मटण बिर्याणी खाऊ घालणाऱ्या बाळकृष्ण उर्फ पांड्या लक्ष्मण मोहिते याच्यावर पुणे पोलिसांनी मोक्काअंतर्गत कारवाई केली

प्रेस मीडिया लाईव्ह :

पुणे : येरवडा कारागृहातून सांगली कारागृहाकडे नेताना कुख्यात गुंड गजानन मारणे याची बडदास्त ठेवत मटण बिर्याणी खाऊ घालणाऱ्या आणि पैसे, कपडे, बकेट व इतर वस्तुंची मदत करणाऱ्या बाळकृष्ण उर्फ पांड्या लक्ष्मण मोहिते याच्यावर पुणे पोलिसांनी मोक्काअंतर्गत कारवाई केली आहे.विशेष न्यायाधीश ( मोक्का) एस.आर. साळुंखे यांनी आरोपीला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. तसेच, सांगलीपर्यंत जाताना गजाची बडदास्त राखणाऱ्या सतीश शिळीमकर, विशाल धुमाळ याच्यावर मोक्का कारवाई करण्यात आली आहे.

पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पथकाने गजानन मारणे याचा अत्यंत विश्वासू आणि आर्थिक व्यवहार सांभाळणारा राइट हँड अशी ओळख असलेल्या बाळकृष्ण उर्फ पांड्या लक्ष्मण मोहिते याला अटक केल्यानंतर पोलिसांनी त्याला बुरखा घालून बुधवारी ( दि. १५) न्यायालयात हजर केले. हा गुन्हा संवेदनशील असून, आरोपीस विश्वासात घेऊन त्याच्याकडून गुन्ह्यातील इतर आरोपींच्या ठावठिकाणाची माहिती घ्यायची आहे. आरोपीने कुणाच्या सांगण्यावरून सातारा व सांगली येथील १५ ते २० व्यक्तींना जमा करून न्यायालयीन कोठडीतील आरोपीस आर्थिक तसेच इतर प्रकारचे सहाय्य केले , याचा तपास करायचा आहे. त्यामुळे त्याला सात दिवसांची पोलीस कोठडी देण्याची मागणी सरकारी वकील प्रमोद बोंबटकर यांनी केली. न्यायालयाने आरोपीला तीन दिवसांची पोलीस कोठडी दिली.

पोलीस कर्मचारी निलंबित….

येरवडा कारागृहातून सांगली कारागृहात नेत असताना गुंड गजा मारणे याने ढाब्यावर मटण पार्टी केल्याच्या धक्कादायक घटनेची गंभीर दखल घेऊन पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी याप्रकरणात सहायक पोलीस निरीक्षक सूरज राजगुरू, पोलीस हवालदार महेश बामगुडे, सचिन मेमाणे आणि पोलीस शिपाई राहुल परदेशी यांना निलंबित केले आहे.

बाळकृष्ण उर्फ पांड्या लक्ष्मण मोहिते याचा साथीदार सतीश शिळीमकर याने गजा मारणे याला सांगली येथे ५० हजार रुपये देऊन मदत केली. विशाल धुमाळ हा कणसे ढाबा सातारा येथे पोलीस व्हँनमध्ये मारणे याला जेवण घेऊन गेला होता. मारणे कारागृहात जाईपर्यंत त्याने सर्व व्यवस्था बघितली, त्यामुळे शिळीमकर व धुमाळ या दोघांवर मोक्का अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Post a Comment

Previous Post Next Post