देण्यास प्राधान्य दिले जाईल.

            सचिव डॉ. जयंत पाटील म्हणाले, ग्रामीण भागातील कोरोना रुग्णांना उपचार मिळावेत या उद्देशाने हे कोविड हॉस्पिटल सुरू केले आहे.  संस्थेमार्फत सुरु करण्यात आलेल्या या कोव्हिड हॉस्पिटलमध्ये  40 बेड ऑक्सिजनचे आहेत. रुग्णालयामध्ये एक व्हेंटिलेटर उपलब्ध असून शासनामार्फत हॉस्पिटलसाठी आणखी व्हेंटिलेटर उपलब्ध व्हावीत, अशी मागणी त्यांनी यावेळी केली. रुग्णालयात दाखल झालेल्या रुग्णांना सकस आहार, आयुर्वेदिक काढा देण्यात येणार आहे. रुग्णांकडून योगासने व व्यायाम करुन घेतला जाणार असून स्वच्छ हवेसाठी रुग्णालयामध्ये तुळशीची रोपे ठेवण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ. मिलिंद गोडबोले यांनी केले. यावेळी कोडोली रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. श्रीनिवास अभिवंत, केखले प्राथमिक आरोग्य केंद्राचे शंकर पाटील, डॉ. सूर्यकिरण वाघ, कोडोली पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरज बनसोडे यांच्यासह परिसरतील नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ अभिजित इंगवले यांनी केले.

Post a comment

0 Comments