प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी
(९८५०८ ३०२९० )
prasad.kulkarni65@gmail.co
९ मे हा कर्मवीर भाऊराव पाटील यांचा स्मृतिदिन. २२ सप्टेंबर १८८७ रोजी कुंभोज जन्मलेले कर्मवीर ९ मे १९५९ रोजी कालवश झाले. साताऱ्यामध्ये त्यांची स्मृतीस्थळ आहे. भाऊराव पायगोंडा पाटील हे त्यांचे नाव. त्यांचे शिक्षण विटा कोल्हापूर इत्यादी ठिकाणी झाले.महाराष्ट्रामध्ये आणि विशेषता पश्चिम महाराष्ट्रामध्ये शिक्षण हा आपला मूलभूत हक्क आहे असं सर्वसामान्य जनतेला वाटाव असं काम कर्मवीर भाऊराव पाटील यांनी केलेल आहे. पारंपरिक समाजात बदल घडवून त्याला आधुनिक वैज्ञानिक बनवायचे असेल तर शिक्षण हेच एकमेव साधन आहे यावर कर्मवीरांचा प्रचंड विश्वास होता.अंतरीच्या उमाळ्यानी आणि कमालीच्या निस्पृह भावनेने त्यांनी सुरू केलेलं शिक्षण प्रसारच कार्य एका व्यापक चळवळीत रूपांतरित झालेल आपल्याला दिसत. ज्यांनी शाळेचे मैदान आणि वर्गाचा उंबरठा ओलांडण्याचं स्वप्नही पाहिलं नसेल त्यांना कर्मवीरांनी शिक्षणाची कवाड खुली करून दिली. इतकंच नव्हे तर त्यातून त्यांनी प्रचंड ताकतीची माणसं तयार केली. साहित्य पासून विज्ञानापर्यंतच्या सर्व क्षेत्रात कर्मवीरांनांनी घडवलेली मुलं चमकू लागली. कर्मवीरांचे हे कार्य खरोखरच पहाडासारख आहे. महात्मा गांधी यांनी एकदा म्हटलं होतं की ,भाऊराव पाटलांची सेवा हाच त्यांचा खरा कीर्तिस्तंभ आहे .यावरूनच त्यांच्या कार्याची महानता स्पष्ट होते.
सत्यशोधक चळवळीला यश यायचं असेल तर शिक्षण प्रसाराच कार्य महत्त्वाच आहे हे भाऊरावनी जाणले. त्यासाठी ग्रामीण भागामध्ये शिक्षणाचा प्रसार करण्याच्या आश्रमाचा श्री गणेशा केला. या आश्रमात त्यांनी मराठा, महार, मुसलमान, मांग अशा सर्व जाती धर्माच्या विद्यार्थ्यांची अभ्यासाची सोय केली. या कामातून प्रेरणा घेत घेत आज खऱ्या अर्थाने वटवृक्ष असलेल्या रयत शिक्षण संस्थेची स्थापना त्यांनी १९१९ मध्ये केली. या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी शेकडो शाळा वस्तीगृह , महाविद्यालये यांचे जाळे उभे केले. समाजानेही कर्मवीरांना या कामात भरभरून मदत केली .आपल्या या शैक्षणिक कार्यात सर्व सामान्य माणसाची भागीदारी राहिलीच पाहिजे यावर त्यांचा कटाक्ष होता .एखाद्या धनीका कडून शिक्षण कार्यासाठी मिळालेल्या एक हजार रुपयांच्या देणगीपेक्षा एक हजार खडूताकडून एक एक रुपया याप्रमाणे मिळालेले एक हजार रुपये मला जास्त मोलाचे वाटतात.कारण मी त्यायोगे एक हजार माणसांशी ऋणानुबंध जोडू शकतो असे ते म्हणत.
तसेच मुष्टिफंड सारख्या नव्या योजना त्यांनी राबवल्या. मुष्टिफंड म्हणजे गावातील प्रत्येक महिला दळण दळण्यापूर्वी त्यातील एक मूठ धान्य बाजूला काढून ठेवत असे .नंतर ते धान्य एकत्र करून विद्यार्थी आश्रमाला दिले जायचे.नेर्ले येथे कर्मवीरांनी ही योजना राबवली.
सामान्य माणसाला फारसा भार न होताही शैक्षणिक सत्कार्य सहभागाचा आनंद मिळू लागला तो कर्मवीरांच्या या योजनेमुळे .कुठे ही कर्मवीरांची शिक्षण व्यवस्था तर कुठे आजची खाजगीकरण, बाजारावर आधारलेली शिक्षण व्यवस्था असा प्रश्न मनात निर्माण झाल्याशिवाय राहत नाही.
महाराष्ट्राच्या सार्वत्रिक शिक्षणाचा पाया महात्मा फुलेंनी घातला. आणि त्याला व्यापक चळवळीचे स्वरूप कर्मवीरानी दिले. आधुनिक श्रमिक महाराष्ट्राच्या जडणघडणीत कर्मवीरांचे योगदान फार मोठे आहे .मन, मेंदू आणि मनगट यांची मजबूत वीण असलेली शिक्षण पद्धती कर्मवीरांनी महाराष्ट्राला दिली.' कमवा आणि शिका' ही योजनाही त्यांचीच.स्वावलंबन, स्वाभिमान, स्वाध्याय आणि स्वातंत्र्य यावर निष्ठा ठेवून कर्मवीर कार्यरत राहिले. त्यांच्या महान कार्यामुळे भारत सरकारने त्यांना पद्मभूषण हा पुरस्कारही दिला. पुणे विद्यापीठांनी डिलीट दिली. इतरही अनेक पुरस्कार त्यांना मिळाले. १९८८ साली भारत सरकारने त्यांचे टपाल तिकीटही काढले.पण जनतेने स्वयंस्फूर्तीने त्यांना कर्मवीर ही पदवी बहाल करून जो उचित गौरव केला तो अधिक महत्त्वाचा आहे. आज त्यांच्या स्मृतिदिनी त्यांना विनम्र अभिवादन...!
(लेखक समाजवादी प्रबोधिनी,इचलकरंजीचे १९८५ पासूनचे कार्यकर्ते आहेत.प्रबोधिनीच्या वतीने गेली पस्तीस वर्षे नियमितपणे प्रकाशित होणाऱ्या ‘प्रबोधन प्रकाशन ज्योती ‘मासिकाचे संपादक आहेत. तसेच लेखक,कवी,गझलकार म्हणून सुपरिचित आहेत.)