निष्पापांवर दहशतवादी हल्ला

 

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी

(९८५०८ ३०२९० )

prasad.kulkarni65@gmail.co

प्रेस मीडिया लाईव्ह :

नऊ दिवसांपूर्वी जम्मू काश्मीरच्या पहलगाम मध्ये २३ एप्रिल रोजी दहशतवादी हल्ल्यांमध्ये २६ निष्पाप पर्यटकांचा बळी गेला. या अतिशय भ्याड हल्ल्याचा धिक्कार करावा तेवढा थोडाच आहे. या हल्ल्यामुळे भारत पाकिस्तान यांच्यातील तणाव पुन्हा वाढला आहे. पाकिस्तान सरकारने दहशतवाद पोसण्याचा सातत्याने प्रयत्न केला यात शंका नाही.३० एप्रिल रोजी भारत सरकारने 'फ्रॉम काश्मीर टू काबुल अँड बियाँड 'म्हणजे 'काश्मीर ते काबुल आणि त्यापलीकडे ' या नावाचा एक दस्तऐवज प्रकाशित केला. त्यामध्ये केवळ भारताविरुद्धच नव्हे तर अफगाणिस्तान, इंग्लंड, रशिया,इराण यासारख्या इतर देशातही दहशतवाद पसरवण्यात पाकिस्तानचा हात असतो असे उदाहरणासहित स्पष्ट केले आहे. कुख्यात दहशतवादी ओसामा बिन लादेन याला अमेरिकेने २०११ साली पाकमधील अबोटाबाद मध्ये ठार केले.पण तोही पाकिस्तानच्या लष्करी अकादमी जवळ अनेक वर्षे सुरक्षित होता हे स्पष्ट करत जगभरातील अनेक दहशतवादी हल्लेखोर पाकिस्तान मध्ये आश्रय घेतात व सरकार त्यांना देते हे या अहवालात स्पष्ट केले आहे. 


हा दहशतवादी हल्ला झाला तेव्हा दहशतवाद्यांना आणि त्यांच्या सूत्रधारांना केंद्र सरकारने धडा शिकवावा.आम्ही केंद्र सरकारच्या पाठीशी आहोत असे देशातील विरोधी पक्षासह सर्वांनी जाहीर केले आहे. देशभर गावोगावी या हल्ल्याचा तीव्र निषेधही करण्यात आला. केंद्र सरकारकडून खरोखरच काही कठोर कारवाईची अपेक्षा निश्चित पणाने आहे. मात्र या हल्ल्याने एक स्पष्ट झालेले आहे की काश्मीर खोरे सरकार सांगते तसे शांत आणि निवांत झालेले नाही. जर तसे असते तर हा हल्ला झालाच नसता. केंद्र सरकारने सर्वपक्षीय बैठकीत गुप्तचर यंत्रणा व सुरक्षा यंत्रणांच्या काही त्रुटी राहिल्या हे मान्य केले आहे.


 पहलगामच्या बैसरन पठारावर एकाच वेळी दोन दोन हजार पर्यटक जात होते. पण त्याची माहिती सुरक्षा यंत्रणांना नसणे हे चिंताजनक आहे. तसेच पहलगामच्या परिसरातील हॉटेलमध्ये हजारोंच्या संख्येने पर्यटक वास्तव्य करत होते याची योग्य ती माहिती सुरक्षा यंत्रणेपर्यंत पोहोचली नव्हती का ? हाही प्रश्न निर्माण होतो. २०१९ नंतर स्थानिक काश्मिरी जनता आणि सुरक्षा यंत्रणा यांच्यातील संपर्क तुटलेला आहे का ?अशी शंकाही यावरून येत आहे. काश्मीरमध्ये सर्व काही सुरळीत सुरू आहे असे सांगत त्याची खात्री पटवण्यासाठी केंद्र सरकारने तेथील काही ठिकाणी वर्षभर खुली ठेवली होती. हल्ला झालेले ठिकाण हे त्यापैकीच एक होते. मात्र या ठिकाणी पोहोचण्यासाठी पक्का रस्ता नाही. तसेच या पठाराभोवती घनदाट जंगलही आहे. त्यामुळे येथून दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता सुरक्षा यंत्रणांनी ध्यानात घ्यायला हवी होती हेही खरे आहे. हा भ्याड हल्ला झाला तेव्हा पर्यटकांना स्थानिक काश्मिरी जनतेनेच प्राणार्पण करून मदत केली हेही ध्यानात घेतले पाहिजे. या हल्ल्यामुळे पर्यटकांचा ओघ कमी होऊन पर्यटन हाच मुख्य व्यवसाय असलेल्या काश्मिरी जनतेच्या रोजी रोटीचा प्रश्न उभा राहू शकतो. त्यातून पुन्हा नवे गंभीर प्रश्न निर्माण होऊ शकतात हेही आपण लक्षात घेतले पाहिजे.


 गेल्या आठ नऊ वर्षांमध्ये २ जानेवारी २०१६ रोजी पठाणकोट येथे, १८ सप्टेंबर २०१६ रोजी उरी येथील लष्करी तळावर,३ ऑक्टोबर २०१६  रोजी बारामुल्ला येथे,,११ जुलै २०१७ रोजी अमरनाथ यात्रेवर, १४ फेब्रुवारी २०१९ रोजी पुलवामा असे हल्ले झाले आहेत. या हल्ल्यात केंद्रीय राखीव दलाचे चाळीसहून अधिक जवान शहीद झाले. व वीस हून अधिक जवान जखमी झाले होते. केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या जवानांच्या वाहनाच्या ताफ्यावर स्फोटकानी भरलेले वाहन धडकून हा भयंकर संहार झाला होता. एवढा स्फोटकांचा साठा तिथे आला कुठून हे आजतागायत कळलेले नाही. हा जवानांचा ताफा सुट्टी संपून सेवेवर रुजू होण्यासाठी काश्मीर खोऱ्याकडे जात होता. वास्तविक दरवेळी एक हजार जवानांना अशा पद्धतीने नेले जाते. पण त्यावेळी ७० वाहनातून २५४७  जवान जात होते. या जवानांना वाहना ऐवजी विमानाने नेले जाणे सुरक्षेसाठी आवश्यक आहे.अशी दोन पत्रे देऊनही त्याकडे संबंधित विभागाने दुर्लभ केले होते असे त्यावेळी उघड झाले होते. शिवाय सुरक्षा व्यवस्थेतील कमजोर या स्पष्टपणे तेव्हा दिसून आलेल्या होत्या. पहेलगामचा आत्ताचा हल्ला पाकिस्तानच्या लष्करी सहभागाशिवाय होणे शक्य नाही हे स्पष्ट आहे. काश्मीर खोऱ्यातील परिस्थिती ३७० कलम रद्द केल्यानंतरही फारशी सुधारलेली नाही हे वास्तव आपण देश म्हणून स्वीकारले पाहिजे. 


तसेच या हल्ल्याकडे हिंदू मुसलमान अशा बटोगे तो कटोगे अशा विकृत दृष्टिकोनातून पाहिले जाऊ नये . कारण ही वेळ धार्मिक ध्रुवीकरणाच्या आधारे निवडणुकीसाठी मते मिळवण्याची नाही तर देश म्हणून व्यापकपणाने विचार करण्याची आहे.समाज माध्यमांवर टाकल्या जाणाऱ्या पोस्ट , त्यावर दिल्या जाणाऱ्या प्रतिक्रिया, आगीत तेल ओतण्याचे काम करणाऱ्या काही वाहिन्यांचे निवेदक पाहिले की या मंडळींना मूळ प्रश्न समजलेला नाही. या देशाच्या हिताशी त्यांना काहीही देणे घेणे नाही हे स्पष्ट होते. पाकिस्तानला धडा शिकवला पाहिजे याबद्दल दुमत असण्याचे कारण नाही. पण त्याची रणनीती शांतपणाने ठरवावी लागेल. कारण दहशतवाद्यांना जे हवे आहे ते आपण करता कामा नये. कारण दहशतवाद्यानाही भारतात हिंदू मुसलमान दंगली घडून याव्यात, त्यांच्यातील स्नेहभाव कमी होऊन द्वेष भावना वाढीस लागावी हेच तर हवे आहे. 


गेल्या चाळीस वर्षांमध्ये कश्मीरमध्ये जनतेच्या रहिवासी ठिकाणांवर, पोलीस यंत्रणेवर ,प्रशासन व्यवस्थेवर, लष्करावर शेकडो हल्ले झालेले आहेत. त्यामध्ये चौदा हजार मुस्लिम तर दोन हजार हिंदू धर्मीय निष्पाप लोक मारले गेले आहेत असे साऊथ एशिया टेरीरिझम रिपोर्टने स्पष्ट केले आहे. तेव्हा अशा दहशतवादी हल्ल्यांची झळ मुस्लिम धर्मीयांना मोठ्या प्रमाणात बसलेली आहे हेही लक्षात घेतले पाहिजे.हा हल्ला झाला तेव्हा आपले पंतप्रधान  नरेंद्र मोदी सौदी अरेबियात होते. तेथे ते या मुस्लिम देशाबरोबर व्यापारी करार करत होते हेही लक्षात घेतले पाहिजे. तसेच जगभर व्यापारामध्ये हिंदू मुस्लिम असा भेदभाव केला जात नाही. त्यामुळे देशांतर्गत असे  आपल्यापैकी कोणी करत असेल, तशी जाहीर भूमिका मांडत असेल अशा अर्धवटरावाना त्या त्या पक्षाच्या व विचारधारेच्या धुरीणांनी गंभीरपणाने समज देण्याची गरज आहे. आणि जनतेनेही यांना योग्य भाषेत सुनावण्याची गरज आहे. कारण हिंसेतून हिंसा आणि द्वेषातून द्वेषच निर्माण होत असतो हे सर्वकालीन सत्य आहे.या हल्ल्याकडे धार्मिक दृष्टिकोनातून बघणे अतिशय घातक आहे.पहेलगामचा दहशतवादी हल्ला हा जाणीवपूर्वक दोन धर्मातील तेढ वाढावी हा आणखी एक विकृत विचार घेऊन केला गेलेला हल्ला आहे. त्यामुळे या हत्या संदर्भात संकुचित व विकृत दृष्टिकोनातून विचार मांडणाऱ्यांनी जरा शांतपणे विचार करण्याची गरज आहे. तसेच केंद्र सरकारलाही दहशतवादाचा बिमोड करण्यासाठी ,योग्य निर्णय करण्यासाठी , आंतरराष्ट्रीय पातळीवर आपल्या बाजूने जनमत मिळवण्यासाठी मुत्सद्दीपणाने पावले टाकण्यासाठी पुरेसा अवधी दिला पाहिजे.


(लेखक समाजवादी प्रबोधिनी,इचलकरंजीचे १९८५ पासूनचे कार्यकर्ते आहेत.प्रबोधिनीच्या वतीने गेली पस्तीस वर्षे नियमितपणे प्रकाशित होणाऱ्या ‘प्रबोधन प्रकाशन ज्योती ‘मासिकाचे संपादक आहेत. तसेच लेखक,कवी,गझलकार, वक्ता , स्तंभलेखक म्हणून सुपरिचित आहेत.)

Post a Comment

Previous Post Next Post