पाण्याच्या प्रश्नाकडे गांभीर्याने पाहावे

 

प्रेस मीडिया लाईव्ह :

उन्हाचा तडाखा वाढतो आहे. पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. त्याकडे गांभीर्याने पाहणे महत्त्वाचे आहे.नद्या, धरणे ,तलाव अन्य जलसाठे मोठ्या प्रमाणात आकुंचन पावत आहेत. तसेच अनेक उपनलिकांचे पाणीही बंद झाले आहे अथवा कमी झाले आहे.तीव्र उन्हाने बाष्पीभवनाची गतीही वाढलेली आहे. 

यावर्षीचा मे - जून महिना हा आजवरचा सर्वाधिक कडक उन्हाळ्यात असेल असे सांगितले जाते.आगामी दोन-तीन महिने उन्हाळा वाढतच जाणार आहे.मुळात पृथ्वीच्या पोटातीलच पाणी आता कमी होत आहे. जलतज्ञांच्या अभ्यासानुसार पृथ्वीच्या पोटातील ७२ टक्के पाणी आपण संपवलेले आहे.आता केवळ २८ टक्के पाणी शिल्लक आहे. या पार्श्वभूमीवर पाणी जपून वापरणे, त्याचा अनावश्यक वापर थांबवणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. काही वर्षापूर्वी दक्षिण आफ्रिकेच्या केप टाऊन शहरामध्ये भीषण पाणी टंचाई निर्माण झाली होती. अशीच अवस्था आता बंगळुरूची शहरासुद्धा होऊ शकते. केंद्रीय जल आयोगानेही भारतात नद्या कोरड्या पडण्याचे प्रमाण वाढत आहे हे स्पष्ट केले आहे. महाराष्ट्राच्या धरणातील पाणीसाठा  गतवर्षीच्या या कालावधीपेक्षा १८ %  कमी आहे. शासनस्तरावर वर्षानुवर्षे आपल्या जल नियोजनात मोठ्या उणिवा आहेतच.तसेच व्यक्तिगत पातळीवरही बेजबाबदारीने पाण्याचा वापर करणाऱ्यांची संख्या वाढते आहे. या पार्श्वभूमीवर प्रत्येकाने याचा गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे. एकीकडे तापमान वाढीचे चटके आणि दुसरीकडे पाण्याचे दुर्भिक्ष असे होऊ नये असे वाटत असेल तर पाण्याचा वापर जपून केला पाहिजे. तसेच पाण्याच्या साठ्यात वाढ होईल याकडेही लक्ष दिले पाहिजे. मानवी जीवनाची गुणवत्ता सुधारण्यासाठी सामूहिक पातळीवर जलव्यवस्थापनात सुधारणा होणे महत्त्वाचे आहे.


प्रसाद माधव कुलकर्णी ,इचलकरंजी.

Post a Comment

Previous Post Next Post