प्रेस मीडिया लाईव्ह :
पुणे शहराच्या प्रवेशद्वारांवर आणि पुणे स्टेशन परिसरात नागरिकांसाठी मॉल आणि मल्टिप्लेक्सच्या धर्तीवर वातानुकूलित (एसी) स्वच्छतागृहांची उभारणी महापालिका करणार आहे. या स्वच्छतागृहांमध्ये वायफाय, मोबाईल आणि लॅपटाॅप चार्जिंगचीही सुविधा असणार आहे.शहरात पाच ठिकाणी ही स्वच्छतागृह उभारली जाणार त्यासाठी ४ कोटी ३१ लाख रुपयांचा खर्च केला जाणार आहे. या स्वच्छतागृहांच्या देखभाल दुरुस्तीच्या खर्चासाठी पालिकेकडून या ठिकाणी जाहिरातींसाठी परवानगी दिली जाणार आहे. तसेच, हे स्वच्छतागृह सःशुल्क असणार आहे.
शहरात महापालिकेची सुमारे १२०० स्वच्छतागृहे आहेत, ज्यांची अवस्था अत्यंत दयनीय आहे. विद्युत व्यवस्था नसणे, तुटलेली भांडी, फरशा आणि नळ, तुंबलेल्या मोऱ्या आणि फुटलेल्या पाइपलाइन्समुळे नागरिक ती वापरणे टाळतात. तसेच त्यांच्या स्वच्छतेसाठी कोट्यवधी रुपये खर्चूनही स्वच्छतागृहे वापरण्यायोग्य नाहीत, अशी नागरिकांची तक्रार आहे. या पार्श्वभूमीवर, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी डिसेंबर महिन्यात शहरात चांगल्या दर्जाची स्वच्छतागृहे उभारण्याची सूचना केली होती. त्यानुसार, महापालिकेने शहराच्या प्रवेशद्वारांवर व्हीआयपी स्वच्छतागृहे उभारण्याचा निर्णय घेतला आहे. या स्वच्छतागृहांमध्ये कपडे बदलण्याची सोय, मोबाईल आणि लॅपटॉप चार्जिंगची सुविधा आणि वायफायदेखील असणार आहे.
स्वच्छतागृहे आणि अंदाजित खर्च :
– कात्रज चौक, सातारा रस्ता – ८६.११ लाख
– पुणे-मुंबई रस्ता, बालेवाडी – ८६.२५ लाख
– शेवाळवाडी बस डेपो, पुणे-सोलापूर रस्ता – ८६.३५ लाख
– पुणे रेल्वे स्टेशन – ८६.०८ लाख
– वाघोली, पुणे-नगर रस्ता – ८६.४० लाख
शहराच्या प्रवेशद्वाराजवळ आणि पुणे स्टेशन येथे सुसज्ज आणि अद्ययावत स्वच्छतागृहे बांधली जाणार आहेत. ही स्मार्ट स्वच्छतागृहे वातानुकूलित असतील आणि यासाठी ४ कोटी ३१ लाख रुपयांचा खर्च अपेक्षित आहे